दिल चाहता है फक्त गोव्याच्या ट्रीपची नाही तर फरहानच्या खऱ्या दोस्तांची गोष्ट होती

“अरे चल ना , कंटाळा आलाय.. कुठेतरी जाऊ! गोव्याला जायचं का?”

असं पहिला मित्र दुस-याला विचारतो. यावर दुसरा मित्र लगेच,“गोव्याला! अबे आधी भेटुन लोणावळ्यापर्यंतच गेलो तरी फार झालं, गोव्याच्या गोष्टी करतोय” असं म्हणतो. मित्रांच्या अशा संभाषणामध्ये गोव्याचा प्लॅन काय पूर्ण होत नाही.

पण सर्व मित्र-मैत्रीणींच्या ग्रुपमध्ये गोव्याचा प्लॅनबद्दल एक वेगळंच आकर्षण निर्माण करणारा ‘दिल चाहता है’ सिनेमाला आज १९ वर्ष पूर्ण झाली आहेत.

काॅलेज मनसोक्त अनुभवल्यावर इतक्या वर्षात प्रत्येकाचेच मित्र-मैत्रीणी झाले असतात. खुपदा काॅलेजनंतर नोकरी, पैशाच्या मागे धावण्याआधी काॅलेजमधून पासआऊट झालेल्या प्रत्येकाला थोडाफार निवांतपणा अनुभवायचा असतो. यावेळेस कुटूंबापेक्षा मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा प्लॅन सर्वजण आखतात. बरं जायचं कुठे? या प्रश्नाचं बहुतांश वेळा ठरलेलं उत्तर म्हणजे गोवा.

बाहेर फिरायला जायची हि ‘गोवा संस्कृती’ सबंध भारतीयांच्या मनात बिंबवण्याचं काम ‘दिल चाहता है’ सिनेमाने केलं.

‘दिल चाहता है’ २००१ साली याच दिवशी प्रदर्शित झाला होता. फरहान अख्तर या सिनेमाच्या माध्यमातुन दिग्दर्शनात पदार्पण करण्यास उत्सुक. वडिल जावेद अख्तर गीतकार म्हणुन साथीला होते. फरहानची बहिण झोया सिनेमासाठी कलाकारांची निवड करणार होती. मित्र रितेश सिधवाणी आणि फरहानने मिळुन निर्माण केलेली ‘एक्सेल’ हि प्राॅडक्शन कंपनी ‘दिल चाहता है’ ची निर्मिती करणार होती.

सिनेमाची कथा फरहानचीच होती. स्वतःच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग, मित्रांच्या आयुष्यात अनुभवलेले काही प्रसंग असे एकत्र करुन फरहानने ‘दिल चाहता है’ ची पटकथा लिहिली.

याचंच एक उदाहरण द्यायचं तर, ‘दिल चाहता है’ मध्ये एक प्रसंग आहे की, जिथे सिड (अक्षय खन्ना) संतापाने आकाशच्या (आमीर खान) कानाखाली मारतो. त्याच क्षणी दोघेही मित्र म्हणुन एकमेकांपासुन दुरावतात. असं सांगण्यात येतं, फरहानने हा प्रसंग स्वतःच्या आयुष्यातील एका घटनेवर रचला आहे.

ती घटना अशी, आदित्य चोप्राने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ सिनेमा बनवला. त्यावेळी सिनेमाच्या पटकथेसाठी फरहानची आई हनी इरानी यांनी आदित्यला खुप मदत केली. परंतु सिनेमाच्या पटकथेसाठी हनी इरानी यांना श्रेय देण्यात आलं नाही. याचा फरहानला राग आला. आदित्य चोप्राचा भाऊ उदय चोप्राशी फरहानची जीवलग मैत्री. या गोष्टीनंतर फरहानने उदयशी असलेली दोस्ती तोडली.

आता आपण ‘दिल चाहता है’च्या कलाकारांविषयी बोलु.

आमीर खानने सतत मस्करी करणारा, मिश्किल, कुल असा आकाश साकारला. प्रेमाविषयी नेहमी गोंधळात असणा-या समीरच्या भुमिकेत सैफ अली खान. शांत, स्वतःच्या तत्वांबद्दल प्रामाणिक आणि एक उत्तम चित्रकार असलेल्या सिद्धार्थ उर्फ सीडच्या भुमिकेत अक्षय खन्ना.

झोया अख्तरने फरहानच्या साथीने ‘दिल चाहता है’साठी कलाकारांची निवड केली. सिनेमाची कथा पहिल्यांदा अक्षय खन्नाला ऐकवण्यात आली आणि त्याला आकाशच्या भुमिकेसाठी निवडण्यात आलं. उर्वरीत दोन भुमिकांसाठी हृतिक रोशन आणि अभिषेक बच्चन या दोघांची नावं पक्की करण्यात आली.

पण त्यावेळी हे दोन्ही कलाकार इतर सिनेमांच्या शुटींगमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी ‘दिल चाहता है’ साठी नकार दिला.

सिडच्या भुमिकेसाठी आमीर खानला विचारण्यात आलं.

‘मी आधीच्या अनेक सिनेमांमध्ये गंभीर स्वरुपाच्या भुमिका केल्यायत. त्यामुळे सिडऐवजी आकाशची भुमिका करायला आवडेल.’

असं आमीरने सांगीतलं. यानंतर फरहानने अक्षय खन्नाची मनधरणी करुन अक्षयला सिडची भुमिका दिली. आमीर आकाश झाला. आणि सैफ अली खानला समीरची भुमिका देण्यात आली. अशाप्रकारे कलाकारांची निवड ठरली. या सिनेमात सैफ अली खानला आवडणा-या मुलीच्या व्यक्तिरेखेत मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी झळकली. डिंपल कपाडीयांची सुद्धा सिनेमात विशेष भुमिका.

‘दिल चाहता है’ च्या संगीतासाठी ए. आर. रेहमान यांना विचारण्यात आले.

परंतु ‘लगान’ मुळे रेहमान लोकप्रिय होऊन त्यांना अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या होत्या. त्यामुळे त्यांना ‘दिल चाहता है’ साठी वेळ देणं शक्य नव्हतं. यानंतर मग सिनेमाच्या संगीताची जबाबदारी शंकर-एहसान-लाॅय यांच्याकडे सोपवली गेली. तरुण वर्गाला आवडतील अशी सुंदर गाणी शंकर-एहसान-लाॅय यांनी कंपोज केली.

‘दिल चाहता है’ हे सिनेमाचं टायटल साँग आहे. त्या गाण्यातील एका शब्दावर फरहानने आक्षेप घेतला होता. ‘कभी ना बिते चमकीले दिन’ हि जी गाण्यातली ओळ आहे, या ओळीमधील ‘चमकीले’ शब्द फरहानला आवडला नव्हता.

हा शब्द मैत्रीपेक्षा साबणाच्या पावडरला उद्देशुन असल्यासारखा वाटतो, असं फरहानचं मत होतं. तेव्हा फरहानचे वडिल जावेद अख्तर यांनी,

‘मैत्रीतले जे झळाळते सोनेरी क्षण असतात ते कधीच संपु नये असं वाटतं.’ म्हणुन तिथे ‘चमकीले’ या शब्दाचा प्रयोग केल्याचं त्यांनी सांगीतलं.

वडिलांची बाजु फरहानला पटली. हे गाणं आजही पिकनीकला जाताना हमखास वाजणारं गाणं आहे.

१०८ दिवसांचं शूटींग पूर्ण होऊन १० ऑगस्ट २००१ ला ‘दिल चाहता है’ प्रदर्शित झाला.

बाॅलिवुडची फिल्मी परंपरा या सिनेमाने मोडीत काढली. कलाकारांच्या हेयरस्टाईलपासुन, कलाकार वापरत असलेल्या कपड्यांपर्यंत अनेक गोष्टी बदलत्या काळानुसार या सिनेमात दिसुन आल्या. हे तीन मित्र आपल्यातलेच एक वाटावेत, हा यामागचा उद्देश होता. आमीर खानची हनुवटीवरील छोटीशी दाढी तर प्रचंड लोकप्रिय झाली.

फरहान अख्तरने पहिल्याच सिनेमातुन स्वतःमधला प्रभावी दिग्दर्शक सर्वांना दाखवुन दिला.

‘दिल चाहता है’ च्या आधीच एक महिन्यापुर्वी आमीर खानचा ‘लगान’ रिलीज झाला होता. ‘लगान’ आणि ‘दिल चाहता है’ हे अगदी दोन टोकाचे विरुद्ध सिनेमे आमीरने केले. दोन्ही सिनेमे त्या वर्षी सुपरहिट झाले. एक गंमतीची गोष्ट म्हणजे, ‘दिल चाहता है’ रिलीज होण्याच्या आधी त्याचे प्रोमो टी.व्ही.वर दाखवले गेले.

त्यावेळेस तीन एड्स झालेल्या माणसांची गोष्ट या सिनेमाद्वारे पाहायला मिळणार, अशीच सगळीकडे चर्चा होती. ‘दिल चाहता है’ रिलीज झाल्यावर प्रेक्षकांना सिनेमा कशावर आहे, हे कळालंच.

मैत्री, प्रेम, लग्न, करियर या तरुणांच्या आयुष्यातील अनेक बाजु ‘दिल चाहता है’ मध्ये उत्तम रितीने मांडण्यात आल्या. मुख्य म्हणजे, गोव्याला जायला मित्र सोबत असतील तर काय धमाल करु शकतो, हे ‘दिल चाहता है’ ने दाखवुन दिलं. तर भिडूंनो, सध्या लाॅकडाऊनमुळे राहूदे, पण सर्व सुरळित झाल्यावर मित्रांना भेटुन एकत्र गोव्याला जाणार ना?

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.