पाय फ्रॅक्चर असताना ऑस्ट्रेलियाला आपल्या फिरकीवर नाचवलंही आणि हरवलंही

गेल्या दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली आपल्या पत्नीच्या बाळंतपणासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून भारताला  परतला. पहिल्या कसोटीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर त्याचे परत जाणे अनेक क्रीडाप्रेमींना जिव्हारी लागले आहे. काही जण विराटच्या निर्णयाचं कौतुक करत आहेत तर अनेकजण त्याच्यावर टीका करत आहेत.

यात सर्वात मोठी टीका एका माजी क्रिकेटपटूने केली. त्याच नाव दिलीप दोशी.

“मला कल्पना आहे की सध्या नवीन युगातला हा विचार आहे आणि अनेक लोकांना हा पटतोही. मलाही याची चांगली कल्पना आहे. पण ज्यावेळी तुम्ही भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करत असता आणि या परिस्थितीत मी स्वतःला ठेवून पाहिलं तर मी ऑस्ट्रेलियावरुन परतलो नसतो. माझ्यासाठी देशाचं प्रतिनिधीत्व करणं ही गोष्ट सर्वात आधी येते…बाकीच्या गोष्टी त्याच्या नंतर.”

दिलीप दोषींच्या या बोलण्यावर विराटच्या चाहत्यांनी प्रचंड ट्रोल केलं गेलं. त्यांचे भारताच्या क्रिकेटसाठी योगदान काय असं विचारलं गेलं. कित्येकजणांना त्यांचं नाव देखील माहित नव्हतं. मग अशा खेळाडूला खरंच कोहलीवर टीका करणे योग्य आहे का?

याच उत्तर देण्यापूर्वी तुम्हाला एक प्रसंग सांगावा लागेल.

गोष्ट आहे १९८१ सालची. भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती. गावस्कर आपला कप्तान होता तर ऑस्ट्रेलिया ग्रेग चॅपलच्या नेतृत्वाखाली लढत होती. तेव्हा देखील ऑस्ट्रेलिया कर्दनकाळ म्हणूनच ओळखली जायची. डेनिस लिली, अॅलन बॉर्डर, रॉडनी हॉग असे तगडे खेळाडू होते तर आपल्या टीममध्ये देखील कपिल, संदीप पाटील, गुंडाप्पा विश्वनाथ,वेंगसरकर अशी चांगली कॉम्बिनेशन होती.

या टीममध्ये दिलीप रसिकलाल दोशी  यांचा देखील समावेश होता.

दिलीप दोशी  मूळचे सौराष्ट्रचे. या भागाला भारतीय क्रिकेटर्सची खाण असं म्हटलं जातं. डोळ्यावर चष्मा,अंगकाठी एखाद्या अभ्यासू मुलासारखी. एकदम सिरीयस दिसणारे दिलीप हे लेफ्ट आर्म स्पिन बॉलर होते. रणजी क्रिकेटमध्ये खेळताना खोऱ्याने विकेट गोळा करायचे पण तरीही त्यांचा समावेश भारतातील The unfortunate trio मध्ये केला जायचा.

मुंबईचे पद्माकर शिवलकर, हरियाणाचे राजिंदर गोयल आणि सौराष्ट्रचे दिलीप दोषी हेच ते The unfortunate trio.

भारतीय टीममध्ये चन्द्रशेखर,प्रसन्ना,वेंकट आणि बिशन सिंग बेदी यांच्या सारखे वर्ल्ड क्लास स्पिन बॉलर खेळत असल्यामुळे त्या आमलकी खेळाडूंना कधी संधी मिळालीच नाही . त्यातल्या त्यात दोशी हे कमी आमलकी म्हटले पाहिजेत कारण वयाच्या तिशीत का असेना त्यांना भारताकडून खेळण्याची संधी मिळालीच.

आपल्या फिटनेसचा प्राईम प्रिरियड वाया गेला आहे याची जाणीव असूनही दिलीप दोशी यांनी मिळालेल्या संधीत जो खेळ दाखवला, फक्त ३३ कसोटीत १२४ विकेट्स घेतल्या त्याच आजही जागतिक क्रिकेटमध्ये कौतुक केलं जातं.

तर आपण बोलत होतो १९८१ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल.

तीन कसोटीची सिरीज होती, पहिली आपण हरलो होतो, दुसरी ड्रॉ झाली होती. तिसरी कसोटी काहीही करून आपल्यला जिंकावी लागणार होती. सगळे खेळाडू पेटून उतरले होते. पण घोळ झाला होता, भारताचा मेन स्पिनर दिलीप दोशी आठवड्याभरापूर्वी झालेल्या क्वीन्स लँड विरुद्धच्या सराव सामन्यात जखमी झाला होता.

जेव्हा त्याला तिथल्या हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आलं तेव्हा डॉक्टरनी एक्स रे पाहताच सांगितलं की तळपाय फ्रॅक्चर झाला आहे. दिलीप दोशी यांना तीन आठवडे जमिनीवर पाय देखील ठेवायचा नाही अशी सूचना देण्यात आली. पण दोशी यांनी आपण भारतीय टीमचा सदस्य आहे आणि मेलबर्न येथे आमची मॅच आहे असं सांगितलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले,

“तुम्हाला मी मेलबर्नला जायची परवानगी देईन, तिथे तुम्ही पायाला बर्फाचा शेक घेत राहा पण जमिनीवर डावा पाय बिलकुल टेकवायचा नाही. “

दिलीप दोशींनी मान डोलावली. पण डॉक्टरनी सांगितलेलं त्यांनी आपल्या टीम मेम्बर्सना काही सांगितलं नाही. टीमचे मॅनेजर राजसिंग आणि सलीम दुराणी जेव्हा भेटायला आले तेव्हा दोशी त्यांना खोटंच  म्हणाले,

“मी मॅच पर्यंत फिट होईन असं डॉक्टरनी सांगितलं आहे .”

देशासाठी मेलबर्नच्या कसोटीत आपण खळणे अत्यंत गरजेचे आहे हे दोशींना ठाऊक होते. कप्तान सुनील गावसकरला देखील त्यांनी आपण मॅच साठी अव्हेलेबल आहे असं सांगितलं खरं पण त्यांच्या पायाची सूज दिसून येत होती. मॅचच्या आधी रोज एमसीसी ग्राउंड चा फिजिओ त्यांच्या रम वर यायचा आणि इलेक्ट्रिक शॉक देऊन सूज कमी करायचा.

दिलीप वेदनेने कळवळायचे मात्र मॅचच्या आदल्या दिवसा पर्यंत त्यांनी हे सहन केलं.

आदल्या दिवशी टीम मॅनेजमेंटने त्यांची फिटनेस टेस्ट घ्यायचं ठरवलं. त्यांना सलग बारा बॉल टाकायला सांगितलं. दिलीप दोशी यांनी आपल्या डाव्या पायावर भार न टाकता बॉल कसा टाकायचा याची टेक्निक शिकून घेतली होती. त्यांनी कसेबसे ते ते १२ बॉल  टाकले.

गावसकर, दुर्रानी आणि राजसिंग यांनी त्यांना मॅच मध्ये खेळण्यासाठी हिरवा सिग्नल दिला.

तरीही दोशींनी कप्तानला फक्त एकच विनंती केली की,

मला फिल्डिंग साठी मिड ऑन वर उभं करा. म्हणजे मला जास्ती धावावे लागणार नाही.

पण मॅच सुरु झाली आणि गावस्कर हे विसरून गेला. त्याने दोशींनी बाउंड्री लाईनवर उभे केले. दिलीप दोशी देखील काही बोलले नाहीत. कसोटीचे पाचही दिवस त्यांनी फ्रॅक्चर झालेल्या पायाने खेळून काढले. प्रत्येक काही तासांनी त्यांना बर्फाच्या बकेट्मध्ये पाय घालून बसावे लागायचे, पायाची सूज थोडी कमी झाली तरच सॉक्स आणि बूट घालता येत असे. याशिवाय रात्रीची शॉक ट्रीटमेंट सुरूच होती.

अतिप्रचंड वेदना होत असतानाही दिलीप दोशीने फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर जबरदस्त बॉलिंग केली. पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात २ महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. याच सामन्यात सुनील गावस्करने कुप्रसिद्ध वॉक आउट केले होते.

पहिल्या डावात १८१ धावांनी  पिछाडीवर असतानाही आपण विजयी होण्याचा चमत्कार घडवून आणला. शतक ठोकणारा गुंडाप्पा विश्वनाथ मॅन ऑफ दि मॅच ठरला होता. पण त्या मॅचचा खरा शिल्पकार मोडलेल्या पायाने खेळणारा जिद्दी दिलीप दोशी होती.

दिलीप दोशींच्या बॉलिंगचे खुद्द क्लाइव्ह लॉइड यांनी देखील कौतुक केले होते पण आपल्या देशातच त्यांची किंमत कधी कोणाला कळली नाही. टीमच्या राजकारणात फटकळ बोलण्याचा स्वभाव दोशींना नडला आणि ते क्रिकेटमधून लवकरच बाहेर पडले.

देशासाठी खेळायसाठी किती कष्ट करावे लागतात आणि केवढी किंमत मोजावी लागते याचा अनुभव त्यांना आहे, त्यामुळे संकटाच्या परिस्थितीमध्ये टीमची साथ सोडणाऱ्या विराटवर त्यांनी टीका केलीय. आणि त्यांना ही टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.