एकेकाळी सलमानच्या सिनेमात नोकराचं काम करणारे दिलीप जोशी आज डेलीसोपचे किंग आहेत…

छोट्या पडद्यावर हजारो मालिका, रियालिटी शोज येऊन गेले. या मालिकांमधील पात्रांची लोकांना सवय होऊन गेली. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात हि मंडळी सुखावू लागली. खरतर कॉमेडी सिरीयल दीर्घकाळ टिकत नाही असं म्हटलं जातं पण काही बोटावर मोजण्याइतक्या सिरीयल याला अपवाद आहेत. पण या कॉमेडी सिरीयल तग धरून राहतात यातल्या लीड पात्रामुळे. तर अशाच एका सिरियलची लीड पात्राची यशोगाथा. हा कॉमेडी भिडू तुम्हाला चांगलाच परिचयाचा आहे.

तारक मेहता का उलटा चष्मा हि मालिका आजवर भारतातल्या प्रत्येकाने एकदातरी बघितली असावी. भारताच्या विविध भागांचं, राज्याचं मिनी स्केलवर रूपांतर करून मिनी गोकुलधाम सोसायटी यात दाखवण्यात आली. मराठी, गुजराती, साऊथ इंडियन, बंगाली अशा अनेक भाषांनी आणि पात्रांनी परिपूर्ण अशी हि मालिका आहे. 

या तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेचे लीड हिरो आहेत दिलीप जोशी. दिलीप जोशी म्हणल्यावर लवकर आठवणार नाही पण जेठालाल म्हणल्यावर ते पात्र थेट डोळ्यासमोर उभं राहतं. जेठालाल हे कॅरेक्टर इतकं लोकप्रिय आहे कि दिलीप जोशींना त्यांच्या मूळ नावापेक्षा जेठालाल याच नावाने ओळखलं जातं.

पण दिलीप जोशी यांचा जेठालाल पर्यंतचा प्रवास बराच खडतर आहे. गुजराती नाटकांमधून आणि सिनेमांमधून आपल्या अभिनय क्षमतेच्या जोरावर दिलीप जोशींनी आपली एंट्री बॉलिवूडमध्ये केली.

मुंबईच्या पृथ्वी थेटरपासून त्यांनी करियरला सुरवात केली. पण बॉलिवूडमध्ये काम मिळणं अवघड होतं. शेवटी मैने प्यार किया सिनेमातून त्यांना एक रोल मिळाला. रामू नावाच्या नोकराचा रोल दिलीप जोशींनी साकारला होता. 

2 1590301034

सलमान खान या सिनेमामुळे सुपरस्टार झाला पण सिनेमा सुपरहिट झाल्याचा फायदा दिलीप जोशींना मिळाला नाही. हम है बेमिसाल सिनेमामध्ये सुद्धा त्यांचा अगदी काही सेकंदाचा रोल होता.

हम आपके है कौन सिनेमात एक स्पेशल कॅरेक्टर दिलीप जोशींना मिळालं. या सिनेमातलं भोलाप्रसाद हे पात्र चांगलाच भाव खाऊन गेलं. दोन ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये रोल मिळूनही दिलीप जोशींना काम शोधावं लागत होतं. 

ऑडिशन देऊनसुद्धा बऱ्याच ठिकाणाहून त्यांना नकार मिळत असे. बॉलिवूडमध्ये काहीच काम मिळत नाही म्हणून दिलीप जोशी छोट्या पडद्याकडे वळले. पहिली सिरीयल मिळाली १९९४-९५ सालची कभी ए कभी वो, नंतर क्या बात है मधला रंगा स्वामींचा दिलीप जोशींचा रोल चांगलाच गाजला. मालिकांसोबत ते सिनेमांमध्येसुद्धा छोटे मोठे रोल करत असे.

खिलाडी ४२०, फिर भी दिल है हिंदुस्थानी, हमराज या सिनेमांमध्ये दिलीप जोशी झळकले होते. दिलीप जोशींना काम मिळत होतं पण त्यांचं नाव झालेलं नव्हतं. २००६ मध्ये तर दिलीप जोशी अक्षरश बेकार होते. एफआयआर सीरियलमध्ये ते कॅरेक्टर रोल करू लागले होते. काम मिळत नसल्याने दीड दोन वर्ष ते घरीच होते.

२००८ साल उजाडलं तेव्हा असितकुमार मोदी हे एका शो वर काम करत होते. तो शो होता तारक मेहता का उलटा चष्मा. दिलीप जोशी आणि असितकुमार मोदी यांची जुनी मैत्री होती, एकत्र त्यांनी काम केलेलं होतं.

असितकुमार मोदीने चंपक चाचाचा रोल दिलीप जोशींना ऑफर केला होता पण दिलीप जोशींनी दिग्दर्शकाला सांगितलं कि चंपक चाचा तर मी करू शकत नाही पण हे जेठालालच पात्र मी करू शकतो.

शेवटी जेठालाल हे पात्र दिलीप जोशींनी अजरामर केलं. ज्यावेळी तारक मेहता का उलटा चष्मा शो टीव्हीवर आला तेव्हा तो लोकांनी चांगलाच डोक्यावर घेतला. सासू सुनांच्या भांडणातून नवीन काहीतरी दाखवणारा हा शो होता आणि हि सिरीयल जेठालालच्या भोवती विनोदी पद्धतीने फिरत असल्याने हि मालिका लगेचच लोकप्रिय झाली.

यात जेठालाल बबिता, जेठालाल-दया, जेठालाल-चंपकचाचा या केमिस्ट्री जबरदस्त गाजल्या. आजही जेठालाल लोकांच्या चांगलाच लक्षात आहे. एकेकाळी दिलीप जोशी सलमान खानच्या सिनेमात नोकराची भूमिका करायचे, पण वेळ बदलते शेठ म्हणतात ना तस घडलं आणि सलमानला दिलीप जोशींच्या शो मध्ये प्रमोशन करायला यावं लागत. 

60697575

जेठालालचे काही शब्द आणि डायलॉग प्रचंड चर्चेत असतात आणि त्यावर भन्नाट मीम बनवले जातात जस कि ए पागल औरत, नॉन्सेन्स, अक्कल है तेरे में, पॉब्लेम, सायनिस्ट, ढोबी….

असे असंख्य डायलॉग दिलीप जोशींनी अजरामर केले आहेत. आजसुद्धा दिलीप जोशींच्या जेठालालची क्रेझ तीच आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.