मुस्लिम ओबीसींना सवलती देण्याचा निर्णय १९९४ साली शरद पवार यांनी प्रथम घेतला…

समाजातल्या उपेक्षित व मागासलेल्या लोकांना प्रवाहात आणण्यासाठी मंडल आयोगाच्या शिफारसी व्ही.पी.सिंग यांच्या सरकारने मान्य केल्या होत्या. मात्र ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून देशात वेगवगेळे मतप्रवाह निर्माण झाले आणि गुजरात सारख्या राज्यात दंगली सुरु झाल्या.

मंडल आयोग लागू करणारं पहिलं राज्य होतं महाराष्ट्र 

भारताचे पहिले सुपरस्टार म्हणवले जाणारे दिलीप कुमार एकदा इस्लामिक जिमखाना येथे आले होते. तेव्हा योगायोगाने त्यांची भेट विलास सोनवणे यांच्याशी झाली. सोनवणे तेव्हा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे (AIMOBCO) काम करायचे. त्यांनी दिलीप कुमार यांना मुस्लिम समाजात मागासलेल्या जमातींच्या उन्नतीसाठी चळवळ करत असलेल्या या संघटनेबद्दल सांगितलं.

त्याकाळी शब्बीर अहमद या संघटनेचे प्रमुख होते तर फिल्मफेअर पुरस्कार विजेते गीतकार हसन कमाल हे या संघटनेचं काम करायचे. दिलीप कुमार यांच्याशी त्यांची जुनी ओळख होती. त्यांनी देखील दिलीप कुमार यांना AIMOBCO हि संस्था मुस्लिम ओबीसी समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी कशी काम करत आहे हे पटवून दिलं.

खरं तर तेव्हा फिल्म इंडस्ट्रीशी निगडित स्टार अशा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयाशी जोडले जाण्यास राजी नसायचे. विशेषतः दिलीप कुमार यांच्यासारखा मोठा कलाकार तर आपल्या इमेजचा विचार करता या सगळ्यापासून दूर राहिला असता. पण तरीही दिलीप कुमार या चळवळीत उतरले यालाही एक मोठा इतिहास होता. 

दिलीप कुमार हे मूळचे पेशावरचे. खरं नाव युसूफ खान. कामधंद्याच्या निमित्ताने त्यांचं कुटुंब नाशिकला आलं. देवळाली येथे ब्रिटिश कॅम्प होता. त्यांना भाजीपाला व फळे सप्लाय करण्याच्या निमित्ताने देवळालीला राहील. दिलीप कुमार यांच्या तारुण्याचा बराचसा काळ नाशिक जवळ व्यतीत झाला. पुढे त्यांची फॅमिली पुण्याला शिफ्ट झाली.

कॉलेज मध्ये असताना दिलीप कुमार यांना फुटबॉलची प्रचंड आवड होती. तेव्हाचा एक प्रसंग त्यांनी महाराष्ट्राचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांना सांगितला आहे.

त्याकाळी मुंबई विद्यापीठ अंतर्गत फुटबॉल टूर्नामेंट व्हायचे. दिलीपकुमार मुंबईच्या खालसा कॉलेजकडून खेळायचे. एकदा सामना जिंकल्यावर टीमच्या कॅप्टनने बाबूने संध्याकाळी सगळ्यांना घरी जेवायला बोलावलं. बाबूने स्वतः कोंबडी शिजवली होती. पण जेवायला फक्त दिलीप कुमार पोचले. टीम मधले अन्य कुणीच आलं नाही.

दिलीप कुमारांना आश्चर्य वाटलं, त्यांनी बाबूला विचारलं,  ‘अरे इतर कुणी का नाही आले?’

विजेत्या टीमचा कॅप्टन बाबू म्हणाला,

‘युसुफ भाई मी दलित महार आहे. माझ्या हातचं ते कसं खातील?’

कपिल पाटील सांगतात तो प्रसंग सांगताना दिलीप कुमारांच्या डोळ्यात पाणी होतं. गळा भरलेला होता. आपल्या महाविद्यालयीन जीवनातच दिलीप कुमार यांना जात वास्तवाची दाहकता अनुभवायला मिळाली.

पुढे योगायोगाने ते सिनेमाच्या क्षेत्रात गेले. मोठे स्टार झाले. भरपूर नाव व पैसा कमावला. अशातच एकदा ते औरंगाबाद इथे शूटिंग साठी गेले होते. तिथे त्यांना कळलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुभेदारी गेस्ट हाऊसला आले आहेत.

समस्त भारतीय जनतेप्रमाणे दिलीप कुमार यांच्या मनात देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्ववत्तेबद्दल आदर होता. त्यांना बाबासाहेबांना भेटायची खूप इच्छा होती. पुढे रीतसर वेळ घेऊन ते त्यांना जाऊन भेटले. दोघांच्यात खूप गप्पा रंगल्या. बाबासाहेब दिलीप कुमार यांना म्हणाले,

‘मुस्लिम समाजातल्या दुबळ्या वर्गासाठी काही करा.’

दिलीपकुमार सांगतात, ‘तेव्हा मला नाही जमलं. पण मुस्लिम ओबीसींच्या प्रश्नावर काम करताना माझ्या मनात आंबेडकरांची ती याद होती.’

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला वसा उतार वयात का असेना पण दिलीप कुमार यांनी हाती घेतला आणि मुस्लिम समाजातील दिनदलितांसाठी चळवळ उभी करण्यास हातभार लावला.

सुरवातीला त्यांच्या या कार्याला प्रचंड विरोध झाला. मुस्लिम समाजातील धर्मगुरू व प्रतिष्ठित लोक म्हणत होते की इस्लाममध्ये जात पात नाही. भेदभाव नाही. मग तुम्ही हे आरक्षणाचं खुलं कशाला काढताय ?

पण मुस्लिम ओबीसी संघटनेने सांगितलं, कुराण शरीफ नुसार मुस्लिम धर्मात जातीपाती नसल्या तरी खऱ्या वास्तवात आपल्यात जात पाळली जाते. भारतीय मुस्लिम समाजात त्याच जाती पाती आहेत. बिरादरी आहेत. मुस्लिम समाज हा जातीग्रस्त भारतीय समाजाचा अभिन्न अंग आहे.  इथे आलेल्या सगळ्या धर्मांना जाती व्यवस्थेने गिळून टाकलं आहे. जातीचा संबंध नसलेल्या धर्मांना जाती व्यवस्थेची तडजोड करावी लागली. धर्मांतरं झाली पण जात्यंतरं झाली नाहीत. जाती तशाच राहिल्या. त्यामुळेच मंडल आयोगाने ओबीसींच्या यादीत अनेक मुस्लिम जातींचा समावेश केला. त्यांना आरक्षण मिळावं म्हणून मुस्लिम ओबीसींची चळवळ उभी राहिली.

वरिष्ठ मुस्लिम वर्गीयांकडून होत असलेला विरोध दिलीपकुमार ठामपणे उभे राहिल्यानंतर संपुष्टात आला.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी परिषदा झाल्या. लखनौ, दिल्ली, हैदराबाद. प्रत्येक ठिकाणी स्वतः दिलीप कुमार गेले. एकदा मुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करायला त्यांचं शिष्टमंडळ गेलं होतं. तेव्हा नुकतेच शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले धडाकेबाज नेते छगन भुजबळ देखील मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधेय हजर होते. मंडल आयोग व ओबीसी आरक्षण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता.

त्यावेळी हिंदू ओबीसी आणि मुस्लिम ओबीसीवरून चर्चा सुरु झाली. हे दोन्ही समाज कसे एक आहेत, एका जातीचे, एका बिरादरीचे कसे आहेत हे मुख्यमंत्री शरद पवार यांना सांगताना दिलीपकुमार म्हणाले,

‘छगन भुजबळ माळी आहेत आणि मी बागवान. म्हणजे माळीच. जात एक. सवलत त्यांना मिळते मग बागवानाला का नको?’

दिलीप कुमार यांचा बिनतोड युक्तिवाद ऐकून शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे डोळे त्याक्षणी विस्मयचकीत झाले होते.

मुस्लिम ओबीसींना सवलती देण्याचा निर्णय १९९४ साली शरद पवार यांनी प्रथम घेतला.

तेव्हा मुस्लिम ओबीसींच्या सवलती आणि सर्टिफिकेटचा प्रश्न उभा राहिला तेव्हा तत्कालीन महसूल मंत्री विलासराव देशमुखांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. पुढे युतीच्या काळात रद्द झालेल्या सवलती गोपीनाथ मुंडे यांनी पुनर्स्थापित केल्या तेव्हा त्यामागची खरी ताकद दिलीपकुमार यांचीच होती.

पुढे दिलीप कुमार यांच्या आग्रहामुळे काँग्रेस पक्षाने मुस्लिम ओबीसी समाजातील उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभे केले. स्वतः दिलीप कुमार यांनी प्रचार करून त्यांना निवडून देखील आणलं.

आमदार कपिल पाटील आपल्या आठवणीमध्ये सांगतात की मुस्लिम ओबीसींना आरक्षण देऊन सर्वसमावेशक सामाजिक क्रांतीसाठी पुरोगामी महाराष्ट्राने पहिले पाऊल टाकले. शब्बीर अन्सारी, हसन कमाल, जहीर काझी, मी आम्ही सारे त्या चळवळीत होतो. पण दिलीपकुमार पाठीशी नसते तर मुस्लिम ओबीसींना न्याय मिळाला नसता.

संदर्भ- ‘लोकभारती’चे अध्यक्ष, आमदार कपिल पाटील यांनी आपल्या ब्लॉगमध्ये हि आठवण सांगितलेली आहे.  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.