त्या एका क्षणानंतर, दिलीप कुमार माझ्यासाठी युसूफ साहब झाले.. ते कायमचे…

“काय रे नाना? काय बोलत होता दिलीप कुमार तुझ्या कानात?”

नानाच्या पत्रकार कम मैत्रिणीने विचारलं. कारण उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक नानाला खुद्द दिलीप कुमार यांनी दिलं होतं आणि ते आलम दुनियेने पाहिलं होतं. त्यावेळी काही वेळ दिलीप कुमार नानाच्या कानात कुजबुजत होता…

आता आम्हाला (त्यात नानाला सुद्धा काऊंट करायचो आम्ही) दिलीप कुमार म्हणजे शत्रूच. पक्कं शिवसैनिक घराणं आमचं. मग बाळासाहेब बोलले की, “हा दिलीप कुमार त्यांच्या मोहल्ल्यात जाऊन म्हणतो, की म्हणे अल्लाह इधर बसा हैं आप सब के बीच… मग घेऊन जा म्हणावं आपल्या बंगल्यात…” मग आम्ही इतकं पटल्यासारखं खिदळायचो… हेच बाळासाहेब आणि हा दिलीपकुमार दोस्तही होते म्हणे.

असो, आपल्याला काय त्याचं… तरीही शाळेनंतर, जेव्हा परवानगी न घेता सिनेमे पाहायला सुरू केलं, तेव्हा एकदा मराठा मंदिरला मुगले आझम बघायला गेलो, मी आणि मित्र. सुरुवातीपासूनच माझ्या शेरेबाजीची लड लावली होती मी… कसा दिसतो… राजपुत्र वाटतो का? पृथ्वीराज कपूरचा मुलगा म्हणून राज कपूरला घ्यायचं की… राजबिंडा! हे काय ध्यान?

चित्रपट पुढे सरकत होता, याची एन्ट्री बाकी होती. बऱ्याच वर्षांनी राजपुत्र सलीम एका मोहिमेवरून परततोय. महाराणी जोधा इतक्या वर्षांनी आपल्या मुलाला पाहाणार म्हणून हरखून गेलीये, बावचळलीये… ती आपल्या दासींना म्हणते मी त्याला बघू शकणार नाही, मला काहीतरी होईल. एका मातेचं उचंबळणारं हृदय दुर्गा खोटे बाईंनी असं रंगवलं आहे की, त्यातली उत्कटता प्रेक्षकांपर्यंत पोहोचतेच.. आणि मग वर्दी येते की राजपुत्र सलीम पधार रहें हैं.. शिरस्त्राण, चिलखत घातलेला दिलीपकुमार संथ पावलं टाकत आत येतो.

जोधाने डोळे घट्ट मिटलेत. आता त्यावेळेस पोरसवदा असणारा मी… मनात दिलीपकुमारची परीक्षा घ्यायला थांबलोय… बघूच या… मोठा अभिनयातला शेवटचा शब्द वगैरे ना… कसा करतोय हा सीन बघूचया….दिलीपकुमार येतो.. शांतपणे दुर्गाबाईंच्या पायाशी बसतो आणि…. आणि… हळुवारपणे एक शब्द पुटपुटतो…”माँ”….एक शब्द… इतका हळुवार… जणू तो जरासं मोठ्याने बोलला असता तर त्याच्या आईचं, महाराणी जोधाबाईचं धडधडणारं हृदय तटकन तुटलं असतं… इतक्या मोजून मापून, तोलून उच्चारलेला शब्द …माँ… काय नाही त्या स्वरात… आई, कशी आहेस तू? मी आलोय गं… उगीच काळजी करतेस बघ… ह्या आणि अशा अनेक भावछटा उधळणारा स्वर आहे तो… निःसंशय एका नटश्रेष्ठाचा… तोच… अभिनयातला शेवटचा का माहीत नाही पण बॉलिवूडमधल्या वास्तववादी + प्रेक्षकवादी अभिनयातला पहिला शब्द.

दिलीप…. कुमार….
बिरबलाच्या कथेत त्यानं एकदा एका बहुरुप्यावर खुश होऊन आपल्या गळ्यातला हार फेकला होता… मी माझ्या मनातली दिलीपकुमार बद्दलची पूर्वग्रहदूषित मतं काढून फेकून दिली… आता तो..तो…दिलीप कुमार नव्हता माझ्यासाठी… तो …नव्हे ते… युसूफ साब बनले होते.. अस्सल सोनं…

“सुधा… ए सुधा…जाना नही हां…” असं वहिदा रेहमानला ते छातीशी धरून स्वतःलाच धीर देत असतात तेव्हा डोळे भरून येऊ लागतात, “और पुराने जख़्मोंको अगर तुम कुरदोगे न राजेस्वर, तो खून के फव्वारे फुट निकलेंगे” असं म्हणत ते राज कुमारच्या दिशेनं पुढे येऊ लागतात तेव्हा आपल्या मुठीसुद्धा त्वेषाने आवळतात. (by the way सौदागर मध्ये जानीला युसुफसाबनी मक्याच्या कणसासारखं भाजून बिजून खाल्लाय IMO), “विश्वप्रताप सिंह सरहद पे अकेला जायेगा..नहीं चाहिये उसको ऐसें दिलफेंक आशिक जो माशुक का हाथ थामतेही हथियार फेंक दे.” असं कर्मा मध्ये ते कडाडतात तेव्हा “मैं दिलीप कुमार को acting सीखाऊंगा” असं allegedly म्हणालेल्या नसीरसरांना खिशात टाकून निघून जातात आणि.. मृत घोषित केलेल्या पत्नीला (राखी) बघायला डीसीपी अश्विनी कुमार जड पावलाने येतो, “मेरे साथ ऐसा मत करना शीतल” म्हणत तिचा निर्जीव हात हातात घेतो आणि चमकून पुटपुटतो, “हाथ तो गरम हैं…” डॉक्टरकडे बघून विव्हळतो, “मगर हाथ तो गरम हैं डॉक्टर…” दडपण येतं… (बरं इकडे आमच्या बच्चनने टफ दिलीय हां युसुफसाबना… शक्ती) युसूफ साब ना हरिभाई जरीवालाने ‘विधाता’ मध्ये जशी तोडीस तोड दिलीय तशी..

हे तर मी ऐंशीच्या दशकातले, नव्वदीच्या सुरुवातीचे म्हणतोय ज्यात ‘धर्माधिकारी’ व ‘कानून अपना अपना’ हे साऊथ मसाला पकडतच नाही (त्यात युसुफसाब फोनवर संजूबाबाशी, नूतनजींच्या आवाजात बोलतात असा हृदयटोची प्रसंग आहे.) मात्र त्या आधी युसुफसाबच्या अभिनयाचा महामेरू म्हणून झालेल्या प्रवासाबद्दल लिहिण्याची माझी जिगर, पात्रता, वकुब नाही.

इतकंच लिहीन की बाप… बाप माणूस आहे हा पडदा खाऊन टाकणारा… त्यांची ओळख पटल्यावर मी रिव्हर्स जर्नी चालू केला… उलटा प्रवास काळाचा… मिळेल तसे सिनेमे पहात गेलो… गंगा जमना, मधुमती मध्ये वैजयंती तर कडकच आहे आणि युसुफसाबला जोरदार साथ दिलीय पण दोन्ही सिनेमात युसुफसाब हा तोच माणूस वाटत नाही…

गंगा तर जबराच आहे, देसी, मेहनती, साधा मग अन्यायाने पेटलेला आणि दुसरीकडे मॅनेजर आनंद, शहरी, रुबाबदार, मवाळ, फॅन्टॅस्टिक… उडन खटोला, यहुदी, कोहिनुर, आझाद (शेवटची तीन नावं सिनेमाची मीना कुमारी बरोबर अहा!) युसूफ साब इज जस्ट अमेझींग! ‘नया दौर’ मधला शंकर हा गंगा पेक्षा वेगळा आणि ‘बैराग’ मधला भोलेनाथ अजून एक अर्क… पडद्यावर ही धमाल करत असताना भूमिका आणि संवादाचं भान न हरपू देता भावोत्कट प्रसंगात प्रेक्षकांच्या दिल की तार छेड देना हे युसुफसाब, बच्चन आणि कमलच करू जाणे…

देवदास – त्याच्या डोळ्यातला वेडा निग्रह, त्याच्या सॉफ्ट स्पोकन आवाजातला दर्द सगळंच खूप वेदनादायी आहे… देवदासला युसुफसाबने अशा पातळीवर नेऊन ठेवलाय की त्या सेल्फ डिस्ट्रकटीव्ह तरुणाला चंद्रमुखीबरोबरच प्रेक्षकही जपू लागतात. म्हणून मी त्यांना वास्तववादी + प्रेक्षकवादी म्हणतो, अंडरप्ले अँड प्लेयिंग टू दी गॅलरी असं काहीसं…

युसुफसाबनी भारून टाकलेली एक पिढी आहे आणि त्या नंतरच्या पिढ्या ह्या युसुफसाबच्या ज्ञान, भाषा, तहजीबने भारून गेलेली आहे… मराठी नाटकं सुद्धा ते पहायचे असं ऐकलं आहे.. कलासक्त माणूस… धरम यांच्या वेडापायीच बॉलिवूडमध्ये आला व तो कोणी नसताना युसुफसाबनी त्याची खातीरदारी केली होती. धरम आपल्या माटुंग्याच्या पेइंग गेस्ट असलेल्या घराकडे निघाला तेव्हा हलकी थंडी असल्याने युसुफसाबनी आपला स्वेटर त्याला दिला जो धरमने जपून ठेवलाय, असा हा दिलदार माणूस…

सायराजींबरोबर विवाह मग आस्मा बरोबरचा निकाह सोडला, तर बाकी फार काही वादग्रस्त गोष्टी या माणसाला शिवल्या असाव्यात असं वाटत नाही… मधुबालावरचं कोर्टापर्यंत गेलेलं प्रेमप्रकरण तर तौबा कमाल आहे. रिस्पेक्ट करण्यासारखं…

“खोटं वाटेल पण मला आता आठवत नाही गं ते काय म्हणत होते.” नानाचं सद्गदित उत्तर आलं, “एक खूप मोठा कलाकार काही देत होता आणि मी ते कानातून, डोळ्यातून साठवण्याचा प्रयत्न करत होतो…”

नशीबवान आहेस नाना. आम्ही पामरं तर एखाद्या वीकेंडला ‘गंगा जमना’, ‘मधुमती’, ‘विधाता’, ‘सौदागर’, ‘शक्ती’ असं काहीतरी लावतो आणि या उत्तुंग सुंदर अभिनय दीपस्तंभाला कानातून, डोळ्यातून साठवण्याचा प्रयत्न करत रहातो…

#CinemaGully

  • भिडू गुरुदत्त सोनसुरकर

हे ही वाच भिडू-

 

Leave A Reply

Your email address will not be published.