दिलीप कुमार चाणक्य बनता बनता राहिले आणि धर्मेंद्रचं सगळ्यात मोठं स्वप्न अपूर्ण राहिलं

हिंदी सिनेमाच्या इतिहासात कधी कधी अनपेक्षित पणे काही योग जुळून येता येता काहीतरी गडबड होते आणि योगायोगाने आलेला तो सुवर्ण योग क्षणार्धात नष्ट होतो. त्याचीच हि कहाणी. अभिनय सम्राट दिलीप कुमार यांनी सत्तरच्या दशकामध्ये चरित्रात्मक भूमिका करायला सुरुवात केली होती. 

१९७६ साली त्यांचा ‘बैराग’ (दि. असित सेन) हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला होता. खरतरं हा सिनेमा खूप आधीच तयार झाला होता पण या ना त्या कारणाने त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडत गेले. नायक म्हणून भूमिका असलेला हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता. चांगली गाणी असूनही सिनेमा फ्लॉप झाला. दिलीपचे वाढलेले वय यात स्पष्ट दिसत होते. यानंतर काही दिवस विश्रांती घेवून १९८० पासून  मनोज कुमार यांच्या ‘क्रांती’ या चित्रपटापासून त्यांनी चरित्रात्मक भूमिका करायला सुरुवात केली. 

दिलीप कुमार अभिनयातील शेवटचा शब्द होता.

त्यांच्याकडून अनेक चरित्रात्मक भूमिकांची अपेक्षा रसिकांची वाढू लागली. आता मूळ मुद्द्यावर येवू यात. तर झालं काय सत्तरच्या दशकाच्या अखेरीस ख्यातनाम दिग्दर्शक बी आर चोपडा यांनी दिलीपकुमारला घेऊन ‘चाणक्य और चंद्रगुप्त ‘ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात चाणक्याच्या भूमिकेत दिलीपकुमार  आणि चंद्रगुप्त यांच्या भूमिकेमध्ये धर्मेंद्र असणार होते. 

धर्मेंद्र आणि दिलीप कुमार यांचा हा पहिलाच चित्रपट असणार होता. गंमत म्हणजे दिलीपकुमारचे सिनेमे बघूनच पंजाबातून धर्मेंद्र, हीरो बनण्यासाठी फ्रंटियर मेल ने पळून मुंबईला आले होते. आपल्या गुरु सोबत आपल्याला भूमिका करायला मिळणार याचा धर्मेंद्र यांना खूप आनंद झाला होता. 

चाणक्य भारतीत इतिहासातील मोठं नाव. मगध संस्थानात घडलेले हे इसविसन काळापूर्वीचे ऐतिहासिक कथानक. 

चाणक्य/कौटिल्य म्हणजे अर्थशास्त्र, समाज शास्त्र आणि राजशास्त्राचा आदर्श गुरु! राजधर्माचे पालन करायला शिकवणारा. दिलीपला हि भूमिका खूपच आव्हानात्मक असल्याने आवडली होती. चित्रपटासाठी मीटिंग सुरू झाल्या दिलीपकुमार आपल्या भूमिकेबाबत खूप दक्ष असतात त्यामुळे प्रत्येक मिटींगला ते स्वतः जातीने हजर राहू लागले.

दिलीप कुमार ला या भूमिकेसाठी संपूर्ण टक्कल दाखवणे गरजेचे होते. त्यासाठी इंग्लंडहून खास लाख रुपये खर्चून टकलाचा विग आणला गेला. हा विग आणण्यासाठी चोप्रांनी हॉलीवूड मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या मेकअप मन ला इंग्लंडला पाठविले होते. हा ‘बाल्ड विग’ घालण्यासाठी तब्बल तीन तासाचा अवधी लागत होता.

दिलीप कुमारचे विग घालून काढलेले फोटो त्याकाळच्या ‘स्टार अँड स्टाईल’ या मॅगझिन मध्ये मुखपृष्ठावर झळकले होते. 

दिलीपचा हा सर्वार्थाने वेगळाच लूक होता. रसिकांनाया लूक मधून खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. चाणक्य आणि चंद्रगुप्त इतिहासातील मोठे प्रकरण असले तरी दुर्दैवाने यावर चित्रपट कधी पूर्ण लांबीचा चित्रपट बनलाच नव्हता. 

(अजूनही नाही!) बी आर चोप्रा च्या निमित्ताने एका भव्य दिव्य अशा चित्रपटाची रसिकांना आस लागून राहिली. या चित्रपटात अन्य भूमिकांमध्ये हेमामालिनी, परवीन बाबी ,विजयेंद्र घाटगे यांच्या भूमिका होत्या. सर्व काही व्यवस्थित चालू होते. पण अचानक चित्रपटाच्या निर्मात्याला आर्थिक संकट आल्याने हा चित्रपट बनण्याची प्रक्रिया थांबली गेली. 

चित्रपटाचे बजेट मोठे असल्याने सारेच प्रश्न अवघड होवून गेले. रसिक प्रेक्षक मात्र एका मोठ्या भव्य स्वप्नापासून वंचित राहिले. खरे दुःख धर्मेंद्रला झाले होते कारण त्याच्यासाठी दिलीपकुमार स्क्रीन शेअर करणे हा त्याच्या साठी ड्रीम प्रोजेक्ट होता. पण दुर्दैवाने हा चित्रपट बनला नाही. 

दिलीप कुमारचे ‘चाणक्य’च्या गेटअप मधील फोटो हीच एकमेव आठवण या चित्रपटाची आता राहिली आहे. 

हा प्रोजेक्ट बंद झाल्यानंतर बी आर चोप्रा यांच्या डोक्यातून हा विषय काही जात नव्हता. १९८५  नंतर भारतामध्ये दूरदर्शन मालिकांचे युग सुरू झाले. १९८८ ला बी आर चोप्रा यांची ‘महाभारत’ ही बिग बजेट मालिका छोट्या पडद्यावर झळकली. यानंतर बी आर चोप्रा यांनी त्यांच्या डोक्यातील ‘चाणक्य’ हा विषय घेवून  एक मोठी दूरदर्शन मालिका करावयाचे ठरवले. तसा प्रस्ताव त्यांनी दूरदर्शन कडे पाठवला परंतु इथेही त्यांचे दुर्दैव आडवे आले. कारण त्यापूर्वीच दूरदर्शनने डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा ‘चाणक्य’ मालिकेचा प्रस्ताव स्वीकारला होता आणि १९९१ पासून ही मालिका दूरदर्शनवर रीतसर रुजू देखील झाली होती.

या मालिकेत डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी चाणक्याची उत्तम भूमिका केली होती. अशाप्रकारे दिलीप कुमार यांचा चाणक्य पहाणे हे भारतीय प्रेक्षकांच्या नशिबी नव्हतेच असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. मध्यंतरी टीव्ही वर या विषयावर एक मालिका आली होती आता अजय देवगण चाणक्य रुपेरी पडद्यावर साकारणार अशी बातमी आहे.

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.