जेव्हा कारगील युद्धात दिलीप कुमार मध्यस्थी करतात.

१९९९ सालच्या मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध ताणले गेले होते कारण पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. पाकिस्तानच्या कारगिलमधील घुसखोरीमुळे भारताला आणि तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना जबरदस्त धक्का बसला होता, कारण काही महिन्यांपूर्वीच वाजपेयींनी पाकिस्तान दौरा केला होता आणि या दौऱ्यात पाकिस्तानमध्ये वाजपेयी यांचं जोरदार स्वागत झालं होतं. दोन्ही देशादरम्यान शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरलं होतं. परंतु कारगिलमधील घुसखोरीमुळे या प्रयत्नांना तडा गेला.

दरम्यान कारगिल युद्धादरम्यानचा एक किस्सा असा की, पाकिस्तानने कारगिलमधील घुसखोरी बंद करावी आणि युद्ध थांबवावं यासाठी भारतीय पंतप्रधान वाजपेयींनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांचं बोलणं प्रख्यात बॉलीवूड अभिनेते दिलीप कुमार यांच्याशी घडवून आणलं होतं.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांनी नवाज शरीफ यांचे प्रधान सचिव राहिलेल्या सईद मेहदी यांच्या हवाल्याने आपल्या ‘नाईदर ए  हॉक, नॉर ए डव्ह’ या पुस्तकात हा किस्सा लिहिलाय. सईद मेहदी यांनीच हा किस्सा आपल्याला सांगितल्याचा दावा कसुरी यांनी केलाय.

kasuri

किस्सा असा की, मे १९९९ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी नवाज शरीफ यांना फोन केला आणि पाकिस्तानच्या कारगिलमधील कारवायांविषयी आपली नाराजी व्यक्त केली.

पाकिस्तान दौऱ्यात लाहोरमध्ये झालेल्या आपल्या जोरदार स्वागताच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून अशी काही अपेक्षा नव्हती असं वाजपेयी नवाज शरीफ यांना म्हणाले. नवाज शरीफ यांनी मात्र साळसूदपणाचा आव आणला. वाजपेयी नेमकं कशाविषयी बोलताहेत याची आपल्याला कल्पना नसल्याचं सांगत सेनाध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्याकडून योग्य ती माहिती घेऊन १५ मिनिटांनी आपण परत बोलू असं त्यांनी वाजपेयींना सांगितलं. शरीफ यांनी फोन ठेवण्यापूर्वी वाजपेयींनी त्यांना सांगितलं की,

“इथे माझ्या शेजारी कुणीतरी बसलेलंय, ज्यांची पाकिस्तानी पंतप्रधानांशी बोलण्याची इच्छा आहे”

“मियां साहाब, तुम्ही ‘भारत-पाकिस्तान’ यांच्या दरम्यान शांततेच्या संबंधाचे पुरस्कर्ते असल्याचा दावा कायमच करत आला आहात. त्यामुळे तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती”

दिलीप कुमार यांचे हे शब्द कानावर पडले आणि नवाज शरीफ यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

दिलीप कुमार यांचे नवाज शरीफ यांच्याबरोबर चांगले संबंध होते आणि पाकिस्तानमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. कारण दिलीप कुमार यांचा जन्म फाळणीपूर्वीच्या पेशावरमध्ये झाला होता आणि १९९८ मध्ये पाकिस्तानकडून दिलीप कुमार यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘निशान-ए-पाकिस्तान’ने देखील गौरविण्यात आलं होतं.

पुढे दिलीप कुमार नवाज शरीफांना म्हणाले की,

“एक भारतीय मुस्लीम म्हणून मला तुम्हाला सांगावसं वाटतं की जसंजसे भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमधले संबंध बिघडतात तसंतसं भारतातील मुस्लीमांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते. त्यांच्यावर ही वेळ येऊ नये यासाठी कृपया काहितरी करा आणि युद्ध थांबवा”.

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.