राजकुमार हिरानीला दिलीप प्रभावळकरांमध्ये महात्मा गांधी दिसले

आज दिलीप प्रभावळकरांचा वाढदिवस. एक बहुरुपी अभिनेता, एक दर्जेदार लेखक अशी दिलीप प्रभावळकरांची ओळख सांगता येईल. ‘एका खेळियाने’ हे दिलीप प्रभावळकरांचं आत्मचरित्र. आत्मचरित्राच्या नावाप्रमाणेच दिलीपजींनी त्यांच्या आयुष्यात अनेक यशस्वी प्रयोग केले. कधी त्यांनी लेखणीतुन ‘बोक्या सातबंडे’ला जन्माला आणलं, तर कधी सहा भुमिका एकाच नाटकात रंगवुन प्रेक्षकांची छान ‘हसवाफसवी’ केली.

आज भिडूंनो तुम्हाला ‘लगे रहो मुन्नाभाई’ मध्ये दिलीपजींच्या ध्यानीमनी नसताना त्यांना महात्मा गांधींची भुमिका कशी मिळाली, याचा किस्सा सांगणार आहे.

मुंबईच्या रुईया महाविद्यालयातुन विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर दिलीप प्रभावळकरांना संशोधन क्षेत्रात काहीतरी करुन दाखवायचं होतं. परंतु आयुष्यातली नागमोडी वळणं अनुभवुन दिलीप प्रभावळकरांना दूरदर्शनवरील ‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ हि पहिली मालिका मिळाली.

दूरदर्शनच्या मालिकेत काम करणारा पहिला कलाकार म्हणजे दिलीप प्रभावळकर. यानंतर दिलीप प्रभावळकरांची अभिनय क्षेत्रातली घोडदौड सुरु झाली. अनेक सिनेमे, मालिका, नाटकं अशा विविध माध्यमांमध्ये या खेळियाने अभिनयाची मुशाफिरी केली.

२००३ साली राजकुमार हिरानीने संजय दत्तला घेऊन ‘मुन्नाभाई एम. बी. बी. एस’ बनवला.

सिनेमा सुपरहिट झाला. दोन वर्षांनी राजू हिरानींनी या सिनेमाचा पुढचा भाग बनवायचा ठरवला. आधीच्या सिनेमापेक्षा या सिनेमाची संकल्पना वेगळी होती. थोडक्यात सांगायचं झालं तर, मुन्नाभाईंच्या आयुष्यात थेट महात्मा गांधी येतात आणि यानंतर मुन्नाभाईचं आयुष्य कसं बदलतं अशी सिनेमाची हटके गोष्ट.

पहिल्याच सिनेमातले संजय दत्त, अर्शद वारसी, बोमन इराणी हे कलाकार पुन्हा एकदा दुस-या भागात मुख्य भुमिकेत होते. हिरोईन होती विद्या बालन. ‘लगे रहो मुन्नाभाई’ मध्ये विद्या बालनच्या आजोबांचं ‘सेकंड इनिंग होम’ हे वृद्धाश्रमासारखं एक घर असतं. या घरात या आजोबांच्या जोडीला त्यांचे अनेक वयोवृद्ध मित्र राहत असतात.

यापैकी एका मित्राच्या भुमिकेसाठी राजु हिरानींनी दिलीप प्रभावळकरांना बोलावलं.

दिलीपजी राजू हिरानींना भेटायला आले. दिलीपजी स्क्रीप्ट वाचत असताना राजू हिरानी दिलीपजींचं सारखं निरीक्षण करत होते. राजूच्या अशा निरखुन बघण्याने दिलीपजी काहीसे गोंधळले. राजू दिलीपजींना म्हणाले,

“सर , ती स्क्रिप्ट बाजुला ठेवा. तुमची आपण गांधींच्या भुमिकेसाठी एक ट्रायल घेऊ.”

राजुचं हे बोलणं ऐकुन “मी गांधी कसा दिसेन?” असा प्रश्न दिलीपजींनी विचारला. “बघु तर आपण, तुम्ही तयार व्हा” असं उत्तर राजू हिरानींनी दिलं.

मेकअपमन विद्याधर भट्टे दिलीपजींना मेकअप करण्यासाठी घेऊन गेले. काही वेळाने दिलीपजी गांधींजींच्या पेहरावात बाहेर आले. राजू हिरानींनी त्यांना गांधीजींचे हावभाव करण्यास सांगीतलं. त्यावेळी जे सुचेल ते दिलीपजींनी केलं.

गांधीजी पाय दुमडुन जसे बसतात तसे बसले, गांधीजींचं झपझप चालणं त्यांनी दाखवलं. झालं.. तो दिवस संपला…

एक शरीरयष्टी सोडली तर माझ्यात गांधीजींसारखं काही नाही, याची दिलीपजींना खात्री होतं. त्यामुळे राजू हिरानींसमोर केलेल्या गोष्टी त्यांनी इतक्या लक्षात ठेवल्या नाहीत. दोन दिवसांनी दिलीपजींना ‘लगे रहो मुन्नाभाई’ चे निर्माते विधु विनोद चोप्रांचा फोन आला.

‘दिलीप साब तुम्ही या सिनेमातली गांधींची भुमिका करत आहात. तुम्ही दोन दिवसांपुर्वी गांधीजींचे जे हावभाव केलेत, ते आम्हाला प्रचंड आवडले. विशेषतः तुमच्या चेह-यावरचं निखळ हास्य गांधीजींच्या या भुमिकेसाठी खुप योग्य आहे.’

आणि अशाप्रकारे महात्मा गांधींच्या भुमिकेसाठी दिलीप प्रभावळकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. असं सांगण्यात येतं, त्यावेळी हिंदी सिनेसृष्टीतली मातब्बर नट मंडळी गांधींची भुमिका मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती.

मेकअपमन विद्याधर भट्टे शाॅटच्या आधी व्हॅनिटीमध्ये गांधीजींच्या भुमिकेसाठी दिलीपजींचा मेकअप करायचे.

अजुनही गांधींच्या भुमिकेत मी योग्य दिसतोय का, याबाबतीत दिलीपजी साशंक होते. दिलीपजींचा सिनेमाचा पहिलाच शाॅट. मुन्नाभाई, सर्कीट धोबीघाटच्या इथे बसलेले असतात. मुन्नाभाई बापुंचं स्मरण करतो आणि तिथे गांधीजी येतात. या शाॅटसाठी दिलीपजी बापुंच्या भुमिकेसाठी आले तेव्हा सिनेमात लकी सिंगची भुमिका साकारणा-या बोमन इराणींनी दिलीपजींना ओळखलं नाही.

बोमन इराणींच्या बोलक्या प्रतिक्रियेमुळे ‘मी गांधीजी दिसतोय’ असं दिलीपजींच्या मनात पक्क झालं. गांधीजींच्या भुमिकेत चेह-यावर प्रचंड मेकअप करुन अभिनय करणं, हे दिलीपजींसाठी थोडं कष्टाचं काम असलं तरीही त्यांनी इतरांना जाणवु दिलं नाही.

सिनेमाचं शुटींग पूर्ण झालं. दोन महिन्यानंतर फिल्मसिटीमध्ये ‘लगे रहो मुन्नाभाई’ चा प्रिमियर ठेवण्यात आला.

प्रीमियरला संजय दत्त आणि सिनेमाची संपुर्ण टीम उपस्थित होती. दिलीपजी सुद्धा प्रीमीयरला गेले. सिनेमाच्या संपुर्ण शुटींगमध्ये गांधीजींची भुमिका साकारणा-या दिलीपजींना मुळ रुपात संजय दत्तने पाहिलं नव्हतं. प्रीमीयरला साहाय्यक दिग्दर्शकाने दिलीपजींशी संजय दत्तची ओळख करुन दिली.

संजय दत्तला वाटलं की, कोणीतरी फॅन भेटायला आलं आहे. पण जेव्हा त्याला कळालं महात्मा गांधींची भुमिका साकारणारे दिलीप प्रभावळकर त्याच्या समोर उभे आहेत, तेव्हा संजय दिलीपजींकडे पाहतच राहिला. त्याने दिलीपजींना कडकडुन मिठी मारली.

‘लगे रहो मुन्नाभाई’ २००६ ला प्रदर्शित झाला.

गांधींच्या विचारांची नव्याने ओळख या सिनेमाने करुन दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी साकारणा-या दिलीप प्रभावळकरांचं सर्वत्र कौतुक झालं. या भुमिकेसाठी २००६ साली सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार दिलीपजींना मिळाला. दिलीप प्रभावळकरांच्या आजवरच्या अनेक भुमिकांमध्ये त्यांनी साकारलेली महात्मा गांधींची भुमिका कायम वरच्या स्थानावर असेल.

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.