मोहम्मद अलीची बॉक्सिंग भारताला वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरी हरवण्यास उपयोगी ठरली..

मोहोम्मद अली हा अमेरिकन बॉक्सर होता. तो किती भारी बॉक्सिंग करायचा हे त्याच्या टोपणनावावरूनच लक्षात येतं. त्याला दिलेलं टोपण नाव होतं, ‘दी ग्रेटेस्ट’. १९६० च्या सुमारास बॉक्सिंग करीअरची पहिली प्रोफेशनल मॅच खेळलेल्या मोहोम्मदने १९६३ पर्यंत १९ मॅचेस सलग जिंकल्या. त्यापैकी १५ मॅचेस या त्याने प्रतिस्पर्ध्याला नॉकआऊट करून जिंकल्या होत्या.

आजही जगातल्या सर्वोत्तम बॉक्सर्सच्या यादीत बरेच जण मोहम्मद अलीला सर्वोच्च स्थान देतात.

एकूण ६१ बॉक्सिंग मॅचेस खेळलेल्या मोहोम्मद अलीने ५६ मॅचेस जिंकल्या. त्यापैकीही ३७ मॅचेस त्याने समोरच्या बॉक्सरला नॉकआऊट करून जिंकल्या. स्वत: मात्र फक्त एकदाच नॉकआऊट झाला होता. अशा या जगातल्या सर्वोत्कृष्ट बॉक्सर्सपैकी एक असलेल्या मोहोम्मद अलीने अप्रत्यक्षरित्या भारताला वेस्ट इंडिज विरुद्धची क्रिकेट मॅच जिंकायला मदत केली होती.

दिलीप सरदेसाई भारताकडून टेस्ट खेळणारा पहिले खेळाडू. गोव्यातून आलेले एकमेव क्रिकेटर म्हणूनही दिलीप सरदेसाईंची ओळख होती. १९७१ हे साल दिलीप सरदेसाईंच्या क्रिकेट कारकिर्दीतील जवळपास शेवटचं साल म्हणून सगळीकडे हि चर्चा होती. पण त्यावेळी भारतीय संघाची धुरा नव्यानेच कर्णधार बनवण्यात आलेल्या अजित वाडेकरांवर होती.

अजित वाडेकर आणि दिलीप सरदेसाई हे कॉलेज काळापासून सोबत क्रिकेट खेळत आले होते. गुंडाप्पा विश्वनाथ जखमी झाल्याकारणाने संघाबाहेर होते तेव्हा वाडेकरांनी दिलीप सरदेसाईंना संधी दिली.

पहिलाच सामना असल्याने दिलीप सरदेसाईंवर दबाव होता. ज्यावेळी ते बॅटिंगला आले तेव्हा भारताचा अर्धा संघ तंबूत परतला होता आणि धावसंख्या ७५/५ अशी दयनीय झाली होती. दिलीप सरदेसाईंसोबत दुसऱ्या एंडला एकनाथ सोलकर खेळत होते.

सरदेसाई त्यांना म्हणाले कि , वेस्ट इंडिजची वेगवान गोलंदाजी मी १९६२ ला बघितली होती. त्यामानाने त्यांची आत्ताची बॉलिंग म्हणजे पोपटवाडी आहे. पोपटवाडी म्हणजे एकदम लेचापेचा. अशा प्रकारे धीराने त्यांनी बॅटिंग सुरु केली.

ज्यावेळी नवीन चेंडू घेतला गेला तेव्हा दिलीप सरदेसाईंना वाटलं कि आता वेगवान गोलंदाज बॉलिंग करतील. विंडीजच्या पेस अटॅकची भीती वाटण्याचं कारण सरदेसाईंना अगोदरच कळलं होतं कारण एकनाथ सोलकर यांची विकेट लवकर जाणार होती. सध्यातरी स्पिन बॉलिंग सुरु होती.

मग यावर दिलीप सरदेसाईंनी एक प्लॅन केला आणि एकनाथ सोलकरांना सांगितलं कि,

स्पिनरच्या प्रत्येक चेंडूवर शॉट मारायचा प्रयत्न करू नको , काही बॉल सोडून दे आणि सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात बॉलरला म्हण कि वेल बॉल.

विकेट मिळेना म्हणून विंडीजचे कर्णधार गॅरी सोबर्स स्वतः बॉलिंगला आले. ते स्पिनर होते. प्रत्येक ओव्हरमध्ये फक्त एकच बाउंड्री मारली जात होती आणि बाकी सगळे बॉल मिस केले जात होते. दोन्ही फलंदाज बॉलरच्या गोलंदाजीचं कौतुक करत होते. यावर वेस्ट इंडिजची टीम पेचात पडली आणि विकेट पडेल या आशेने फक्त स्पिनरकडूनच बॉलिंग करवून घेऊ लागली.

या सगळ्या स्पिन डिपार्टमेंटला कामाला लावून दिलीप सरदेसाईंनी २१२ धावांची अविस्मरणीय खेळी केली. सामना अनिर्णित करण्यात भारताला यश आलं.

विंडीज दौऱ्याला जाण्याआधी भारतीय संघ न्यूयॉर्कहून फ्लाईटने वेस्ट विंडीजला पोहचणार होता. वेस्ट इंडिज हा खूप मोठा आणि बलाढ्य संघ आहे याने सगळेच खेळाडू दाबत होते आणि नर्व्हस दिसत होते. त्यावेळी संघाचं मनोबल वाढावं म्हणून भारतीय संघाने मोहम्मद अली यांची बॉक्सिंग मॅच पाहून जाण्याचा निर्णय घेतला.

ती एक ऐतिहासिक मॅच होती जो फ्रेझर आणि मोहम्मद अली यांच्यामध्ये वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिपसाठीची. या मॅच मध्ये २५ नॉकआऊट सोबत असलेले मोहम्मद अली जो फ्रेझरकडून अत्यंत वाईटरित्या पराभूत झाले. सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जाऊ लागलं.

या मॅच मधून सरदेसाईंनी प्रेरणा घेतली आणि खेळाडूंना सांगितलं कि फ्रेझर मोहम्मद अलीला हरवू शकतो तर आपणही वेस्ट इंडिजला हरवू शकतो.

घडलंही तसंच. पुढच्याच सामन्यात अजून एक शतक ठोकत दिलीप सरदेसाईंनी आपली फलंदाजी दाखवून दिली. त्यावेळी भारताने इतिहास रचला विंडीजला त्यांच्याच घरात जाऊन हरवून आला.

सिरीजमधला चौथा सामना. बार्बाडोसमध्ये हा सामना खेळवला जाणार होता. एअरपोर्टवर जेव्हा टीम उतरली तिथल्या कस्टम अधिकाऱ्याने दिलीप सरदेसाईंना विचारलं कि शहरात जाण्याअगोदर सोबत घेऊन आलेलं सामान तुम्हाला काही किमती सामान डिक्लेर करायचं आहे का ? यावर सरदेसाईंनी सांगितलं कि,

मला माझ्या रनांशिवाय दुसरं काहीही डिक्लेर करायचं नाहीए. पहिल्या दोन तीन सामन्यात मी जितके रन केले आहे त्यात अजून भरपूर धावांची भर टाकूनच मी परत जाणार आहे.

या सामन्यातही भारत पुन्हा अडचणीत सापडला असता एकनाथ सोलकर आणि दिलीप सरदेसाईंनी चांगली खेळी करून भारताला सुस्थितीत नेऊन ठेवलं. याही सामन्यात दिलीप सरदेसाईंनी दीडशतक केलं आणि सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं.

दिलीप सरदेसाई यांचं क्रिकेटवर असणार प्रेम सर्वश्रुत होतं. एकदा बॅटिंगला गेल्यावर बॉलर हा फक्त झोडपण्याची गोष्ट आहे असा खाक्या त्यांचा असायचा.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.