कोहलीला संघात घेतल्यामुळं मराठमोळ्या वेंगसरकरांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता…

जवळपास सहा फुटाची उंची, धिप्पाड खांदे, रुंद छाती, चालण्यात ऐट, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि एकदा बॅटिंगला आला की, मॅच बघणाऱ्याला खुर्चीवरुन हलू न देणारा माणूस म्हणजे दिलीप वेंगसरकर. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये वाढलेला आणि आपल्या खेळाच्या जोरावर पार भारताचा कॅप्टन बनलेला वेंगसरकर आत्ता आया असलेल्या पोरींचा क्रश होता.

त्याच्या खेळात इतकी ताकद होती, की जगातल्या कित्येक तगड्या बॉलर्सना त्यानं फोडून काढलं. ८३ पिक्चरमध्ये जेव्हा वेंगसरकरला बॉल लागण्याचा सिन दाखवला, तेव्हा थिएटरमधले अनेक जण हळहळले. एक मराठी माणूस एवढी मोठी मजल मारतोय म्हणल्यावर साहजिकच तो सगळ्या महाराष्ट्राचा ‘आपला वेंगसरकर’ ठरला होता.

वेंगसरकरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर बरंच काही आहे. पण आतापण हायलाईट्स बघू.

कित्येक वर्ष त्यानं भारतासाठी तीन नंबरला बॅटिंग केली. संघात कितीही भारी खेळाडू असले, तरी तीन नंबरला खेळणारा आणि हा नंबर टिकवणारा खरा बादशहा असतो. त्याच्या शॉट्समध्ये ताकद तर असायचीच, पण लष्करी शिस्तही. मुंबई स्कुल ऑफ क्रिकेटचं खडूसपण त्याच्या बॅटिंगमध्ये भिनलेलं असलं, तरी स्वभावात मात्र नव्हतं. संघाला गरज असली, की त्याची बॅट हमखास बोलायची. 

याचमुळं त्याला नाव पडलं, ‘कर्नल.’

क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर एक सेंच्युरी मारणं हे प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न असतं. सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, विराट कोहली, जॅक्स कॅलिस अशा कित्येक दिग्गजांना आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये लॉर्ड्सवर शंभर लावता आला नाही. वेंगसरकरनं मात्र हे स्वप्न तीनदा पूर्ण केलं. 

विशेष म्हणजे, पहिल्यांदा १९७९ मध्ये वेंगसरकर लॉर्ड्सवर खेळताना शून्यावर आऊट झालेला. मात्र त्याच मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं खणखणीत १०३ रन्स केले. १९८२ मध्ये हे आकडे २ आणि १५७ असे होते. तर १९८६ मध्ये १२६* आणि ३३ असे. थोडक्यात काय तर त्यानं लॉर्ड्सवरच्या आपल्या सलग तिन्ही टेस्ट मॅचेसमध्ये शतकाला गवसणी घातली. १९९० मध्ये त्यानं शतक केलेलं नसलं, तरी ५० मात्र मारलीच.

लॉर्ड्सवरच्या या झंझावातामुळं वेंगसरकर ‘लॉर्ड ऑफ लॉर्ड्स’ या नावानं ओळखला जाऊ लागला.

वेंगसरकरनंतर आपल्या बॅटिंगनं नाही, पण आपल्या नेतृत्वानं लॉर्ड्स गाजवणारा कार्यकर्ता म्हणजे विराट कोहली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटनं अनेक विक्रम रचले आणि स्वतःची आणि भारताची वेगळी ओळखही बनवली. पण विराट भारतीय संघात आला.

 याचं श्रेय जातं, दिलीप वेंगसरकर ‘सरां’ना.

ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा वेंगसरकर भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष होते. तरण्याताठ्या विराट कोहलीचं नाव तेव्हा गाजत होतं. पण वेंगसरकरांनी या हिऱ्याची पारख तो १५ वर्षांचा असतानाच केली होती. 

कोहली अंडर-१६ टूर्नामेंटमध्ये खेळत असताना, वेंगसरकरांनी त्याचा खेळ बघितला होता. पुढं २००८ मध्ये त्याच्या नेतृत्वात भारताच्या अंडर-१९ संघानं वर्ल्डकप जिंकला, तेव्हा निम्म्या भारताला कोहलीचं नाव समजलं. त्यानंतर इमर्जिंग प्लेअर्स टूर्नामेंट होती. कोहलीची त्या संघात निवड झाली आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये ओपनिंगला येत त्यानं नॉटआऊट १२० रन्स केले. कोहलीचा स्वभाव आक्रमक असला, तरी त्याची बॅटिंग, प्रगल्भता आणि डेडिकेशन बघून मैदानात उपस्थित असलेले वेंगसरकर प्रभावित झाले.

जेव्हा श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली तेव्हा त्यात दोन नावं होती, 

विराट कोहली आणि एस. बद्रीनाथ.

कोहली त्या सिरीजमध्ये पाचही मॅचेस खेळला, त्यात एक फिफ्टी मारली. तर बद्रीनाथला तीन मॅचेसमध्ये संधी मिळाली ज्यात त्याचा हायस्कोअर होता २७.

विराटच्या बॅटिंगचं सगळ्याच स्तरांमधून कौतुक होतं, पण तेव्हा बीसीसीआयचे खजिनदार असलेले, एन. श्रीनिवासन मात्र नाराज होते. त्यांच्यात आणि वेंगसरकरांमध्ये झालेला संवाद स्वतः वेंगसरकरांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितला होता.

“श्रीनिवासन माझ्याकडे आले आणि मला बद्रीनाथला संघात न घेण्याचं कारण विचारलं. मी त्यांना सांगितलं की, तो कोहली तरुण आहे आणि त्यानं ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या स्पर्धेत जबरदस्त बॅटिंग केलीये. म्हणून तो संघात आहे. यावर श्रीनिवासन म्हणाले, बद्रीनाथनं तमिळनाडूसाठी ८०० रन्स केलेत, तो २९ वर्षांचा आहे. त्याला आत्ता चान्स नाही मिळणार तर कधी मिळणार?”

यावर वेंगसरकरांनी उत्तर दिलं, ”त्याला चान्स नक्की मिळेल, फक्त कधी मिळेल हे माहीत नाही.”

आता बद्रीनाथ होता तमिळनाडूचा आणि त्यातही चेन्नई सुपर किंग्सचा प्लेअर. श्रीनिवासन आणि चेन्नई सुपर किंग्सचं नातं अगदी जिव्हाळ्याचं. साहजिकच बद्रीनाथला न घेणं त्यांच्या जिव्हारी लागलेलं.

वेंगसरकर पुढं सांगतात, “दुसऱ्याच दिवशी श्रीनिवासन माजी भारतीय क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत यांना घेऊन तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गेले. आणि माझी निवड समिती अध्यक्ष म्हणून असलेली कारकीर्द संपुष्टात आली. माझाच टीममेट असलेल्या श्रीकांतनं माझी जागा घेतली.”

बद्रीनाथ भारताकडून एकूण १० मॅचेस खेळला. फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये त्यानं चांगलं यश मिळवलं असलं, तरी आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो म्हणावी तशी चमक दाखवू शकला नाही. दुसऱ्या बाजूला विराट कोहलीनं मात्र इतिहास लिहिला, त्यानं वेंगसरकरांची पारख आणि आपली निवड सार्थ ठरवली. 

क्रिकेटमध्ये जर-तरला महत्त्व नसतं, पण वेंगसरकरांनी स्वतःच्या पदाचा विचार करुन विराटला डावललं असतं, तर सगळं क्रिकेटविश्व ‘किंग कोहली’ ला मुकलं असतं. आपल्या बॅटिंगमधली लष्करी शिस्त ‘कर्नल’ वेंगसरकरांनी आयुष्यातही जपली आणि क्रिकेट जगताला किंग कोहली मिळाला.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.