दिलीपकुमार यांचं देशप्रेम किती टोकाचं होतं ते पुण्यात घडलेल्या एका प्रसंगावरून कळतं

अनेक क्रांतीकारकांनी भारतभुमीला ब्रिटीशांच्या पारतंत्र्यातुन मुक्त करण्यासाठी झुंजार संघर्ष केला. प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती दिली. तो काळच असा होता की, आपला देश ब्रिटीशांच्या तावडीतुन मुक्त होण्यासाठी सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करत होते. ब्रिटीशांकडून देशाचा अपमान होत असेल तर नागरीकांचं ब्रिटीशांविरोधात रक्त खवळायचं.

अभिनेते दिलीप कुमार यांच्या बाबतीत घडलेला असाच एक किस्सा घडला होता.

दिलीप कुमार यांचं मुळ नाव युसुफ खान.

हि गोष्ट तेव्हाची जेव्हा युसुफ खान सिनेमाक्षेत्रात येऊन दिलीप कुमार झाला नव्हता. दिलीप कुमार यांचा जन्म १९२२ सालचा. तुम्हाला माहित नसेल कदाचित, पण दिलीप कुमारचा सिनेमासृष्टीत प्रवेश होण्यासाठी पुणे शहराचं मोठं योगदान आहे. स्वातंत्र्यपुर्व काळातच १९४४ साली दिलीप कुमार यांचा ‘ज्वार भाटा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

दिलीप कुमार यांचं सुरुवातीचं जीवन आर्थिकदृष्ट्या अडचणीचं गेलं. युसुफच्या वडिलांचा फळांचा छोटासा व्यवसाय होता. युसुफ वडिलांना या व्यवसायात थोडीफार मदत करायचा. एके दिवशी युसुफची वडिलांसोबत कोणत्यातरी कारणावरुन भांडणं झाली. भांडणं इतकी टोकाला गेली की, युसुफने राहतं घर सोडुन थेट पुणे गाठलं.

पुण्याला येऊन एका कँटीनमध्ये युसुफ कामाला लागला.

कँटीनमध्ये संध्याकाळपर्यंत काम केल्यानंतर युसुफ जवळच्या एका मैदानात फेरफटका मारायला जायचा. मैदानात ब्रिटीश गोरे शिपाई त्याचवेळी फुटबाॅल खेळत असत. युसुफलाही फुटबाॅल खेळण्याची आवड होती. त्यामुळे खुप वेळ तो ब्रिटीश शिपाई फुटबाॅल खेळताना पाहत बसायचा.

कँटीनचं काम संपल्यावर दररोज मैदानात जाऊन ब्रिटीशांचा फुटबाॅलचा खेळ पाहणं, हा युसुफच्या रोजच्या दिनक्रमाचा एक भाग झाला.

दररोज कोणतरी तरुण आपला खेळ पाहतोय, हे तिथल्या ब्रिटीशांच्या निरीक्षणात आलं होतं. एके दिवशी संध्याकाळी युसुफ फुटबाॅल बघायला मैदानात आल्यावर ब्रिटीश शिपाई फुटबाॅल खेळायचे थांबले. त्यांनी युसुफला खुणेने बोलावलं. युसुफ त्यांच्याजवळ जाताच त्यांची एकमेकांशी ओळख झाली. या तरुणाला फुटबाॅल खेळायची आवड आहे, हे जाणताच ब्रिटीशांनी युसुफला त्यांच्या टीममध्ये खेळण्याचं आमंत्रण दिलं.

‘कोणासोबत का होईना फुटबाॅल खेळायला मिळणार’, या विचाराने युसुफ ब्रिटीशांसोबत खेळण्यास तयार झाला.

दररोज संध्याकाळी कँटीनचं काम संपवल्यावर युसुफ स्वतःची फुटबाॅलची हौस ब्रिटीशांसोबत खेळुन पूर्ण करायचा. एके दिवशी युसुफ संध्याकाळी फुटबाॅल खेळण्यासाठी भारत देशाची महानता दर्शवणारं एक शर्ट घालुन आला.

ब्रिटीश शिपाई सुरुवातीला युसुफच्या शर्टाकडे बघत राहिले. शेवटी भारतावर राज्य करणारे ब्रिटीशच ते! कितीही चांगले वागत असले तरीही युसुफचं शर्ट बघुन त्यांची चिडचीड झाली. युसुफ खेळायला येताच ब्रिटीश शिपायांपैकी एकाने भारताबद्दल अपमानास्पद शब्द उच्चारले.

हे ऐकुन युसुफला प्रचंड राग आला. अपमानास्पद शब्द उच्चारलेल्या ब्रिटीश शिपायाच्या अंगावर युसुफ धावुन गेला.

युसुफने त्या ब्रिटीश शिपायला लाथाबुक्क्यांनी तुडवलं. इतर शिपायांनी युसुफला आवरण्याचा प्रयत्न केला. पण रागाने लालबुंद झालेल्या युसुफला आवरणं ब्रिटीशांना कठीण गेलं. हे प्रकरण पुढे वाढलं. ब्रिटीश शिपायाला मारल्याप्रकरणी युसुफला जेलमध्ये डांबण्यात आलं.

“तुम्ही झाल्या प्रकाराची माफी मागा. पुन्हा कोणाही ब्रिटीश शिपायावर हात उगारणार नाही असं कबुल करा. तुम्हाला लगेच सोडण्यात येईल.”

असं ब्रिटीशांकडून युसुफला सांगण्यात आलं. त्यावेळी ठामपणे ब्रिटीश अधिका-यांना युसुफ म्हणाला,

“तुम्ही माझ्या आईसमान असलेल्या भारतमातेचा अपमान केला आहे. माझ्या देशावर तुम्ही कडवी टिका केलीय. पुन्हा जर असं केलंत तर एकदाच काय, दहावेळा तुम्हाला मारेन.”

युसुफ आवेशाने ब्रिटीश जेलरच्या नजरेला नजर देत बोलत होता.

असं सांगण्यात येतं की, ब्रिटीश शिपायाची माफी न मागितल्यामुळे युसुफला काही काळ तुरुंगात राहावं लागलं. पुढे युसुफने सिनेसृष्टीत प्रवेश घेतल्यावर दिलीप कुमार नावाने सगळ्यांमध्ये लोकप्रिय झाला. पण त्यावेळी युसुफ अर्थात दिलीप कुमारांनी देशप्रेमाच्या भावनेने ब्रिटीश शिपायाविरुद्ध दोन हात केल्यामुळे, रियल लाईफमध्ये दिलीपजी किती महान कलाकार होते, याची जाणीव होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.