मधुबाला आणि दिलीपकुमारच्या प्रेमातला शाकाल…

 

पोरगीचा बाप !!! आहा काय नाव काढलय.. आर्टिकल वाचू का बाहेर पडू अशा दांडग्या इच्छा आल्या असतील. सासरा कसा असतो, पोरगीचा बाप कसा असतो.. ही काय वाचायची गोष्ट आहे का ?  गाढवाच्या मागणं आणि पोरगीच्या बापाच्या पुढणं कधी जायचं नसतं अस म्हणतात. खर खोटं तुम्हालाच माहीत पण पोरगीचा बाप किती डोक्याला ताप असतोय हे सांगणारा हा किस्सा. तो पण कुण्या साध्या सुध्या माणसाचा नाही तर खुद्द दिलीपकुमारच्या होणाऱ्या सासऱ्याचा. बर यातली उच्चतम्म पातळी अशी की हा सासरा पण कोण होता तर मधुबालाचा बाप… अताउल्लाह खानं उर्फ शाकाल.

तर किस्सा असा की, दिलीप कुमार  त्यावेळी खराखुरा शहेजादां होता. म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातनं नाय म्हणलं तर दिलीपकुमारला शे पाचशे तोळे हुंडा, आठ दहा फॉर्च्युनर आणि घ्या जावयबापू उद्यापसनं हा कारखाना आणि ह्यो मतदारसंघ तुमचा असली ऑफर डोळे झाकुन मिळाली असती असा हा जावई.

मार्केटमध्ये इतका दर असणाऱ्या दिलीपकुमारला प्यार झाला तो पण मधुबालावर. आत्ता मधुबाला काय होती ते वेगळं सांगायची गरज नाही. मधुबालाला फक्त सुपारीच्या खांडावर कोणीही करुन घ्यायला एका पायावर तयार होतं.. तर काय झालेलं या दोघांच सुत जुळलेलं आणि ते लग्न करणार होते पण मध्ये होता तो शाकाल.

सुरवातीला शाकाल दिलीप कुमार सारखा जावई मिळतोय म्हणल्यावर तयार झाला. आपल्या पोरगीच्या पसंतीला ठिकाय बघू, म्हणून त्यानं पाठिंबा दिला. पोरगीनं निवडलेल्या पोराचा स्टारडम बघून शाकालच्या मनात एक आयड्या आली त्यानं पोरगी आणि होणारा जावई या दोघांना घेवून एक पिक्चर काढायची आयड्या काढली आणि दिलीप कुमारला तस सांगितलं. पण दिलीप कुमार स्त्रीमुक्तीवाल्यांचा कर्दनकाळ होता. त्यानं मधुबाला लग्न झाल्यावर बाहेर सोडणार नाही अस सांगितलं. तिनं चुलं आणि मुलं बघायचं पिक्चरची स्वप्न रंगवायची नाहीत असला खतरनाक स्टॅण्ड दिलीपकुमारनं घेतला.

सासऱ्याच्या पिक्चरमध्ये काम करण्यास नकार देवून दिलीपकुमारनं स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला. शाकाल चिडला आणि योग्य वेळी याचा वचपा काढायची वाट पाहू लागला. नेमकं याच वेळी बॉलिवुडचा दिलों का बादशहां समजलां जाणारा बी. आर. चोप्रा “नया दौर” नावाचा पिक्चर काढत होता. त्यांनी दिलीप कुमार आणि मधुबालाला घेवून हा सिमेमा साईन केला. मधुबालानं सिनेमा साईन केला आणि पैसे घेतले. बापाला हे समजलं बाप म्हणाला, “ माझ्या पिक्चरला नाही म्हणतो आणि त्या चोप्राच्या पिक्चरला उड्या मारत साईन करतोय की. शाकालनं पोरगीला सांगितलं पिक्चर करायचा नाही. त्यासाठी कारण काय दिलं तर शुटिंगसाठी माझ्या पोरगीला बाहेर जायला लागेल ते तिला जमणार नाही. मधुबालानं बी. आर. चोप्राला तस कळवलं.

आत्ता याठिकाणी सांगण्यासारखा मुद्दा म्हणजे, या सगळ्या राड्यात बी.आर. चोप्रांचा इगो हर्ट झाला. त्यांनी एक नव कांड केलं. त्यांनी आपल्या पिक्चरची जाहिरात पेपरमध्ये दिली आणि त्यात मधुबालाच्या नावापुढं क्रॉस करुन तिथं वैंजतीमालाच नाव घुसवलं.
हि जाहिरात मधुबालानं वाचली.मधुबालानं लगेच पेपरात दूसरी जाहिरात दिली. त्यात ती करत असणाऱ्या पिक्चरची यादी दिली आणि नया दौंर वर क्रॉस केलं. क्रॉसचा बदला क्रॉसन.

हे चांगल गाजायला लागलेलं कांड शेवटी कोर्टात पोहचलं. आपले शाकाल कोर्टाला म्हणाले की, “ह्यांनीच आमची बदनामी चालू केल्या. माझ्या पोरीला ह्यांनीच पिक्चरमधून काढून टाकलं.”

तर तिकडं बी.आर. चोप्रा म्हणाले, “साहेब ह्याच्या अंगातच लय मस्तीए. ह्यांन पोरगीला पिक्चरमधनं काढलं ते काढलं वर घेतलेले पैसे पण परत देईना.

कोर्टानं शाकालला पैसे परत करायला लावले आणि प्रकरण मिटवलं. या सगळ्या राड्यात आपल्या दिलीपकुमारची पण साक्ष झाली. त्यावेळी दिलीप कुमारनं मधुबालाकडं बघत डॉयलॉग हाणला, “मैं इस औंरत से प्यार करतां हू औंर अपनें मौत के दिन तक करता रहूंगां”

एका शाकालचा पिक्चर केला नाही म्हणून इतका गुत्ता झाला. आत्ता हि गोष्ट कशासाठी तर दिलीपकुमार वाचला नाही तिथं तुम्ही आम्ही कोण वो..