पवारांनी बँकेत चिकटवलेला तरुण आज राज्याच्या गृहमंत्रीपदी पोहचलाय..

सत्तरच्या दशकातला काळ. शरद पवार तेव्हा राज्यातले तरुण मंत्री होते. यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र म्हणून त्यांना ओळखलं जायचं. अगदी कमी वयात त्यांनी राज्याच्या राजकारणात मोठी छाप पाडली होती. फक्त युथ काँग्रेसचं नाही तर महाराष्ट्राचा गृहराज्यमंत्री अशी महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आली होती.

एकदा शरद पवार यांच्या भेटीला शिरूर आंबेगावचे माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील मुंबईला आले. त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा दिलीप होता. पवारांनी चौकशी केली. दत्तात्रयराव वळसे पाटील म्हणाले,

“पोरगा बीए झालाय. त्याची कुठे तरी नोकरीची व्यवस्था करा.”

खरं तर दिलीप वळसे पाटील यांनी बीए नंतर कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं होत. मुंबईत त्यांना मास्टर्स पूर्ण करायचं होतं. पण वडिलांचा आदेश असल्यामुळे काही बोलता येत नव्हतं. पवारांनी जरा त्यांची चौकशी केली. मुलगा हुशार आहे , चुणचुणीत आहे ओळखून त्यांनी राज्य शंकर बँकेचे तेव्हाचे अध्यक्ष अकोल्याचे नानासाहेब सपकाळ यांना फोन लावला. त्यांना म्हणाले,

” नानासाहेब आपला घरातला मुलगा आहे. बघा बँकेत कुठंतरी”

कार्यकर्त्यांना सहकारी संस्थांवर चिकटवणे ही त्याकाळात सर्रास चालणारी पद्धत होती.  पवारांच्या शिफारसी मुळे दिलीपराव वळसे पाटलांना राज्य सहकारी बँकेत सहज नोकरी मिळाली.

या गोष्टीला सात आठ दिवस झाले असतील. एकदा पवारांची आणि नानासाहेब सपकाळ यांची काही तरी कामाच्या निमित्ताने भेट झाली. पवारांनी त्यांच्याकडे वळसे पाटलांच्या मुलाची चौकशी केली. सपकाळ म्हणले,

“तुम्ही मुलगा पाठवला होता पण त्याने मला नंतर येऊन सांगितलं कि त्याला काही नोकरी करायची नाही.”

शरद पवार यांना गंमत वाटली. खरं तर दिलीपराव वळसे पाटलांना नोकरी करायचीच नव्हती मात्र वडील आणि पवार साहेब यांच्या समोर कस बोलायचं म्हणून ते गप्प होते. पण नंतर जाऊन त्यांनी नानासाहेब सपकाळ यांना मला बँकेतली नोकरी नको असं सांगून आले होते.

पुढे काही वर्ष उलटून गेली. शरद पवार यांनी काँग्रेस सोडली, पुलोदची मोट बांधत राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. काही काळ हे पद यशस्वीरीत्या सांभाळलं देखील. पण केंद्रात इंदिरा गांधींची सत्ता आली आणि त्यांनी हे सरकार रद्द केलं. पुन्हा निवडणूक झाल्या, काँग्रेसची सत्ता आली.

इंदिरा काँग्रेसचे ए.आर.अंतुले मुख्यमंत्री बनले तर शरद पवार राज्याचे विरोधी पक्ष नेते बनले. या काळात त्यांना विश्वासू स्वीय सहाय्यकाची आवश्यकता होती. यावेळी मात्र दिलीपराव वळसे पाटील या नोकरी साठी पुढे आले. साहेबांचा पीए म्हणून काम केल्यास आपल्याला प्रशासकीय कामाचा अनुभव मिळेल, राजकारण जवळून पाहता येईल, मोठ्या व मातब्बर नेत्यांचा सहवास लाभेल हा विचार समोर ठेवून ते शरद पवारांना भेटले आणि मला या नोकरीवर घ्या अशी विनंती केली.

शरद पवारांनी त्यांना आपला स्वीय सहायक बनवलं.

ऐंशीच्या दशकातला हा काळ. राज्यात प्रचंड उलथापालथ होत होती. सत्तेच्या उबेसाठी पवारांच्या सोबत काँग्रेसमधून बाहेर पडलेले आमदार विरोधात गेल्यावर सत्तेसाठी तडफडू लागले. अंतुले आणि  जोरदार फिल्डिंग लागली होती. देशाचे भविष्य इंदिरा गांधींच्या हातात आहे असं म्हणत पवारांच्या पक्षातील अनेक आमदार पक्ष सोडून काँग्रेस मध्ये गेले.

शरद पवार तेव्हा प्रदेश दौऱ्यावर होते. तिथे त्यांना कळलं कि आपल्या पक्षातील ६० पैकी आता फक्त ६च आमदार शिल्लक राहिले आहेत. पवारांनी मुंबईला परत आल्या आल्या पक्ष पुनर्बांधणी हातात घेतली. त्यासाठी राज्यभर दौरा काढला. एकच गोष्ट डोळ्यासमोर होती,

“लोकांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी सुसंवाद साधायचा.सगळं पुन्हा उभं करायचं.”

थंडी ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता एका साध्या जीपमधून त्यांचे दौरे सुरु झाले. भामरागड पासून सुरु झालेला दौरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेवटच्या गावापर्यंत जाऊन संपला. या काळात त्यांच्या सावलीसारखे सोबत होते ते म्हणजे दिलीपराव वळसे पाटील.

१९८१ साली सुरु झालेलं शरद पवारांच्या सहायक पदाच काम वळसे पाटलांनी तब्बल आठ वर्ष सांभाळलं. या काळातील अनुभवाची राजकारणाची शिदोरी पक्की केली. विरोधात असताना आंदोलने केली. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. शरद पवारांनी देखील आपल्या संकटाच्या काळात अंतर न देणाऱ्या सहकाऱ्याची साथ कधी सोडली नाही.

पुढे जेव्हा शरद पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यांनी दिलीपराव वळसे पाटलांना बोलावून घेतलं आणि विचारलं,

“तुला राजकारणात यायचं आहे की मंत्रालयात काम करायचं आहे?”

त्या दिवशी दिलीपराव वळसे पाटलांची दुसरी इनिंग सुरु झाली. त्यांना आमदारकीच तिकीट मिळालं. १९९० साली जेष्ठ आणि लोकप्रिय आमदार किसन राव बाणखेले यांना हरवून ते विधानसभेत आले, तिथून त्यांनी कधी माग वळून पाहिलं नाही.

आज त्यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.