दीनानाथ मंगेशकर म्हणायचे, “एक दिवस अख्खा गोवा पोर्तुगिजांकडून विकत घेवून दाखवेल”

जेष्ठ नाट्यसंगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर लहान असतानाच एक प्रसंग. तो त्यांच्या शिकण्याचा काळ होता. त्यांचा आवाज ऐकून बरेचदा त्यांना सांगितलं जायचं,

“अरे तू नारायणराव बालगंधर्व पद म्हणत जा. लोकांना खूप आवडत. तुझे त्यामुळे जास्त नाव होईल”

पण या वाक्यावर ते लहान वयातही ताडकन उत्तर दयायचे.

“मला प्रसिद्धी मिळेल ती गंधर्वाची गाणी चांगली गातो” म्हणून मला तस नको आहे. मला कोणाची नक्कल करावयाची नाही. मला माझं स्वत:च गाणं गायचं आहे.

मास्टर दीनानाथांचा आत्मविश्वास कमालीचा होता. आणि याच आत्मविश्वासावर त्यांनी ३ दशक नाट्यसंगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवले. समाजात घडणार्‍या घटनांचा इतिहास त्यांनी त्यातून दाखवला. कालौघात चित्रपट सृष्टी विस्तारल्यानंतर तिकडे समाज वाळू लागला पण मास्टर मंगेशकरांनी रचलेल्या नाट्यसंगीताच्या भक्कम पायामुळेच आज महाराष्ट्रात नाटक, रंगभूमी यांची वेगळी ओळख टिकून आहे.

नाटकांव्यतिरिक्त त्यांच्या आत्मविश्वासाचा असाच आणखी किस्सा सांगितलं जातो. तो म्हणजे पोर्तुगीजांकडून अखंड गोवाच विकत घेण्याचा. 

दीनानाथ मंगेशकर मूळचे गोव्याचे. नारळ सुपारीच्या बागा, केळी, काजू, कोकम, रातंबे, इत्यादी वृक्षांची घनदाट शोभा, हिरवी गर्द अरण्ये, काळेभोर कडे, नद्यांच्या व खाड्यांचे नागमोडी व गडद निळे प्रवाह यातून पांढरी शुभ्र शिडे डोलवीत जाणारे पडाव. नारळी पोकळीच्या रांगा, मशागत केलेली शेती, लालभडक माती, आणि अशा ठिकाणी कलाप्रेमानी भरलेल्या आणि निसर्ग सौदर्यात नटलेल्या मंगेशीच्या परिसरात दीनानाथांचे बालपण गेले.

त्यामुळेच त्यांचं गोव्यावर विशेष प्रेम होतं. 

पुढे नाट्यसंगीतामधील त्यांची लहानपणीची चमक बघून त्यावेळी एकदम तीन कंपन्यांची बोलावणी आली. पण आईच्या सल्ल्याने दीनानाथांनी किर्लोस्कर संगीत मंडळीचा पर्याय निवडला. आणि १९१४ साली ते किर्लोस्कर नाटक मंडळीत येण्याच्या निम्मिताने महाराष्ट्रात दाखल झाले.

किर्लोस्कर नाटक मंडळीत राहून त्यांनी केवळ महाराष्ट्रभर आपल्या कलेचं नाणं खणखणीत वाजवलं होतं. इतकचं काय तर तर दिल्लीपासून कलकत्तापर्यंत हिंदी नाटकात व उर्दू नाटकातही काम केले. याच अनुभवावर त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षी आपली बळवंत नाटक मंडळी स्थापन करून ‘शाकुंतल’ हे पहिलं नाटक रंगभूमीवर आणलं.

गावोगावी बळवंत संगीत मंडळीची नाटक गाजू लागली. यशाच्या पायर्‍या एका मागोमाग एक सर होत होत्या. दीनानाथांनी आपली वेगळी ओळख आणि वेगळं स्थान निर्माण केलं. १९२९ साली जेव्हा लता दीदींचा जन्म झाला त्या काळात दीनानाथ रंगभूमी अशी गाजवली होते की त्यांच्याकडे अनेक मोठमोठ्या लेखकांनी कंपनीसाठी नाटक लिहिण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्याकाळी त्यांच्या एका कार्यक्रमाची फी ७० हजार रुपये असायची. लोक त्यांचे कार्यक्रम डोक्यावर घेत होते.

पुढे नाटकाच्या निम्मिताने सांगलीत आल्यावर तिथं त्यांनी १३ खोल्यांचं दुमजली एक घर देखील विकत घेतलं. लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरत होती.

पण दुसऱ्या बाजूला त्यांचं गोवा त्यांना सतत आठवत होतं. तिथं त्याच्या आंबा आणि काजूच्या बागा होत्या. पुढे त्याच आठवणीतून त्यांनी गोव्यातील एक डोंगर २ लाख रुपये मोजून खरेदी केला होता. त्यावेळी त्यांचं वय अवघं ३० ते ३१ वर्ष होतं. 

एकदा त्यांनी आपल्या त्याच आत्मविश्वासानेच एक स्वप्न सांगितले,

जर लक्ष्मी माझ्यावर अशीच प्रसन्न राहिली तर वयाची ५० वर्ष पूर्ण करेपर्यंत मी अख्खा गोवा पोर्तुगीज घुसखोरांकडून खरेदी करणार आहे.

पण दुर्दैवाने त्यांचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं. लता दीदींच्या जन्मानंतर अवघ्या १३ वर्षातच म्हणजे २४ एप्रिल १९४२ साली मास्टर दिनानाथांच निधन झालं. त्यांना केवळ ४२ वर्षांचं आयुष्य लाभलं. पण या एवढ्या छोट्या कालखंडात देखील त्यांनी संगीत सृष्टीवर अधिराज्य गाजवलं. पण त्यांचं पोर्तुगीजांकडून गोवा विकत घेण्याचं स्वप्न मात्र अपूर्णच राहिलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.