कोल्हापूरच्या आमदाराला पाहण्यासाठी ८ दिवस आमदार निवासासमोर लोकांनी रांग लावली होती.

गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली. सांगली कोल्हापूरच्या सीमेवरून वाहणाऱ्या वारणा नदीमध्ये मासेमारी करण्यावरून वाद सुरु होता. एका काठावर कोल्हापूर आणि दुसऱ्या काठावर सांगली अशा दोन्ही जिल्ह्याच्या कलेक्टरनी थेट मासेमारीवर बंदी घातली होती. अनेकांचा  रोजगार बुडाला होता मात्र प्रशासन बंदीच्या निर्णयावर ठाम होते.

या मासेमारांनी अनेक नेत्यांची भेट घेतली आणि यातून मार्ग काढायची विनंती केली पण प्रशासनाचा निर्णय बदलणे आमच्या हातात नाही असं सांगत आमदार खासदारांनी आपले हात वर केले. अखेर सगळे उपाय थकल्यावर ही मंडळी कोल्हापूरच्या जिल्हापरिषदेच्या अध्यक्षांकडे म्हणजेच दिनकरराव यादव यांच्याकडे आली.

दिनकरराव यादवांनी त्यांचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतलं. बघू, उद्या परत या, नियमात बसतंय का बघतो वगैरे वगैरेचा पुढाऱ्यांचा फाफटपसारा न लावता त्यांनी एक काम केलं. जिल्हापरिषदेतून थेट मुख्यमंत्री कार्यालयात फोन लावला.

त्याकाळची टेलिफोन व्यवस्था अद्यावत नसल्यामुळे हे फोन वारंवार कट होत होते. जवळपास तासभर हे असच सुरु होतं. अखेर दिनकरराव यादवांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर लायटनिंग कॉल लावला. वसंतराव नाईक तेव्हा मुख्यमंत्री होते. त्यांना हे कोल्हापूरकरांचं गाऱ्हाणं ऐकून आश्चर्यच वाटलं पण त्यांनी यावर काही प्रतिक्रिया दिली नाही.

फोन ठेवल्यावर दहा मिनिटे झाली असतील नसतील जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला, मासेमारीवरील बंदी उठवण्यात आली आहे.

हे कोल्हापूरच्या रांगड्या मातीचे वैशिष्ट्य. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अगदी पंतप्रधानांपर्यंत जाण्यास देखील इथले नेते घाबरत नसत. दिनकरराव यादव यांची ओळख तर शेतकरी शेतमजूर, दलित, पददलित, डवरी, डोंबारी, कोल्हाटी, वैदू, माकडवाले अशा अनेक भटक्या समाजातील पीडित माणसांसाठी नेहमी कार्यरत राहिलेले व्यक्तिमत्त्व अशीच होती.

त्यामुळेच त्यांना ‘दीनबंधू’ ही उपाधीही मिळालेली होती. 

दिनकरराव यादव शिरोळ तालुक्यातले. त्यांचा जन्म १९२३ साली झाला. स्वातंत्र्यलढ्याच्या महायज्ञात त्यांनी विद्यार्थी दशेत असतानाच उडी घेतली होती.

साराबंदी’सारख्या आंदोलनात पुढाकार घेतला. १९४२च्या चळवळीत असताना शिरोळमध्ये राष्ट्रसेवादलाची संघटना बांधली. ‘चले जाव’ चळवळीत भूमिगत राहून काम केले. अनेक वर्षे तुरुंगवास सहन केला.

कोल्हापूरच्या तुरुंगात असताना त्यांना आचार्य दादा धर्माधिकारी, आचार्य जावडेकर यांच्या सारख्या विचारवंतांचा सहवास लाभला. त्यातूनच समाजातील तळाच्या वर्गासाठी काहीतरी करण्याची उर्मी निर्माण झाली. १९५० मध्ये कुरुंदवाडमध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे व कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या उपस्थितीत दिनकरराव यादव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा शाखेची स्थापना झाली.

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन धगधगत असताना आचार्य अत्रे, एस. एम. जोशींसह अनेकांनी त्यात अग्रणीची भूमिका निभावली. दिनकरराव यादवांसारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी देखील या आंदोलनात खारीचा वाटा उचलला आहे. त्यांच्याच प्रयत्नामुळे संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार सा. रे. पाटील यांना बळ मिळाले आणि काँग्रेसच्या तगड्या उमेदवाराला सा.रे.पाटलांनी पराभूत केलं.

१९६० मध्ये जिल्हा लोकल बोर्डाऐवजी जिल्हा परिषदांची स्थापना झाली. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याचा मान आपोआप दिनकरराव यांच्याकडे आला. ११ वर्ष ते जिल्हापरिषद अध्यक्ष होते.

जिल्ह्यातील कोणते गाव नसेल जिथे त्यांनी कार्याचा ठसा उमटवला नसेल. शिवाजी विद्यापीठाची उभारणी, सी. पी. आर. हॉस्पिटल विस्तारीकरण योजना मंजुरी, विमानतळ, चित्रपटनगरीचा प्रस्ताव, तुळशी धरण हे सगळे प्रश्न दिनकररावांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पार पडले.

यशवंतराव चव्हाणांच्या प्रयत्नामुळे शेकापचे अनेक नेते प्रवाहात आणले. यात दिनकरराव यादवांचा देखील समावेश होता.

त्याकाळी कोल्हापुरात काँग्रेसमध्ये दोन गट होते. श्रेष्ठी गट आणि रत्नाप्पा कुंभार गट. देशभक्त रत्नाप्पा हे राज्यपातळीवरचे मोठे नेते. ते देखील शिरोळ तालुक्यातलेच होते. सहकार क्षेत्रात त्यांचं काम मोठं होतं. जेव्हा दिनकरराव यादव व इतर नेते मंडळींनी शिरोळ तालुक्यात साखर कारखान्याची उभारणी करण्याचे प्रयत्न सुरु केले तेव्हा रत्नाप्पा कुंभार यांचा त्याला विरोध होता.

त्यांनी या पूर्वी इचलकरंजी जवळ पंचगंगा साखर कारखान्याची उभारणी केली होती मात्र शिरोळ तालुक्यात देखील मलाच कारखाना उभारायला द्यावा असा त्यांचा आग्रह होता. तर विरोधात दिनकरराव यादव, सारे पाटील, दत्तवाडकर घोरपडे हे देखील दत्त साखर कारखाना उभारणीसाठी प्रयत्नशील होते.

दोन्ही गट आपल्या म्हणण्यावर ठाम होते. राज्यपातळीवर प्रश्न सुटत नाही हे लक्षात आल्यावर दिनकरराव यादव साखर कारखाना मंजुरीसाठी थेट दिल्लीत ठाण मांडुन बसले. त्यांच्या चिकाटीला यश आले. दिल्लीतून ते डायरेक्ट  मंजुरीचे पत्र घेउनच परतले. तालुक्यात रस्त्या रस्त्यांवर साखर वाटली गेली.

त्यांच्या सारे पाटील, दत्तवाडकर घोरपडे सरकार यांच्या प्रयत्नांना यश आले आणि दत्त सहकारी साखर कारखान्याला मंजुरी मिळाली.

रत्नाप्पा कुंभार यांचे नाव तेव्हा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील नेता म्हणून ओळखलं जायचं. १९८० साली दिनकरराव यादवांनी त्यांचा शिरोळ मतदारसंघात पराभव केला. जायंट किलर म्हणून संपूर्ण राज्यभरात यादवांच्या नावाची चर्चा झाली. रत्नाप्पा कुंभारांना पाडणारा कोण हा दिनकरराव ते पाहण्यासाठी आठ दिवस त्यांच्या आमदार निवासातील खोलीसमोर लोकांनी रांग लावलेली होती.

आमदार म्हणून विधानसभेत त्यांची ओळख करून दिल्यानंतर टाळ्यांचा एवढा कडकडाट झाला की सभागृहाचे कामकाज काही मिनिटे ठप्प झाल्याची आठवण लेखक सुनील इनामदार यांनी आपल्या पुस्तकात दिलेली आहे.

आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी विधानसभेत त्यांनी बाराशेपेक्षा अधिक प्रश्न विचारले. अनेक प्रश्नांवर सभागृहात लक्षवेधी सूचना मांडून चर्चा घडवून आणली. साखर कारखान्याला ऊस घातल्यापासून एक महिन्यात ९० टक्के बिल द्यावे, अशी सूचना त्यांनी विधानसभेत मांडली.

त्यांचा बेधडक स्वभाव आमदार असताना देखील कायम होता. मंत्रालयात बेधडक मंत्र्यांच्या केबीन मधे जाउन काम पुर्ण करुनच यायचे.

काळम्मावाडी धरण,अर्जुनवाड पुल,औरवाड जुना पुल, कुरुंदवाड पुल त्यांच्याच प्रयत्नातून मंजुर झाले. अनेकांना तिथे नोकरीला लावले.

आमदार निवासामधील त्यांची खोली म्हणजे मुंबईत काही कामासाठी जाणाऱ्या असंख्य कोल्हापूरकरांच्या आधार होता. या खोलीत एकावेळी इतकेजन राहायचे कि अनेक वेळा दिनकरराव यादवांना अन्यत्र झोपायला लागायचे. 

विधानसभा तर त्यांनी अक्षरशः गाजवली. गावरान भाषेत आणि दैनंदिन व्यवहारातील हलकी फुलकी उदाहरणे देत ते संभृहात बोलायचे आणि सारे सभागृह हास्यकल्लोळात बुडून जायचे. त्यांची टीका धारधार होती, पण त्यामागची तगमग ओळखून सगळे मंत्री दिनकरराव यादवांच्या शब्दाला मान द्यायचे.

ते व्यावहारिकदृष्ट्या बेहिशोबी होते. सकाळी निघताना दोनतीन हजार रुपये खिशात ठेवून निघालेले दिनकरराव यादव रात्री घरी परतत असताना रिक्षासाठी देखील पैसे नसायचे. आमदार निवासातील सफाईकामगार, लिफ्टमन, शिपाई, कोणीही गरजू भेटला की त्यांच्या मदतीसाठी खिसा रिकामा व्हायचा.

आमदार असताना देखील त्यांनी आपला प्रवास एस.टी नेच केला. जिथे जिथे ते जायचे लोकांचा घोळका त्यांच्या भोवती असायचा. गर्दी बघुन लोक ओळखायचे की दिनकरराव आले. एस.टीतुन जात असताना लोकांच्या समस्या ऐकायचे.

जिल्हापरिषद अध्यक्ष असो किंवा आमदारकी असो दिनकरराव यादवांनी स्वतःसाठी एक रुपया देखील कमावला नाही. नेते पदाची झूल न पांघरता जनतेचा कैवारी दीनबंधू म्हणूनच ते राज्यभरात ओळखले गेले.

अशा या लोकनेत्याचे १ फेब्रुवारी १९९४ रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या जाण्याने फक्त शिरोळ तालुका, कोल्हापूर जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्याच्या राजकारणाचे नुकसान झाले.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.