ऑफिस स्टाफ कॅन्टीनमध्ये जास्त टाईमपास करतो म्हणून झोमॅटोचा शोध लागला.

घरचं जेवण खायचा कंटाळा आला म्हणा किंवा बायकोला स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणा दोन्ही गोष्टींवर एकच उपाय तो म्हणजे मागवा मग झोमॅटोवरून काहीतरी…मोबाईवरून ऑनलाईन ऑर्डर केली कि काही वेळातच झोमॅटोबॉय तुमची ऑर्डर घेऊन तुमच्या दाराशी उभा ठाकलेला दिसून येतो. पण हे झोमॅटो प्रकरण एका मजेदार किस्स्यातून सुरू झालं.

दीपेंद्र गोयल हे दिल्लीमधील बेन अँड कंपनीमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करत होते. चांगल्या पगाराची नोकरी असूनही ते समाधानी नव्हते. त्यांच्या मनात कायम बिझनेस आयडिया चालू असायच्या. एके दिवशी ऑफिसच्या कॅंटीनमध्ये त्यांना त्यांच्या व्यवसायाची आयडिया सापडलीच.

दुपारच्या जेवणाच्या वेळी कॅंटीनमध्ये ऑफिस स्टाफने भरपूर मोठी गर्दी केली होती. त्यातही प्रत्येकजण मेन्यू कार्ड बघून ठरवत होता. यामुळे बरच वेळ वाया जात असे आणि त्यामुळे टाईमपास होऊन ऑफिसचं वेळापत्रक कोलमडत असे. या ऑफिस स्टाफच्या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी एक आयडिया केली.

यासाठी त्यांनी टेक्नॉलॉजीचा उपयोग करायचं ठरवलं.

त्यांनी ऑफिसच्या कॅफेटोरिया मधलं मेन्यू कार्ड स्कॅन करून एक वेबसाईट बनवली आणि त्यावर ते अपलोड केलं.

आता ऑफिस स्टाफ लोकांसाठी थेट मेन्यू निवडण्यासाठी ऑनलाईन सुविधा आल्याने ते खुश झाले आणि त्या वेबसाईटला भरपूर प्रतिसाद मिळाला.

दीपेंद्र यांनी या आयडियावर मग गंभीरतेने काम करायचा निर्णय घेतला. त्यांच्या या वेबसाईट आयडियाचा हेतू हा होता कि दिल्लीतल्या फेमस रेस्टोरंन्टचा मेन्यू तिथं दिसला पाहिजे आणि हॉटेलची माहिती कळली पाहिजे. प्रसून जैन नावाच्या आपल्या मित्राची मदत घेऊन दीपेंद्र यांनी दिल्ली एनसीआर मध्ये फूडलेट नावाने एक व्हेंचर सुरु केलं. पण कामानिमित्त प्रसून जोशी मुंबईला निघून गेले त्यामुळे फूडलेट अडचणीत सापडलं.

अशा वेळी त्यांचे सहकारी पंकज चड्ढा त्यांच्या मदतीला धावून आले. बेन अँड कंपनीमध्ये हे दोघे मित्र सहकारी म्हणून एकत्र काम करत असे. दोघांनी मिळून २००८ साली फूड पोर्टल foodibay.com ची सुरवात केली. हे फूडपॉर्टल लोकेशन, रेट यांच्या आधारावर लोकांना चांगल्या हॉटेलांमधून सर्व्हिस मिळावी असा उद्देश ठेवून सुरवात केली होती. 

सुरवातीला दिल्ली एनसीआरचे १२०० रेस्टोरंट यात सामील केले गेले. दीपेंद्र गोयल आणि पंकज चड्ढा यांनी व्यवसाय वाढवून त्यातून पैसे मिळवू असा विचार केलाच नव्हता फक्त ग्राहकांना चांगली सर्व्हिस मिळावी हाच त्यांचा हेतू होता. हळूहळू foodibay.com ची लोकप्रियता वाढत गेली. लोकांकडून चांगले फीडबॅक मिळू लागल्याने २००८ एन्ड ला त्यांचे जवळपास २००० हॉटेलांसोबत डीलिंग सुरु झाली होती आणि दिल्लीतील सगळ्यात मोठी रेस्टोरंट डिरेक्टरी म्हणून foodbay.com ने नाव कमावलं होतं.

२०१० येता येता foodbay.com पुणे, बँगलोर, अहमदाबाद मुंबई, कोलकाता अशा मोठ्या शहरांमध्ये विस्तारला गेला होता. आता दीपेंद्र आणि पंकज हा व्यवसाय देशपातळीवर वाढवण्याचा विचार करू लागले आणि एकदम फोकसने काम करू लागले.

आता विषय येतो झोमॅटो नाव कस आलं ?

तर दीपेंद्र आणि पंकज नावामध्ये वेळ घालवणार नव्हते त्यांनी खाण्यापिण्याच्या गोष्टीशी संबंध असलेलं नाव ठेवायचं ठरवलं आणि टोमॅटोचं झोमॅटो केलं.

हळूहळू भारतभर झोमॅटो हा ब्रँड म्हणून पुढे येऊ लागला. ज्यावेळी मोबाईल ऍप लॉन्च झालं तसा झोमॅटोचा जगभर प्रसार व्हायला सुरवात झाली.

२०१२ साली श्रीलंका, फिलिपाइन्स, युनाइटेड किंगडम, कतार , साऊथ आफ्रिका अशा देशांशी झोमॅटो जोडला गेला. २०१३ साली टर्की, ब्राझील, न्यूझीलँड सुद्धा यात सामील झाले. आता झोमॅटोने जागतिक पातळीवर आपली सेवा सुरु केली होती. फॉरेनमध्ये विविध देशाने झोमॅटोच्या अंतर्गत विविध शाखा सुरु केल्या.

झोमॅटोला अनेक चढउतार बघावे लागले. अनेक वेळा सायबर अटॅक झाला. यामुळे त्यांच्या १७ मिलियन ग्राहकांचा रेकॉर्ड हॅक करण्यात आला होता. २०१५ साली आर्थिक मंदी आल्याने ३०० कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. २०१८ साली दीपेंद्र यांचे पार्टनर पंकज चड्ढा यांनी व्यक्तिगत कारण सांगून कंपनी सोडली. अनेक महत्वाच्या लोकांनी झोमॅटोला बाय बाय केला. याच कारण होतं झोमॅटोला टक्कर द्यायला स्वीगी मार्केटमध्ये आलं होतं. 

अनेक चढउतार झोमॅटोने बघितले पण २०१८ नंतर चांगले दिवस आले. भारतातल्या २०० शहरांमध्ये आणि जगातल्या २४ देशांमध्ये आज झोमॅटो आपली सर्व्हिस देतं. करोडोंची उलाढाल आज मार्केटमध्ये झोमॅटो करत आहे. अनेक कामगारांना रोजगार झोमॅटोने मिळवून दिला. लॉकडाऊनच्या काळात अनेक तरुणांना झोमॅटोने रोजगार दिला. 

ऑफिसच्या एका साध्या घटनेतून दीपेंद्र गोयल यांना आयडिया सुचली आणि ती आयडिया आज कोटींची उलाढाल आणि रोजगार निर्माण करत आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.