गीतकारावरच्या रागामुळं दिग्दर्शक सावन कुमारांनी स्वतः गीतकार होऊन दाखवलं..
काही दिवसांपूर्वी ख्यातनाम दिग्दर्शक सावन कुमार यांचे निधन झाले. सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट दिग्दर्शित केले होते.‘सौतम’ हा त्यांचा सगळ्यात गाजलेला चित्रपट. अभिनेत्री मीनाकुमारी सोबत देखील त्यांचे खूप चांगले संबंध होते.
मीनाकुमारी ज्या वेळी लिव्हर सिरोसिस ने आजारी होती ता त्यावेळी तिच्या सोबतीला कायम सावन कुमार असायचे. त्यानी मीनाचं सगळं आजारपण काढलं. मीनाचा मृत्युनंतर प्रदर्शित झालेल्या ‘गोमती के किनारे‘ या सिनेमाचे दिग्दर्शन सावन कुमार यांचेच होते. त्यामुळे मीनाकुमारीच्या हृदयात देखील सावन कुमार साठी एक खास जागा होती.
सावन कुमार यांनी १९७३ साली ‘हवस’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
जाणकार रसिकांना त्यातील मोहम्मद रफी यांनी गायलेले एक गीत अजून या आठवत असेल ‘तेरी गलियों में ना रखेंगे कदम आज के बाद….’ अनिल धवन, नीतू सिंग, बिंदू, प्रदीप कुमार यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट त्याकाळी चांगला चालला होता. विषय काळाच्या मानाने बोल्ड होता. या चित्रपटातील एका गाण्याचा हा एक किस्सा आहे.
अभिनेत्री रेखा आणि दिग्दर्शक सावन कुमार यांची खूप चांगली मैत्री होते. ते आपल्या आगामी प्रोजेक्ट बद्दल कायम रेखा सोबत चर्चा करीत असत. ‘हवस’ चित्रपटाच्या दरम्यान देखील त्यांचा रेखांशी संवाद चालू होता. या चित्रपटात आशा भोसले यांनी गायलेले एक गीत होतं. हे गीत वस्तूतः कॅबरे स्वरूपाचे होते.
हे गाणं सिनेमांमध्ये फरियाल नावाच्या अभिनेत्रीवर चित्रित होणार होतं. ही अभिनेत्री नकारात्मक भूमिका करण्यासाठी आणि vamp म्हणून खूप लोकप्रिय होती. पण ज्यावेळी रेखाने हे गीत ऐकले त्यावेळी तिला ते गाणे प्रचंड आवडले.
गाण्याचे बोल होते ‘आओ यारो गाओ आओ यारो नाचो’ आणि ती सावन कुमार यांना म्हणाली ,” हे गाणे तुम्ही माझ्यावर चित्रित करा!” सावन कुमार आणि रेखा यांची खूप चांगली मैत्री होती. ते प्रेमाने रेखाला बाबा या नावाने संबोधत. ज्यावेळी रेखाने चित्रपटात काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली ; त्यावेळी सावन कुमार म्हणाले ,”बाबा, ये मेरी खुश किस्मती होगी अगर आप मेरे फिल्म का हिस्सा बन जाओगी.
लेकिन बाबा, क्या करू? फिल्म का बजेट बहुत कम है इसलिये मुझे माफ करना. फिर कभी मौका आया तो मै आपको जरूर मेरे फिल्म मे काम करने का अवसर दूंगा!” यावर रेखा चिडून म्हणाली ,”अगर बात सिर्फ पैसे की है तो मै आपसे एक पैसा भी नही लुंगी. मै आपके फिल्म मे मुफ्त में काम करूंगी लेकिन ये गाना मुझपर ही शूट होना चाहिये!”
ज्यावेळी रेखाने हा पर्याय दिला तेंव्हा सावन कुमार यांना नकार द्यायला कुठलीच जागा नव्हती. अशा पद्धतीने केवळ एका गाण्यासाठी रेखा या चित्रपटात आली. आजच्या काळात ज्याला आपण आयटम सॉंग म्हणतो. त्या टाईपचे हे गाणे ‘हवस’ चित्रपटात होते. अशा प्रकारे रेखा ने एक पैसा ही न घेता सिनेमात काम केले.
या गाण्यासाठी लागणारे कॉस्ट्यूम आणि ज्वेलरी देखील रेखाने स्वतःच सोबत आणले होते.
पुढे रेखाने साजन की सहेली, सौतन की बेटी, प्यार की जीत, आणि मदर या सावन कुमार दिग्दर्शित चित्रपटात काम केले. जाता जाता या चित्रपटातील एका लोकप्रिय गाण्या आणखी एक दिलचस्प किस्सा.
‘तेरी गलियों में ना रखेंगे कदम आज के बाद ….’ हे मोहम्मद रफी यांनी गायलेले ‘हवस’ चित्रपटातील गाणं आज पन्नास वर्षांनंतर देखील तितकाच लोकप्रिय आहे. या गाण्याची जन्मकथा मोठी इंटरेस्टिंग आहे. ज्या वेळी ‘हवस’ हा चित्रपट निर्माण करायचे सावन कुमार यांनी ठरवले त्यावेळी या चित्रपटाच्या गीतलेखनासाठी ते एका मोठ्या गीतकारा कडे गेले.
गीतकारासोबत त्यांची मिटिंग झाली पण गीतकाराने खूप मोठी अमाऊंट मागितली. सावन कुमार कडे अर्थातच एवढे पैसे नव्हते. त्यांनी असमर्थता दर्शवत खिन्न मनाने तिथून बाहेर पडले. खरं तर त्या गीतकाराचा त्यांना खूप राग आला होता.
बाहेर पडताना त्यांच्या डोक्यात एकच विचार आला ‘तेरी गलियों में ना रखेंगे कदम आज के बाद….’ वस्तुतः ह्या त्या गीतकाराला उद्देशून मनात आलेल्या ओळी होत्या! पुढे त्यांनी स्वतः वाढवल्या आणि एक सुंदर गीत जन्माला आले.
या गीता मुळेच सावन कुमार गीतकार बनले. हे त्यांनी लिहिलेलं पाहिलंच गीत. पुढे त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिली. या सिनेमात पहिल्यांदाच उषा खन्ना यांनी सावन कुमार यांच्या चित्रपटांना संगीत दिले. या सिनेमापासून या दोघांची जोडी जमली काही काळ ते एकत्र रिलेशन मध्ये देखील होते!
-भिडू धनंजय कुलकर्णी
हे ही वाच भिडू
- एखाद-दुसरा सिन किंवा गाणं नाही, तर पाकिस्ताननं भारतातला अख्खा सिनेमाच चोरला होता
- पिक्चर फ्लॉप गेला, पण ‘काईट्स’मुळं हृतिकचं आपल्या आयडॉलला भेटायचं स्वप्न पूर्ण झालं…
- शिक्षकाने पिक्चर पाहून विद्यार्थिनीचा खून केला लपायला मुलींचे ड्रेस घालून फिरला, तरीही घावलाच