हिंदू कोड बिलावरून राष्ट्रपती आणि पंतप्रधानांमध्ये चांगलचं वाजलं होतं.

डॉ. राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू दोघेही  एका विचाराच्या काँग्रेस पक्षातले. सध्याच्या काँग्रेस पक्ष सुद्धा नेहमीचं सांगतो की, आपण या दोन दिग्गज नेत्यांच्या विचारसरणीनेचं काम करतो.  स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासात या  दोघांचा मोठा वाटा आहे. कारण स्वातंत्र्यानंतर यातल्या एकाने पंतप्रधान तर दुसऱ्याने राष्ट्रपती पद सांभाळलं.

पण या  दोन्ही नेत्यांमधले  राजकीय मतभेद देखील कोणा पासून लपून नाही. कारण  दोघांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन. म्हणजे डॉ. राजेंद्र प्रसाद हे विकासाच्या बाजूने होते, पण त्यासाठी भारतीय मानसिकतेला धक्का बसता काम नये अशी त्यांची विचारधारणा होती. सगळ्यानांच माहितेय कि, राजेंद्र प्रसाद खूप धार्मिक होते. त्यांनी बऱ्याचदा ते स्पष्ट देखील केलंय. 

दुसरीकडे पंडित नेहरू आधुनिक विचारांचे. त्यांच्या म्हणण्यानुसार देशाने फक्त परंपरांच्या नावाखाली अडकून न राहता तंत्रज्ञाच्या दृष्टिनेही पुढे जावे. म्हणजे देवांच्या मंदिरांबरोबरच  उद्योग, विकसित शहरे, धरणे, रुग्णालये, शाळा बांधणं. 

देश एकत्र मिळून चालवणाऱ्या या दोघांमध्ये आपआपल्या विचारांमुळे मात्र अनेकदा वाद पाहायला मिळाले. त्यांच्यात पहिला खटका उडाला तो  हिंदू कोड बिलावरून. 

म्हणजे झालं असं कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४७ च्या ऑक्टोबर महिन्यात संविधान सभेत एक मसुदा सादर केला. ज्यात सर्व हिंदूंसाठी एक नियमावली बनवली जाणार होती. या अंतर्गत विवाह, वारसाहक्क अशा वादांवर निर्णय घ्यायचा होता.  सोबतच हिंदूंसाठी एका विवाहाची व्यवस्था केली जाणार होती आणि असे बरेचसे नियम होते. या मसुद्याला पंडित नेहरूंनी पाठिंबा दिला.

पण संविधान सभेचे अध्यक्ष असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी यावर आक्षेप घेतला. त्यांच्या मते, अशा नियमांवर सगळ्या देशात  जनमत तयार झाल्यानंतरचं कायदा व्हायला हवा. कारण अनेक स्वरूपात प्रचलित असणाऱ्या परंपरांच्या सगळ्या विभागांना  एकत्र घेतल्याशिवाय हा नियम यशस्वी होणार नाही. 

महत्वाचं म्हणजे या हिंदू कोड बिलाचा बाद फक्त नेहरू आणि प्रसाद यांच्यामध्येच नव्हता, तर अनेक धार्मिक नेते आणि परंपरावादी समाजसेवक यांच्या विरोधात होते. त्यामुळे या बिलाचा प्रश्न कोर्टाच्या एखाद्या मोठ्या प्रकरणाप्रमाणं लांबणीवर पडत होता. 

शेवटी राज्यघटना पूर्ण होण्याच्या तोंडावर नेहरूंनीचं पुढाकार घेत विधेयक मंजूर झालेच पाहिजे अशी ठाम भूमिका घेतली. दुसरीकडे राजेंद्र प्रसाद सुद्धा भडकले. त्यांनी एक पत्र लिहिले, ज्यात नेहरूंना अन्यायकारक आणि अलोकतांत्रिक म्हंटले गेले. आणि राजेंद्र प्रसाद यांनी हे पत्र नेहरूंना पाठवण्याआधी वल्लभभाई पटेल यांना दाखवलं. पण त्यांनी ते पत्र आपल्या खिशात ठेवलं आणि हा मुद्दा पक्षाच्या व्यासपीठावर मांडू असं सांगितलं. 

पटेलांच्या या भूमिकेमागे कारण सुद्धा तसं होत कारण संविधान पूर्ण होणार होत आणि त्यांनतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक होणार होत्या. आणि हे पद  राजेंद्र प्रसाद यांनाच मिळावं अशी पटेलांची इच्छा होती. तर नेहरूंचा कौल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या बाजूने होता. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या टायमाला पटेलांना कोणता वाद नको होता. 

आता नेहरू जनतेमध्ये जरी फेमस असले तरी काँग्रेसमध्ये पटेलांची पकड नेहरूंपेक्षा जास्त होती. त्यामुळे पटेलच्या इच्छेनुसार डॉ. राजेंद्र प्रसादचं देशाचे पहिले राष्ट्रपती बनले.

आता सगळ्या गोष्टी तर झाल्या पण हिंदू कोड बिलाचा मुद्दा अजून बाकी होता. संविधान सभेत यावर चर्चा सुरूच होत्या. संसदेतल्या वादाबरोबरचं संसदेबाहेरील आंदोलनेही चिघळत होती.  हजारो संत आणि धार्मिक संघटनांनी संसदेवर मोर्चा काढला. आंदोलन चिघळले होते ज्यामुळे पोलिसांना  लाठीचार्ज करायला लागला. 

संसदेत राजेंद्र प्रसाद यांच्या संयमाची बाजी लागली होती. त्यामुळे त्यांनी अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नेहरूंना पत्र लिहिले. ज्यात म्हंटले की, 

सध्याचे लोकप्रतिनिधी सभागृह देशाचे योग्य प्रकारे प्रतिनिधित्व करत नाही.  देशात १९५२ मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होतील त्यानंतर लोकसभेची स्थापना होईल. आणि लोकसभेच्या बैठकीत हिंदू कोड बिलाच्या मसुद्याबद्दल बोलले पहिले.  सरकारला विधेयक मंजूर करायचेच असेल तर हिंदूंनाच का टार्गेट केले जात आहे, यामध्ये सर्व धर्मांचा समावेश करण्यात यावा. लग्न, वारसा हक्कासाठी समान नियम सर्वांसाठी असावेत. 

ठरल्याप्रमाणे निवडणूक पार पडल्या आणि नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला जबरदस्त बहुमत मिळाले.  त्यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्येही राजेंद्र प्रसाद विजयी झाले.  पुढे पहिल्या लोकसभेने १९५५-५६  मध्ये अनेक दुरुस्त्या करून हिंदू कोड बिल मंजूर केले. ज्यात हिंदू विवाह कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा, हिंदू अल्पसंख्याक कायदा आणि पालकत्व कायदा आणि हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा यांचा समावेश होता.

आणि अश्या प्रकारे कित्येक दिवस सुरु असलेल्या वाद – विवादानंतर हिंदू कोड बिलाला मंजुरी मिळाली. 

हे ही वाच भिडू :

 

English Summary: Disagreement between Rajendra Prasad and Nehru over Hindu code bills.

web title: Disagreement between Rajendra Prasad and Nehru over Hindu code bills.

 

Leave A Reply

Your email address will not be published.