पावसाळ्यात गाडीवर झाड पडलं, जमीन पाण्याखाली आली तर नुकसान भरपाई कशी मिळवायची ?

कधी येणार कधी येणार म्हणत, राज्यात पावसाला सुरूवात झालीये. पहिला पाऊस कितीही रोमँटिक वाटत असला, तरी हा रोमान्स स्टेटस आणि स्टोऱ्यांपुरताच टिकतो. नंतर शहरात राहणाऱ्या लोकांना ट्रॅफिक, पॉवरकट आणि पाणी तुंबण्याची भीती वाटत असते, तर गावाकडे धोका असतो तो म्हणजे पुराचा.

कोल्हापुर आणि सांगलीमध्ये २०१९ ला झालेली पूरस्थिती आणि त्याचवर्षी पुण्याच्या अनेक भागांमध्ये शिरलेलं पाणी, या घटनांमुळे पुराची भीती सगळीकडेच पसरली होती. या सगळ्यात जीवितहानी तर झालीच, पण आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झालं.

पावसाळा आला की आणखी एक भीती असते, ती म्हणजे आपल्या गाडीवर झाड पडलं तर..?

एकतर आपण कष्ट करुन गाडी घेतो. तिला साधा ओरखडाही येऊ नये म्हणून जपतो. अनेकदा गाडीचे हप्तेही पूर्ण झालेले नसतात. मग अशावेळी झाड पडलं तर नुकसान भरपाई कशी मिळणार, हा प्रश्न उभा राहतो.

याची माहिती घेण्यासाठी आम्ही इन्शुरन्स कंपनीच्या एका प्रतिनिधीशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं,

“जेव्हा तुम्ही गाडीचा इन्शुरन्स काढता, तेव्हा त्यात नैसर्गिक आपत्तीबद्दलचे नियम लिहिलेले असतात. जर तुम्ही काढलेल्या इन्शुरन्समध्ये तसं नमूद केलं असेल आणि तुम्ही प्रीमियमही भरला असेल. तर तुम्हाला त्याची नुकसान भरपाई निश्चितच मिळते. पण हे प्रत्येक कंपनीनुसार वेगळं असतं, काही कंपन्या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देतात, तर काही नाही. पॉलिसी घेताना त्यांच्या नियम व अटींमध्ये हे स्पष्टपणे नमूद केलं जातं.

सोबतच या अपघातात तुम्हाला काही झालं आणि तुमचा हेल्थ इन्शुरन्स असेल, तर तुमच्या उपचारांचा खर्चही क्लेम करता येतो.”

जशी इन्शुरन्स कंपनीकडून भरपाई मिळते, तशी गाडीवर झाड पडल्यावर प्रशासन भरपाई देतं का?

याबाबत बोल भिडूनं ॲडव्होकेट विकास शिंदे यांच्याशी चर्चा केली, त्यांनी सांगितलं की,

“झाड नैसर्गिकरित्या पडल्यावर प्रशासन नुकसान भरपाई देत नाही. मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळं एखादी दुर्घटना घडली, तर संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार करता येऊ शकते. एखादी धोकादायक वास्तू असेल जिच्याबाबत वारंवार सूचना देऊनही कारवाई झाली नसेल आणि त्यामुळंच तुम्हाला नुकसान झालं तर भरपाई मागता येऊ शकते. जेव्हा वादळ, महापूर इत्यादी घटना घडतात तेव्हा प्रशासन नुकसानाची तीव्रता बघून धोरण आखतं आणि मदत जाहीर करतं.”

आपली गाडी झाडाखाली किंवा पाण्यात आली असेल, तर काय करायला हवं ?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडीचे फोटो आणि व्हिडीओ काढायचे. नुकसान झालेल्याचे फोटो आणि व्हिडीओ हा महत्त्वाचा पुरावा ठरतो. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गाडीला स्टार्टर मारायचा नाही. तसं झालं तर, इंजिनमध्ये पाणी जाऊन इंजिनचं नुकसान होतं. जे इन्शुरन्समध्ये क्लेम करता येत नाही. त्याचा खर्च सोसावा लागतो. 

त्यामुळं गाडी चालू न करता, इन्शुरन्स कम्पनीच्या माणसांकडून तपासणी झाल्यानंतर, टो करुन थेट गॅरेजमध्ये नेणं योग्य ठरतं.

आमच्या पुण्यातल्या एका दोस्ताची गाडी, सोसायटीत पुराचं पाणी शिरल्यानं बाद झाली. त्यानं सगळी प्रोसेस व्यवस्थित केली खरी, पण गाडी झाली स्क्रॅप आणि त्याचे त्याला दीड-दोन लाख रुपयेच मिळाले. त्यामुळं इन्शुरन्स काढताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतंय, तरच व्यवस्थित भरपाई मिळू शकते.

पाणी शिरून घर किंवा दुकानाचं नुकसान झालं तर?

 

दुकानातल्या मालाचा इन्शुरन्स काढलेला असेत तरच नुकसान भरपाई मिळू शकते. जर इन्शुरन्स नसेल, तर सरकारी मदतीवर अवलंबून रहावं लागतं. नुकसान झाल्यावर सगळ्यात आधी स्थानिक प्रशासनाला माहिती देणं गरजेचं आहे. त्यानंतर पंचनामा करुन, इन्शुरन्स कंपनीला नुकसानीची माहिती कळवायची.

त्यानंतर इन्शुरन्स कंपनीचा सव्‍‌र्हेअर पाहणी करुन पुढं माहिती पोहाचवतो. इन्शुरन्सचा क्लेम घेताना, पंचनामा आणि पुरावे म्हणून झालेल्या नुकसानाचे फोटो आणि व्हिडीओ जवळ असणं महत्त्वाचं आहे.

आपल्या घराचाही इन्शुरन्स आपल्याला काढता येतो, त्यात नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान झालं असेल, तर भरपाई मिळू शकते. यात तुम्ही इन्शुरन्स काढताना ज्या ज्या वस्तूंची यादी देता त्यांची नुकसान भरपाई मिळते. मात्र यासाठीही फोटो काढणं गरजेचं असतं.

सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतात पाणी शिरलं तर ?

अशावेळी इन्शुरन्स कंपनी आणि शासनाकडून भरपाई मिळवण्यासाठी महत्त्वाचा असतो, तो म्हणजे पीक पंचनामा. दुर्घटना घडल्यानंतर २४ तासांच्या आत इन्शुरन्स कंपनीला ऑनलाईन माहिती पाठवणं बंधनकारक असतं. पंचनामा करण्यासाठी येणाऱ्या तलाठी, कृषी सहाय्यक आणि इतर अधिकाऱ्यांना नुकसानाची विस्तृत माहिती द्यायला हवी.

अगदी घराच्या, पिकाच्या नुकसानापासून ते पुरात जनावरं दगावली असतील, तर त्याचाही उल्लेख पंचनाम्यात असायला हवा. या पंचनाम्यामुळंच शासनाकडून हेक्टरी मदत जाहीर झाल्यावर, शेतकऱ्यांना भरपाई मिळते.

थोडक्यात काय तर, इन्शुरन्स काढणं महत्त्वाचं असतं आणि त्याचा क्लेम मिळवण्यासाठी पुरावे आणि पंचनामे असणंही तितकंच गरजेचं असतं. सर्व कागदपत्रं आणि पुरावे असतील, तर नियमांनुसार भरपाई मिळवता येते.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.