एका रात्रीत ऑरगॅनिक शेती बंधनकारक केली अन् श्रीलंकेचे खाण्याचे वांदे झालेत

श्रीलंका .. हिंदी महासागरातील आपला सख्खा शेजारी. चारी बाजुंनी समुद्राने नटलेलं हिरवेगार बेट ज्याला पाचूचे बेट देखील म्हटले जातं . मागच्या काही दिवसापासून मात्र लंका पेटलीय. हनुमानासारखं कोणी बाहेरून जाऊन हे केलं नाहीए तर त्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या एक निर्णयामुळं लंकेत मोठा गोंधळ उडालाय. गोटाबाया आणि महिंदा राजपक्षे या दोन बंधूंचा श्रीलंकेत सध्या एकछत्री अंमल असल्याचा सांगितलं जातं.

सध्या हे दोन भाऊ म्हणतील तीच पूर्व दिशा असं श्रीलंकेत चालू आहे.

आता यांनी निर्णय घेतला श्रीलंकेतील सगळी शेती ऑरगॅनिक म्हणजेच सेंद्रिय पद्धतीने करण्याचा.

एका रात्रीत श्रीलंका सरकारनं रासयनिक खाते आणि कीटकनाशके यांच्या आयातीवर बंदी घातली. श्रीलंकेतील जवळपास ९४% भातशेती त्याचबरोबर ८९% टक्के चहा आणि रबराची शेती रासायनिक खते आणि कीटकनाशकांवर चालते. या निर्णयाचा मोठा फटका तिथल्या शेतकऱ्यांना बसलाय.

त्याचबरोबर श्रीलंकेचं अजून एक महत्वाचं पीक असणाऱ्या चहा शेतीवरही या निर्णयाचे दूरगामी परिणाम झालेत.

चहा उत्पादनात ५०% घट येइल असे तिथले उत्पादक सांगतायत. 

चहाच्या निर्यातीतून श्रीलंका वर्षाला जवळपास १.२५ बिलियन डॉलर कमावते. तसेच सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास १०पटी पेक्षा जास्त उत्पादन खर्च वाढेल असं चहा उत्पादकांच म्हणणं आहे. याचबरोबर श्रीलंका जी आपल्या मसाल्यांच्या निर्यातीसाठी जगात ओळखली जाते त्या मसाल्यांच्या  उत्पादनालाही या निर्णयाचा मोठा फटका बसलाय. दालचिनी,काळीमिरी,इलायची,जायफळ,व्हॅनिला यांच्या उत्पादनांत मोठी घट होण्याचे अंदाज बांधले जातायत. तसेच कॉफी आणि रबर उद्योगाला ही  श्रीलंकेच्या एका रात्रीत सेंद्रिय होण्याच्या निर्णयाच्या झळा बसल्यात.

आता अन्नधान्याचं उत्पन्न कमी होणार म्हटल्यावर बाजारात या वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. 

लोकांनी मग एकतर किंमती पण वाढतायत आणि त्यात उत्पन्न कमी होणार म्हटल्यावर या वस्तूंचा साठा करून घेण्यास सुरवात केली. यात व्यापारी पण मागे नाहीयेत. त्यांनी हि मोठी साठेबाजी करण्यास सुरवात केली. लोकांच्या किराणा दुकानाबाहेर रांगाच्या रांगा लागल्या. साखर २०० रुपये किलो झाली होती मात्र ती संपायच्या आत आपण घेऊन ठेवली पाहिजे अशी लोकांची मानसिकता झाली आहे. 

एवढा गोंधळ माजला की श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांना आर्थिक आणिबाणी लावावी लागली. 

देशाला सेंद्रिय करण्याच्या निर्णयाचं टायमिंग पण चुकला होतं असा जाणकार सांगतायत. पर्यटन आणि देशाबाहेर कामाला गेलेल्या नागरिकांनी पाठवलेले पैसे ही श्रीलंकेच्या उत्पन्नाची दोन साधने होती. मात्र करोनाच्या काळात हो दोन्ही साधने आटली आहेत. लंकेच्या परकीय चलनाचा साठा देखील रसातळाला गेला आहे. आणि त्यात सरकारनं एवढा मोठा निर्णय कोणतीही पूर्वसूचना न देता घेतला.

आता तर देशाची अन्नसुरक्षाच धोक्यात आल्याची जाणकार सांगतायत. आधीच श्रीलंकेचे परकीय चलन कमी त्यात चीननं घातलेला कर्जाचा वेढा यामुळं हे संकट अजुनचं गडद झालंय. 

शेतकऱ्यांनी  राजधानीला वेढा घालण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारनं काही प्रमाणात रासायनिक खतांच्या आयातीला परवानगी दिलेय मात्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे.

भारतालाही असे निर्णय घेताना श्रीलंकेत उडालेल्या गोंधळाचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचं सांगितलं जातंय. ऑरगॅनिक म्हणजेच सेंद्रिय शेती पर्यावरणाला चांगली असली तरी त्यामुळं होणारं कमी उत्पन्न, उत्पादन खर्चातील वाढ हे ही लक्षात घ्यावे लागणार आहे. भारताची लोकसंख्या पाहता सेंद्रिय शेती आणि भारताची अन्नसुरक्षा याचा अभ्यास करणे गरजेचं असल्याचं जाणकार सांगतायत. आता या संकटातून लंका कशी बाहेर पडते का भारतालाच शेजाऱ्यासाठी तांदूळ पाठवावा लागतोय हे येणारा काळच सांगेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.