एका अधिकाऱ्याने मनावर घेतलं अन् बांधवगडच्या २२०० वर्ष जुन्या लेण्या जगासमोर आल्या

मध्य प्रदेशातील बांधवगढ टायगर रिजर्व्हमध्ये पुरातत्व विभागाकडून संशोधन चालू होतं. या संशोधनात जवळपास १,२०० ते २,२०० वर्षांपूर्वीची अनेक हिंदू मंदिर आणि बौद्ध लेण्या सापडल्या आहेत.

प्राचीन वस्तू इतक्या मोठ्या संख्येने आणि इतक्या उशिरा सापडल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

२० मे ते २७ जून २०२२ या ३७ दिवसांच्या काळात बांधवगड अभयारण्यात संशोधन करण्यात आलं होतं. यात २६ हिंदू मंदिरं, २६ लेण्या, २ मठ, २ बौद्ध स्तूप, २४ शिलालेख, ४६ मुर्त्या, १९ तलाव आणि पाणवठे तसेच इतर विखुरलेले अवशेष असा प्राचीन राहिल्याचा प्रचंड मोठा संग्रह एकाच अभयारण्यात शोधण्यात आलाय. 

पुरातत्व खात्याचे जबलपूर विभागाचे अधिक्षक एस के बाजपेयी यांनी पुढाकार घेतला आणि ८५ वर्षांपासून रखडलेलं संशोधन पुन्हा एकदा सुरु झालं. 

१९३८ मध्ये झालेल्या संशोधनानंतर तब्बल ८५ वर्षांनी झालेलं हे दुसरं संशोधन आहे. वनविभागाची विशेष परवानगी घेऊन पुरात्तव खात्याच्या जबलपूर विभागाच्या टीमने एक महिनाभर यावर काम केलं. टायगर रिजर्व मध्ये वाघाचा वावर असतांना जीव धोक्यात घालून त्यांनी हे काम पूर्ण केलं.

संशोधन पूर्ण झाल्यानंतर २८ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय पुरात्तव खात्याने ट्विटर हँडलवर याबद्दलची माहिती दिलीय. थोड्याच वेळानंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी सुद्धा ट्विटर वरून याची माहिती दिली.  

संशोधनात हिंदू आणि बौद्ध धर्माच्या वस्तू मिळाल्यामुळे या अवशेषांना विशेष महत्व आहे.

या संशोधनानंतर एकूण ३५ मंदिरांची नोंदणी करण्यात आलीय. यात पूर्वी शोधलेली ९ आणि आता शोध लागलेली २६ मंदिरं आणि अवशेष आहेत. तसेच यात २ शैव मठांचा सुद्धा समावेश आहे. या मंदिरांचं बांधकाम आणि शैली इसवी सन ९ ते ११ व्या शतकात बाघेलखंडावर राज्य करणाऱ्या कलचूरी राज्याच्या काळातली आहे.

मंदिरांसोबतच यापूर्वीच्या संशोधनात ५० लेण्यांचा शोध घेण्यात आला होता. तर आता २६ लेण्यांचा शोध घेण्यात आला आहे. त्यामुळे एकूण ७६ बौद्ध लेण्यांची नोंद करण्यात आली आहे. 

या लेण्यांमध्ये अजिंठ्यासारखे बौद्ध स्तूप किंवा बुद्ध मूर्ती नाहीत. यात चैत्य आकाराचे दरवाजे आणि पलंगासारखे ओटे आहेत. तर दाराच्या चौकटी गुप्त काळातल्या आहेत. यात एक पूर्ण स्तूप आणि एक स्तूपाच्या स्तंभाचे अवशेष आहेत ज्यात एक लहान स्तूप कोरलेला आहे. मूर्तिविरहित असलेल्या या लेण्या महायान बौद्ध पंथाच्या आहेत. यांचा काळ इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातला असल्याचे सांगितले जाते. 

लेण्यांच्या भिंतींवर ब्राह्मी लिपीतील २४ शिलालेख कोरलेले आहेत. या लेण्या साधारणपणे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून इसवी सन ५ व्या शतकाच्या ७०० वर्षांच्या काळात काळात कोरण्यात आलेल्या आहेत.  

परिसरात ४८ शिल्प आढळलेले आहेत. हे शिल्प उघड्यावर असलेल्या दगडांमध्ये कोरण्यात आलेले आहेत. यात  ९ व्या ते १३ व्या शतकातील भगवान विष्णूचे मत्स्य आणि वराह अवतारातील तसेच वेगवेगळ्या अवस्थेतील शिल्प सुद्धा सापडलेले आहेत. यात निद्रा अवस्थेतील शिल्प प्रमुख आहेत. 

यात वराहाचे मोनोलिथिक शैलीतील २ शिल्पांचा समावेश आहे. हे ३*२.७७ आणि ६.४*५ मीटर आकाराचे वराह शिल्प जगातील सगळ्यात मोठे वराह शिल्प असल्याचे सांगण्यात येतेय. 

या मंदिराच्या आणि मठाच्या परिसरात दगडांमध्ये कोरलेले १९ पाणवठे सुद्धा सापडलेले आहेत. हे पाणवठे म्हणजे मंदिरांसाठी लागणाऱ्या दगडाच्या खाणी आहेत. या खाणी टाक्यासारख्या आणि आकाराने लहान तलावाएवढ्या आहेत. हे पाणवठे इसवी सन ९ ते १५ व्या शतकाच्या काळात खणण्यात आले असल्याचा अंदाज आहे.

पण या सगळ्या वास्तूंची माहिती देणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे या ठिकाणी सापडलेले शिलालेख.

संपूर्ण परिसरात एकूण २४ शिलालेख असून हे ब्राह्मी आणि नागरी लिपीत लिहिण्यात आलेले आहेत. या शिलालेखांमध्ये महाराजा श्री भीमसेन, महाराजा पोथासिरी आणि महाराजा भट्टादेव यांचा उल्लेख केलाय. तसेच कौशांबी, मथुरा, पावता, वेजभरदा, सपतनाइरिका या उत्तर प्रदेशातील ठिकाणांची नावं लिहिलेली आहेत.  

‘बांधवगडचा भाग उत्तर प्रदेशाच्या जवळच असल्यामुळे या या भागाचा शहरांबरोबर व्यापारी संबंध असेल किंवा या शहरातील लोकांनी मंदिर आणि मठांच्या बांधकामासाठी दान दिलं असावं. पण हा एक अंदाज आहे.’ असं पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. 

नैसर्गिक गुहांच्या फरशीवर एक बोर्ड गेम सुद्धा आढळलेला आहे. यात ठराविक अंतरावर छोट्या छोट्या आकाराचे खळगे करण्यात आलेले आहेत. हा कोणत्या प्रकारचा खेळ आहे आणि याचा वापर कोण करत होते यावर संशोधन व्हायचंय.

मग भिडूंनो तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की, इथे एवढं सगळं असतांना आजपर्यंत या लेण्यांचा आणि मंदिरांचा शोध का घेण्यात आला नाही.

तर याचं कारण या जंगलातच दडलेलं आहे. मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात तब्बल १७० चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेलं बांधवगड अभयारण्य हे एक व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळे पर्यावरणीय कारणं आणि प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास असल्यामुळे आतमध्ये कमीत कमी माणसांच्या प्रवेशाची परवानगी देण्यात येते. 

तसेच परवानगी मिळाल्यानंतर वाघ, बिबट, अस्वल यांसारख्या हिंस्त्र पशूंपासून स्वतःचं रक्षण करणे ही एक जिकरीची गोष्ट असते. त्यामुळे या भागात संशोधन करणे कठीण असते. त्यामुळे गेली ८५ वर्ष ही मंदिरं जगापासून अलिप्त होती. 

पण पुरात्तव खात्याच्या जबलपूर विभागाचे अधिक्षक एस. के. बाजपेयी यांनी या संशोधनाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. 

१९३८ सालात पुरातत्व शास्त्रज्ञ एन. पी. चक्रवर्ती यांनी इथे संशोधन केलं होतं मात्र त्यांच्यानंतर संशोधन करणे बंद झालं. मध्यंतरीच्या काळात काही गटांनी काम केलं होतं पण त्यांनी फार कमी भाग शोधला. पण आता एस के बाजपेयी यांच्या नेतृत्वात झालेल्या संशोधनात जवळपास सर्व स्थळ शोधून काढण्यात आली आहेत. 

हिंस्त्र पशूंची भीती असतांना सुद्धा लेण्यांच्या गुहांमध्ये राहून संशोधकांच्या टीमने या सर्व ऐतिहासिक वस्तूंना पुन्हा एकदा उजेडात आणलंय. संशोधक एक महिन्यापेक्षा जास्त काळ आपल्या घरदारापासून दूर राहून या ठिकाणी संशोधन करत होते. वेगवेगळी मंदिरं आणि लेण्या यात जाऊन त्यांनी या भागाला पूर्णपणे शोधून काढलं. 

अलीकडच्या काळात लोकांना माहित नसलेल्या या मंदिरांमध्ये इसवी सन ९ व्या शतकापासून मुघल काळापर्यंत लोकांची चांगलीच वर्दळ होती. कारण संशोधनामध्ये या ठिकाणी जौनपूर सल्तनत आणि मुघल कालीन नाणी सापडलेली आहेत.

उशिरा का होईना पण ही जवळपास १,२०० ते २,२०० वर्ष जुनी असलेली मंदिरं आणि लेण्या पुन्हा एकदा जगाच्या समोर आलेल्या आहेत.

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.