दिशाताई FIR झाला, आता तरी थोरल्या बहिणीचा आदर्श घे

मुन्नाभाई एमबीबीएस मधला मुन्ना फेमस आहे प्रश्न विचारण्यासाठी… आज त्याने दिशा पटानी आणि टायगर श्रॉफला एक प्रश्न विचारला 

वो कोरोना बढ रहा, लॉकडाऊन चल रहा है… फिर भी बाहार घुमना जरुरी है क्या?    

मुन्नाने प्रश्नावर भागवलंय, तिथं भिडू असता ना तर कानच फोडले असते.

यांचा पराक्रम वाचा..

कोविड-19 विषयक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी आणि त्यांच्या काही मित्रांविरोधात कलम 188 आणि 34 अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली.

हे महाभाग वांद्र्यातील बॅण्ड स्टॅण्ड परिसरात फिरण्यासाठी बाहेर पडले होते. लॉकडाऊन चालू आहे नाहीतर काय, याच्याशी यांना काही देणं घेणं नाही. मग त्याचवेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखलं आणि चौकशी केली. पण बोंबलत फिरण्यासाठी आलोय याव्यतिरिक्त कोणतंही योग्य कारण ते सांगू शकले नाहीत, त्यामुळे मुंबई पोलिसांना त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा लागला.

विशेष म्हणजे त्यांनी हा प्रकार तिसऱ्यांदा केला. पहिला दोन वेळा पोलिसांनी कारवाई केली नाही पण आता मात्र सिरीयस घ्यायचं ठरलं.

आता त्यांच्याविरोधात लावलेली कलमं ही जामीनपात्र आहेत, त्यामुळे त्यांना अटक करणं गरजेचंच आहे असं नाही.

या पोरापोरींना… सॉरी, सॉरी, सॉरी या नटनट्यांना अकलेचा भाग असतोच असं नाही. घरी काय शिकवतात का नाही काय माहित? च्यामायला विसरोलच की या दिशा पटानीच्या अकलेचे कांदे काढताना खुशबू आली मध्येच डोक्यात. कांद्याची खुशबू नाही ओ… खुशबू पटानी.

ही खुशबू दिशाची मोठी बहीण आहे. रावडी आहे एकदम पोरगी. मिल्ट्री मध्ये लेफ्टनंट पदावर काम करते ही. पोरीच्यात आई पप्पाचे गुण आलेत देशसेवेचे.

मूळच्या उत्तराखंडच्या असलेल्या या राजपूत पटानी कुटूंबाच्या या पोरी जन्मल्या बरेली उत्तरप्रदेश मध्ये. वडील जगदीशसिंग पटानी  पोलिसात नोकरीला होते तर आई हेल्थ इन्स्पेक्टर आहे. दिशा आणि खुशबू सोडून त्यांना सुर्यांश नावाचा एक लेक देखील आहे.

दिशाचे वडील पोलिसात डीएसपी श्रेणीचे अधिकारी असल्यामुळे युनिफॉर्मच आकर्षण खुशबूला लहानपणापासून होतं. देशसेवेचं वेड डोक्यात घेऊनच तिने तयारी केली आणि आज ती भारतीय आर्मीमध्ये लेफ्टनंट आहे.  

दिशाने मात्र मॉडेलिंगवर लक्ष केंद्रित केलं. योगायोगाने तिला सुशांतसिंग राजपूत सोबतचा धोनी हा सिनेमा मिळाला आणि आज ती बॉलिवूडची आघाडीची ऐक्ट्रेस आहे. फक्त बॉलिवूडचं नाही तर हॉलिवूडमध्ये जॅकी चेन सोबत तिने काम केलंय. भिडू जॅकीचा लाडकं पिल्लू टायगर बरोबर तिच्या अफेअरच्या चर्चा मीडियामध्ये रंगत असतात.

दिशाचं ग्लॅमर वाढत असताना मात्र थोरली खुशबू मात्र  गेली सहा वर्ष भारतीय सैन्यात सेवा बजावत आहे. आजकाल सोशल मीडियावर दिशा पेक्षाही तिचे वर्क आउट करतानाचे फोटो व्हायरल होताना दिसतात. लोक आपल्या लेकरांना दिशा पटानी व्हायचं कि खुशबू पटानी व्हायचं याचा आदर्श घ्या असं सांगताना दिसतात.

इन्स्टाग्रामवरची मंडळी दिशा पेक्षा खुशबू भारी दिसते असं सुद्धा म्हणायला मागं पुढं बघत नाहीत.

एका पिक्चरच्या प्रमोशनवेळी दिशा तिच्या बहिणीचं कौतुक करताना म्हणाली होती की, खुशबू तिच्यासाठी रोल मॉडेल आहे. आणि हे नुसतं बोलायलाच बर का? पोरीनं शेवटी नियम तोडून आपण किती बेजबाबदार आहोत हे  दाखवूनच दिल..शेवटी काय तर दिशा, दिशाहीन झाली आणि बोंबलत फिरताना पोलिसांना घावली…

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.