फक्त गुज्जूनांच नाही तर गुजरात फिरायला गेलेल्यांना पण कोटींच्या बिझनेस आयडिया सुचतेत….

गुजरात. भारतातील एक उद्योग संपन्न राज्य. देशातील मोठ-मोठ्या उद्योगपतींची नावे काढली तर त्यातील १० पैकी ८ गुजरातची असतात. इथल्या माणसाच्या मुळात रक्तातच बिझनेस आणि स्टार्टअपचा किडा आहे. तो म्हणतो कोणत्या तरी कंपनीत मिडलक्लास मॅनेजर होण्यापेक्षा एक दुकान टाकून स्वतःचा बिझनेस वाढवेन. आज याच तत्वावर गुजरातमध्ये अनेक व्यापारी तयार झाले.

त्याला बाळकडू देतानाच “जीवन में कैक मोटू करवू छे” शिकवले जाते.

पण आम्हाला एक उदाहरण असं पण मिळालं आहे ज्यात फक्त गुजरात फिरायला गेल्यावर पण कोटींच्या बिझनेसची आयडिया सुचलेली, आणि ती सक्सेसफुल पण झाली…

ही गोष्ट आहे मुंबईच्या जॉक (zouk) हँडीक्राफ्ट ब्रँडची आणि दिशा सिंगची. 

२०१५ मध्ये ग्रॅज्युएट झाल्यानंतर दिशा सिंगला अहमदाबादच्या आयआयएमला प्रवेश मिळाला. ती जेव्हा दुसऱ्या वर्षाला होती तेव्हा ती कॉलेजच्या सुट्टी दरम्यान कच्छला फिरण्यासाठी गेली होती. कच्छ फिरत असताना तिला तिथला हस्तकला व्यवसाय अगदी जवळून पाहायला मिळाला.

त्या दरम्यान दिशाला या हस्तकलेच्या वस्तूंमध्ये काही तरी उणीव जाणवली. 

ती म्हणते,

भारताच्या हस्तकला व्यवसायाची परंपरा आणि संस्कृती ऐतिहासिक वारसा असलेली आहे. मात्र यात आजच्या काळानुसार बदल करणं गरजेचं आहे, नाविन्यता गरजेची आहे. यात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या भारतीय ब्रँड यशस्वी झाले आहेत. त्यांनी आपल्या उत्पादनांमध्ये हा ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवतं नाविन्यता आणली आहे. 

ही उणीव दूर करण्यासाठी मी माझा स्वतःचा ब्रँड सुरु करण्याचं त्या क्षणी ठरवलं.

ज्यात बॅग, पर्स आणि इतर सामानाला क्राफ्ट करत असताना या वारश्याच प्रतिबिंब तर असेलचं पण त्यासोबतचं ग्राहकांच्या हातात गेल्यावर ते स्टायलिश पण दिसेल.

२०१६ ला मुंबईत येत एका आयआयएम पासआऊट असलेल्या मुलीनं आपल्या आयडियेवर काम करायला सुरुवात केली. त्यासाठी आधी दिशानं जॉक Zouk या स्टार्टअपची सुरुवात केली आणि त्यात तिनं तब्बल २० लाख रुपयांची गुंतवणूक केली.

विशेष गोष्ट म्हणजे तिनं जे कारागीर सुरुवातीला शोधले ते सगळे धारावी मधले होते. या कारागिरांचा शोध घेणं आव्हानात्मक होतं पण, ते काम पूर्ण केलं.

जवळपास १ वर्षभर आपल्या हॅन्डक्राफ्टच्या डिझाईनवर काम केल्यानंतर २०१७ च्या शेवटाला दिशानं आपलं जॉकचं पहिलं उत्पादन लॉन्च केलं. यात तिनं काय केलं हे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गुजरातमध्ये विकायला असलेल्या क्राफ्टच्या सामानाला नव्या पद्धतीनं आणि नव्या डिझाइनसह विकण्यास सुरूवात केली.

त्यावेळी तिच्या एक गोष्ट लक्षात आली की तिचं सामान परदेशी ब्रँडच्या दर्जाचं आहे आणि त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळतं आहे. त्यामुळे दिशानं आणखी वस्तू बनवण्यास सुरुवात केली. यामध्ये खादी आणि इतर गोष्टींपासून पिशव्यांचं काम देखील सुरू केलं.

ऑनलाईन लॉन्च करण्याआधी दिशानं काही दिवस प्रत्यक्ष मार्केटमध्ये विकायला प्राधान्य दिलं. त्यासाठी तिनं ५० हून अधिक प्रदर्शनांमध्ये आपली उत्पादन मांडली होती. यानंतरच या व्यवसायाला ऑनलाईन सुरू केलं. तेव्हापासून तो मुंबईसोबतच संपूर्ण राज्यात आणि देशात विस्तारला. यामुळे तिच्या व्यवसायात कमालीची गती आली.

२० लाखांपासून सुरु केलेल्या छोट्याश्या व्यवसायात दिशानं आज तब्बल ५ कोटी वार्षिक उलाढालीच्या घरात प्रवेश केला आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.