योगीच नाहीत तर शहरांची नावं बदलण्याचं राजकारण मायावती, अखिलेश यांनीही केलंय
जगभरात एक म्हण प्रसिद्ध आहे, “नावात काय आहे ?”
पण जर उत्तरप्रदेशच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर नाव आणि नावाच्या राजकारणाला इथे खूप महत्त्व आहे. या राज्यात नावांवरून नेहमीच राजकारण तापलेले असते. योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्या कार्यकाळात स्थानिक जिल्ह्यांचे, तालुक्यांचे आणि स्टेंशनच्या नावं बदलण्यावरून बरंच राजकारण पार पडलं.
भाजपची दुसऱ्यांदा येथे सत्ता आल्यापासून बुलडोझरची कारवाई तर चालू आहे सोबतच नावे बदलाचा सिलसिला देखील चालू झाला आहे. त्यात भाजपचे लोकप्रतिनिधी, आमदार-खासदार या सगळ्यांना आपआपल्या भागांत बदल हवाय तशा मागण्या देखील ते आपल्या पक्षांकडे करतात हे दिसून आलं आहे.
फर्रुखाबादचे भाजपचे खासदार मुकेश राजपूत यांनी मुख्यमंत्री योगींकडे मागणी केली आहे की, फर्रुखाबादचे नाव बदलून पांचालनगर करण्यात यावं.
खासदार मुकेश राजपूत यांनी सांगितल्याप्रमाणे, फर्रुखाबादचा इतिहास असा आहे म्हणे की, गंगा, रामगंगा आणि काली या नद्यांच्या मध्ये वसलेल्या क्षेत्राला पांचाल क्षेत्र म्हणलं जायचं. १७१४ मध्ये मुघल शासक फर्रुखशियारने या शहराचे नाव बदलून फर्रुखाबाद केले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा फर्रुखाबाद जिल्ह्याचे नाव बदलून पांचालनगर/अपराकाशी करण्याची मागणी राजपूत यांनी केली आहे. आता भाजपच्या कार्यकाळातील नामांतराचा इतिहास पाहिल्यास फर्रुखाबादचे नाव बदलले जाईल यात शंका नाही.
या नावं बदलण्याचा इतिहास काय आहे ?
खुद्द मुख्यमंत्री योगी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात यूपीतल्या जिल्ह्यांचे, शहरांचे आणि रेल्वे स्थानकांचे नावं बदलले त्यात कोणत्या ठिकाणांचा समावेश आहे ते बघूया ….
अलाहाबाद – प्रयागराज
इलाहाबादचं नामकरण प्रयागराज करण्याविषयी साधू-संत आणि आखाडा परिषदेकडून आलेल्या प्रस्तावानंतर हा निर्णय घेतला असल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली.
अनेक अभ्यासकांच्या मते धार्मिक ग्रंथांमध्ये या शहराचं नाव प्रयाग किंवा प्रयागराज असंच होतं. अनेक साधुंताचा आणि महंतांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर असतो आणि ते या शहराचा प्रयाग किंवा प्रयागराज म्हणूनच उल्लेख करतात. शहराच्या नजीकच्याच असणाऱ्या एका रेल्वे स्थानकाला देखील प्रयाग असंच नाव आहे.
दिल्लीतील यूपी सदन, यूपी भवनचे नामांतर
दिल्लीतील यूपी सदन आणि यूपी भवन यान दोन इमारतींचे. यूपी सदनचे नाव बदलूही नावं बदलण्यात आली. यूपी सदन चं नाव उत्तर प्रदेश सदन त्रिवेणी असे करण्यात आले, तर यूपी भवनचे नाव उत्तर प्रदेश भवन संगम असे करण्यात आले.
फैजाबाद – अयोध्या
अयोध्या हे प्राचीन शहर म्हणून ओळखले जाते, ज्याला साकेत असेही म्हणतात. कारण हा भाग कोसल राज्याचा भाग होता, त्याची राजधानी साकेत होती. याचा उल्लेख अनेक हिंदू पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतो. बौद्ध मान्यतेनुसार, बुद्धांनी अयोध्या किंवा साकेत येथे १६ वर्षे वास्तव्य केले होते. अयोध्या हे रामानंदी पंथाचे मुख्य केंद्र बनले. १८ व्या शतकात नवाब सआदत अली खान याच्या उत्तराधिकारी मन्सूर खान याने अयोध्येला आपले लष्करी मुख्यालय बनवले. आणि तेंव्हापासून या शहराला फैजाबाद नाव पडलं. लोकसभा मतदारसंघाला फैजाबाद म्हणतात.
पण नोव्हेंबर २०१८ दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने फैजाबाद जिल्ह्याचे अयोध्या असे नामकरण केले आणि जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय अयोध्या शहरात हलविण्यास मान्यता दिली.
मुघलसराय – दीनदयाल उपाध्याय नगर
योगी आदित्यनाथ यांनी पहिल्या वेळेस सत्ता हाती घेताच मुघलसरायचे नामकरण दीनदयाळ उपाध्याय नगर असे केले. याआधी सरकारी नोंदींमध्ये त्याचे नाव चांदौली असे होते.
गोरखपूरच्या उर्दू बाजाराचे नाव हिंदू बाजार आणि मियाँ बाजारचे नाव माया बाजार असे ठेवण्यात आले.
प्रयागराजच्या चार रेल्वे स्थानकांची नावे बदलली
प्रयागराजच्या चार रेल्वे स्थानकांची नावे बदलली. अलाहाबाद जंक्शनचं प्रयागराज जंक्शन झालं, प्रयागराज घाटाचे नामकरण प्रयागराज संगम असे करण्यात आले. कानपूरमधील पंकी स्टेशनचे नाव बदलून पंकी धाम केले. याशिवाय अली नगरचे -आर्य नगर, हुमाँयू नगर- हनुमान नगर, इस्लामपूर- ईश्वरपूर असे नामकरण केले गेले.
हे झाली यादी भाजप सरकारच्या कार्यकाळातील…पण योगींच्या शिवाय मायावती आणि अखिलेश यादव यांच्या कार्यकाळातही शहरांची नावं बदलली गेली होती…
मायावती यांनी त्यांच्या कार्यकाळात संतांची आणि समाजसुधारकांच्या नावाने शहरांची नावे ठेवली होती.
कासगंज जिल्ह्याचं नाव काशीराम नगर केलं होतं. अमेठी जिल्ह्याचं छत्रपती शाहू नगर केलं. हाथरस जिल्ह्याचं महामाया नगर, संभल- भीमनगर, कानपुर देहात- रमाबाई नगर, हापूड -पंचशील नगर, शामली – प्रबुद्धनगर, नोएडा – गौतम बुद्ध नगर,
तर अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात…
जरी अखिलेश यादव योगींच्या नावाच्या’ राजकारणावर सडकून टीका करत असतात तरी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात बदललेली शहरांची नावे दुर्लक्षित करून चालणार नाहीत. कारण त्यांनी योगींना आणि मायावतींना देखील मागे टाकले होते.
अखिलेश यांच्या सरकारने ३० जुलै २०१२ रोजी एकाच दिवसात ८ जिल्ह्यांची नावे बदललीत.
प्रबुद्ध नगर -शामली, भीम नगर – संभाल, पंचशील नगर -हापूर, महामाया नगर -हाथरस, ज्योतिबा फुले नगर- आमरोह, कांशीराम नगर – कासगंज, छत्रपति शाहूजी महाराज नगर – अमेठी, रमाबाई नगर – कानपुर देहात या ८ जिल्ह्यांचे नाव बदलण्यात आली तर त्यांच्या सरकारच्या शेवटच्या वर्षात २०१५ मध्ये त्यांनी संत रविदास नगरचे नाव बदलून भदोही केले होते. याचा अर्थ जिल्ह्य़ांची नावे बदलण्याबाबत अखिलेश यादव योगींच्याही पुढे गेले होते.
इथे हे स्पष्ट होते कि, मायावतींनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या सर्व शहरांची नावे अखिलेश यादव यांनी बदलून टाकली. त्यांच्या या निर्णयाला मायावतींनी कडाडून विरोध केला होता.
याशिवाय उत्तर प्रदेशातील या जिल्ह्यांची नावे बदलण्याची मागणी होतेय ते म्हणजे, फिरोजाबाद-चंद्रनगर, अलीगड-हरिगड, बस्ती-वशिष्ठ नगर, सुलतानपूर-कुशभवनपूर, गाझीपूर – गाधीपुरी, मैनपुरी-माया नगर.
तसेच पुढील काही नावं बदलाच्या तयारीत योग्य सरकार असल्याचं सांगण्यात येतंय…
बरेली विमानतळ- नाथनगरी, गोरखपूर -महायोगी गोरखनाथ, आग्रा विमानतळ -दीनदयाळ उपाध्याय विमानतळ यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तसेच योगी सरकारने झाशी स्टेशनला राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्याची शिफारस केली आहे.
याशिवाय ज्या शहरांना मुस्लिम राज्यकर्त्यांची नावं आहेत ती प्रथमतः बदलण्यात येतील ज्यात फतेहपूर, फारुखाबाद, मुरादाबाद, शाहजहानपूर, आझमगड आणि गाझियाबादचा समावेश आहे.
यासाठीची काय प्रक्रिया असते ?
रेल्वे स्टेशन, जिल्ह्याचे किंवा शहराचे नाव बदलण्यासाठी राज्य सरकार यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवते. त्यानंतर केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे. यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय आदेश जारी करते. यासाठी केंद्र सरकारचे इंटेलिजन्स ब्युरो, पोस्ट विभाग, भारतीय भौगोलिक सर्वेक्षण, रेल्वे मंत्रालय असे अनेक विभाग आणि एजन्सी एनओसी देतात. त्यानंतर गृह मंत्रालय विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार नाव बदलण्यास मान्यता देते आणि हि प्रक्रिया पार पडते.
मायावती सरकार आणि नंतर अखिलेश यंदा सरकारच्या काळात नावांचे बदल जातीपातीच्या राजकारणावरून झाले होते पण भाजपच्या कार्यकाळात हे नाव बदलण्याचं वारं पुन्हा आलं कुठून ?
योगी आदित्यनाथ यांनीही मायावती आणि अखिलेश यांच्या मार्गावर चालले आहेत असं म्हणलं तरी, उत्तर प्रदेशात जसं भाजप सरकार आलं, तसं नामांतराच्या हालचाली अधिक तीव्र झाल्या. विश्व हिंदू परिषद आणि भाजपच्या सहयोगी संघटना परकीय आक्रमकांनी आपल्या देशात प्रचलित असलेली हिंदू नावे जबरदस्तीने बदलल्याचा आरोप नेहमीच करत आल्या आहेत.
भाजप सरकार हिंदू देव देवतांची नावं शहरांना देत आहे. नवीन नावे रामायण आणि महाभारत या महाकाव्यांशी निगडीत असल्याचा दावा जरी भाजप सरकार करत असेल तरी, रामायणाकालाशी निगडित यूपीत ६ नावं असल्याची माहिती उपलब्ध आहे. रामपूर, सीतापुर, लखनऊ, प्रयागराज, चित्रकूट, हरदोई हे नाव हिरण्यकश्यपशी जोडलं गेलेलं आहे.
तर यातील ३ नावं महाभारताच्या काळातील संबंधित असल्याचं सांगितलं जातं ते म्हणजे, मथुरा, बलरामपुर, कौशंबी. कौशंबी हे पांडवांचे वंशज परीक्षितांची वंशजांची राजधानी असल्याचं सांगतात. पण ज्या यूपीत राधा-कृष्ण चे लाखो-करोडो भक्त आहेत त्या यूपीतल्या एकूण ७५ जिल्ह्यांपैकी एकही शहर राधा -कृष्ण या देव- देवतांच्या नावे नाहीये असंही बोललं जातं.
आता वरील शहरांचे, जिल्ह्यांचे आणि रेल्वे स्थानकांचे बदलले नावांची यादी पाहता हे तर स्पष्ट आहे की, योगीच नाहीत तर शहरांची नावं बदलण्याचं राजकारण मायावती, अखिलेश यांनीही केलंय फक्त टीकेची योगी आदित्यनाथ बनले.. असो..
आता देशात आणि उत्तर प्रदेश राज्यातही भाजपची ताकद असल्यामुळे युपीच्या एकूण ७५ शहरांपैकी आणखी काही शहरांची नावं बदलली तर आश्चर्य वाटायला नको.
हे हि वाच भिडू :
- आमदारही नसणाऱ्या दानिश अन्सारी यांना योगींनी मंत्रिमंडळात घेण्याचं कारण म्हणजे…
- भावी मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीच्या रेसमध्ये योगी आदित्यनाथ सगळ्यात लास्ट आहेत…
- म्हणून योगींच्या विजयात ‘बुलडोझर’ चा रोल जास्त महत्वाचा आहे