450 वर्षांपूर्वीच्या जेलमध्ये फक्त एकच कैदी आहे पण त्याची बडदास्त एखाद्या राजासारखी ठेवली जाते…

सामान्य माणसाला जेल हा नुसता शब्द जरी ऐकला तरी घाम फुटतो. संजू सिनेमात बघितलेलं जेल आठवलं तरी अंगावर शहारा येतो. म्हणजे जेलमधी किती अडीअडचणी असतात याचा अंदाज आपल्याला येऊन जातो. पण आज आपण अशा एका जेलबद्दल जाणून घेणार आहोत की जिथं एकच कैदी राहतो आणि त्याला थेट रेस्टॉरंट मधून जेवण येतं. आता असं जेल म्हणल्यावर प्रत्येक जणाला ते एकदा का होईना पहावच वाटेल. हे जेल एका 450 वर्षाच्या जुन्या किल्ल्यावजा जागेत स्थित आहे. पण हे जेल काय जमिनीवर नाही तर समुद्राच्या मधोमध आहे. बरेच फॅक्ट या जेलबद्दल आहेत पण विशेष म्हणजे तिथं फक्त एकच कैदी राहतो.

तर या जेलचं नाव आहे दिव सब जेल. दिव आणि दमन हे भारताचे केंद्रशासित प्रदेश आहेत. कधीकाळी या जेलमध्ये 50-60 कैदी ठेवले जायचे. पण जेलच्या बदलत्या नियमांनुसार कैदी कमी कमी होत गेले. सध्या या जागेत असलेल्या कैद्याचं नाव आहे दीपक कांजी. आज घडीला दीपक कांजीचं वय 32-33 असल्याचं सांगण्यात येत. दिपकला दिव पोलिसांनी पत्नीला विष देऊन मारल्याच्या आरोपावरून अटक केली होती. कोर्टाचा निर्णय येइपर्यंत त्या जेलमध्ये ठेवलं जायचं पण जेव्हा शिक्षा कन्फर्म होई मग आरोपीचा मुक्काम तिथं कायम केला जातो.

राज्य पर्यटनाच्या दृष्टीने दिवचा हा किल्ला आणि ते जेल जास्त महत्वाचं मानलं जातं. पर्यटनाला येणारी लोकं किल्ल्यावर तर जाताच पण त्या जेललासुद्धा भेट देण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना फक्त जेलच्या लॉन पर्यंतच जाण्याची परवानगी देण्यात येते. अस सांगितलं जातं की साडे चारशे वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी दिव कॉलोनी वसवली होती. हा त्याच काळातला किस्सा आहे आणि त्याचं रूपांतर किल्ल्यात झालं.

या किल्ल्यावर अगोदर 20 कैद्यांची सोय होती. सोबतच पुरातत्व विभागाचीसुद्धा या किल्ल्यावर नजर आहे. काही दिवसांनी यातील कैदी सोडण्यात आले फक्त दीपक कांजीला तिथं ठेवण्यात आलं. समुद्राच्या मधोमध असणाऱ्या या जेलची विशेष खासियत म्हणजे कुठल्याही आरोपीला स्वर्ग वाटेल असा माहोल इथला आहे.

इथं कैदी असलेल्या आरोपी दीपक कांजीच्या रक्षणार्थ 24 तास 5 पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. तिथला सुरक्षा गार्ड दिवसातले दोन तास दीपक कांजीला फेरफटका मारून आणतो. अशा सुंदर पण भयाण जागेत जेवणाचा प्रश्नचं येत नाही म्हणून इथल्या कैद्याला थेट रेस्टॉरंट मधून जेवण मागवलं जातं. कैद्याला वाचण्यासाठी रोज पेपर पुरवला जातो. बंदी फक्त एकाच गोष्टीवर आहे की दिपकला टीव्हीवर फक्त धार्मिक कार्यक्रम पाहता येतील.

हे जेल कायम चर्चेत असण्याचं कारण म्हणजे इथल्या जेलला महिन्याला 32 हजार रुपये खर्च केला जातो. पुरातत्व खात्याने हा किल्ला ताब्यात घेऊन त्याचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय सांगितला आहे पण त्याला अजून संमती मिळालेली नाही. पण अशा अनेक फॅसिलिटीमुळे हे जेल कायम चर्चेत राहतं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.