आरोपीची अंधश्रद्धा अन् पोलिसांच्या डोक्यालिटीमुळे दिवे आगारचा चोरीला गेलेला गणपती सापडला
डिसेंबर महिन्याच्या शेवटाला कुटुंबासोबत दिवेआगारला गेलो होतो. दोन दिवस राहिल्यावर परत येताना दिवेआगारच्या सोन्याच्या गणपती मंदिरात दर्शनाला गेलो होतो. तिथे गेल्यावर माहिती फलकांवर नजर गेली आणि झटकन सात आठ वर्ष मागे आठवणीत गेलो. पुण्यात बातमीदारी करताना २०११ ते २०२० पर्यंतचा काळ सर्वोत्तम होता.
पुणे पोलिस आयुक्तालयात एकापेक्षा एक महारथी अधिकारी होते. दबदबा असलेले. गुन्ह्याच्या तपासाची स्टाईलची विशेष ओळख असलेले. राम जाधव, राजेंद्र जोशी, राजेंद्र भामरे, सुनिल पवार, विजयसिंह गायकवाड, भानुप्रताप बर्गे, सतीश गोवेकर असे आणखी बरेच जण.
२०१२ ला दिवेआगारच्या मंदिरात दरोडा पडला आणि सोन्याची गणपतीची एक किलोचे मूर्ती चोरीला गेली होती. अगदी पुजाऱ्यांची ही खून करण्यात आले होते. या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं.
आर आर पाटील हे तेव्हाचे गृहमंत्री होते. लवकरच तपास पूर्ण करू असं आश्वासन आर आर पाटील यांनी दिल. गणपतीच्या मूर्तीचा विषय असल्याने प्रकरण मोठं संवेदनशील होतं. मुंबई एटीएस, कोकणातल्या पाचही जिल्ह्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम्स तपास करत होत्या पण कुणाच्याच हाताला काही विशेष लागत नव्हतं.
दिवस उलटत होते पण तपास इंचभरही पुढे सरकला नव्हता. तीन महिने उलटले. महाराष्ट्र सरकारचं विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं.
गृहमंत्र्यांवर दिवेआगारच्या गणपतीच्या दरोड्यावरून सभागृहात टीकेची झोड उठली होती. आर आर पाटील त्रस्त झाले होते. ॲंटीचेंबरला बराच वेळ विचार करत बसलेल्या आबांनी पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांना फोन लावला आणि दोन वेळा महाराष्ट्राचे बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर म्हणून त्यांनीच पारितोषिक दिलेल्या पोलिस निरीक्षक सुनिल पवारांना टीमसह दिवेआगारचा तपास करण्याचे आदेश दिले .
गुन्ह्यांच्या मालिकेत नुकतीच सायबर क्राईमची चर्चा सुरू झाली होती. त्याकाळात सुनिल पवार हे नाव वेगाने पुढं आलं होतं. तेव्हा सायबर क्राईम ही गुन्हे शाखेतली दुर्लक्षित ब्रॅंच होती. या ब्रांचचा चार्ज मिळालेले पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी ही संधी हेरली आणि जगभरात होणाऱ्या सायबर क्राईम आणि त्याच्या तपास पध्दतीचा अभ्यास केला.
पुण्यात घडलेल्या अनेक सायबर गुन्ह्याचा त्यांनी तपास लावला. सायबर क्राईमच्या प्रेस कॉन्फरन्स अचानक वाढल्या आणि सुनिल पवारांचं नाव प्रकाश झोतात आलं. राज्यातले पोलिस सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सुनिल पवारांकडे प्रशिक्षणासाठी किंवा मार्गदर्शनासाठी पाठवले जाऊ लागले. याच गुन्हाच्या तपासासाठी राज्याच्या पोलिस दलाची प्रतिष्ठेचा बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर हा किताब त्यांना दोन वेळा मिळाला होता.
मीरा बोरवणकरांना आलेल्या गृहमंत्री आबांच्या फोननंतर सुनिल पवारांना तातडीने दिवेआगारला रवाना होण्याचे आदेश झाले. गुन्हा घडून तीन महिने होऊन गेले होते.. बऱ्याच लीडवर एटीएस सह इतर शाखांचे तपास करून झाले होते पण हाती सीसाटीव्हीशिवाय काहीच लागलं नव्हतं.
केवळ एका आरोपीचा चेहरा आणि बोलण्याची लकब एवढच काय ते समोर होतं. तपासाची सगळी माहिती घेतलेल्या सुनिल पवारांनी अखेर त्यांचं ठेवणीचं शस्त्र काढलं. दिवेआगारच्या मंदिराजवळ येणार्या सगळ्या मोबाईल कंपन्यांच्या टॅावरचे डिटेल्स काढले. या कंपन्यांकडून दरोडा पडण्याच्या आठ दिवस आधीपासून ते दरोडा पडेपर्यंत या टॅावरवर रजिस्टर झालेल्या म्हणजे तिथे येऊन गेलेल्या मोबाईल नंबरचे डिटेल्स मोबाईल कंपन्यांकडून मागवले. काही हजार मोबाईलचा डेटा सुनिल पवारांकडे आला. पवारांनी या हजारो नंबर मधून तब्बल दोन हजार नंबर जे दोन पेक्षा जास्त वेळा तिथे या आठ दिवसात येऊन गेले होते ते बाजूला काढले आणि तपास सुरू केला.
२०१२ मध्ये तांत्रिक तपास अर्थात टेक्निकल सर्विलंस हे गुन्हे उकलण्याचं मोठं टूल ठरू शकेल हे अनेक पोलिसांच्या गावी ही नव्हतं.
या दोन हजार नंबरमधून गुन्हा घडण्याच्या वेळी तिथे आलेले नंबर शोधण्यात आले. या प्रक्रियेला जवळपास पंधरा दिवसांचा अवधी गेला होता. तिकडे तपास लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या गृहमंत्र्यांचा थेट सुनिल पवारांना फोन आला. कुठवर आलाय तपास ? असं विचारणाऱ्या आर आर आबांना लवकरच आरोपी सापडतील असं उत्तर देण्यापलीकडे पवार फार काही करू शकले नाहीत .. आरोपी शोधण्याचा दबाव प्रचंड वाढला होता. इतका की तेव्हाचे रेंज आयजी आवाजावरून आरोपी गुजरातचे असावेत अशा एका कोरड्या माहितीवर तब्बल १५ दिवस गुजरातमध्ये तपासासाठी गेलेले होते.
त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते. वरिष्ठ पातळींवर झालेल्या फोनाफोनीने गुजरात पोलिसांची ही मोठी टीम तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या तपासासाठी दिली होती. पण तरीही गुन्ह्याची उकल होत नव्हती.
दरम्यान टेक्निकल सर्विलंस च्या आधारे सुनिल पवारांना बरेच दिवस बंद असलेला एक मोबाईल अहमदनगरच्या घोसपुरी शिवारात सुरू झाल्याच लक्षात आलं. टीम रवाना झाल्या. मोबाईल लोकेशन झिरो डाऊन करून आरोपी ताब्यात घेण्यात आला आणि सीसीटीव्ही फुटेजचे ग्रॅब आणि आरोपी क्रॅासचेक करण्यात आला.
दरोड्यातला मुख्य आरोपी सुनिल पवारांच्या तावडीत होता.
आरोपीला सेफ हाऊस वर नेऊन त्याची चौकशी सुरू करण्यात आली. तब्बल सहा तास पोलिसी खाक्या दाखवूनही आरोपी कबूल होतंच नव्हता. दरम्यान तपासाची माहिती वरिष्ठाना कळवली होती पण केवळ आरोपी सापडून उपयोग नव्हता.
सोन्याचा गणपती सापडणं आवश्यक होतं. आरोपीकडे चौकशीचे पोलीसांचे चौकशीचे सगळे प्रकार वापरून ही तो काहीच माहिती देत नव्हता .. अखेर माईंडगेम खेळायचा पवारांनी ठरवलं. आरोपी ज्या समाजाचा होता त्यात विटाळ शिवाशिव या भ्रामक कल्पनांचं अंधश्रध्दाचं मोठ प्राबल्य होतं.
इतकं की आरोपीच्या नातेवाईक महिलेला मासिक पाळी आलेली असून तिला तुला स्पर्श करायला सांगेन असं त्या आरोपीला सांगितलं. तिला त्याच्या जवळ नेण्यात आलं. आरोपीने अंग चोरलं. महिला आणखी जवळ गेली आणि स्पर्श करेल इतक्यात आरोपीने जोरात ओरडून होय मीच दरोडा टाकला अशी कबूली दिली.
आणि गुन्ह्याची उकल झाली …
आता सोन्याचा गणपती वितळून नगर तालुक्यातल्या घोसेपुरीमध्ये माळावर एका झाडाखाली पुरून ठेवल्याच आरोपीने सांगितलं. झाड ओळखू येण्यासाठी झाडाला बुंध्याला कपडा बांधल्याची खून आरोपीने सांगितली. तातडीने आरोपीला घेऊन टीम रवाना झाली. मुद्देमाल म्हणजे वितळलेला सोन्याचा एक किलो वजनाचा गणपती पोलिसांनी पंचनामे करून ताब्यात घेतला. इतर आरोपींच्या नावाचा खुलासा झाला आणि वरिष्ठांना निरोप गेले.
मीरा बोरवणकर यांनी गृहमंत्र्यांना तातडीने सगळी माहिती दिली. संपूर्ण माहिती घेऊन सुनिल पवार तातडीने मुंबईला रवाना झाले. पत्रकार परिषदा झाल्या आणि सोन्याचा गणपती सापडल्याची माहिती महाराष्ट्राला मिळाली. तपासाची जबाबदारी मिळाल्यावर एका महिन्याच्या आत सुनिल पवार आणि त्यांच्या टीम ने गुन्हा उघडकीला आणला होता.
उच्च न्यायालयाच्या आदेशाने वितळवलेला गणपती पुन्हा घडवून प्रतिष्ठापना करण्यासाठी २०२१ उजाडावं लागलं. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दुर्दैवाने आर आर आबा हयात नाहीत.
सुनिल पवार सध्या सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पोहोचले असून पुण्याच्या गुन्हे शाखेची जबाबदारी हल्ली त्यांच्याकडे आहे.
न्यूज १८ लोकमत, पुणे ब्युरो चीफ वैभव सोनवणे यांच्या फेसबुक वरून साभार..