डान्स असो किंवा टी-२० क्रिकेट, डीजे ब्राव्होसारखा बादशहा नाही

क्रिकेट पाहताना दोन गोष्टी मनाला लय आनंद देतात. बॅटर्सचे कडक शॉट्स आणि बॉलर्सनं काढलेल्या विकेट्स. आता बॅटर्स काय प्रत्येक शॉटला सेलिब्रेट करू शकत नाहीत, पण बॉलर्स मात्र प्रत्येक विकेट साजरी करतात.

म्हणजे बघा आपला आशिष नेहरा आणि पाकिस्तानचा शोएब अख्तर विमान उडवायचे. ब्रेट ली हातानं जमीन खोदायचा. इम्रान ताहीर आईनं आवाज दिल्यागत पळत सुटतो. आणखी एक कार्यकर्ता आहे, जो विकेट मिळाली की पद्धतशीर नाचतो. आता नाचणारा शूटर म्हणल्यावर टीम कुठली असणार – वेस्ट इंडिज. आणि विंडीजचा भारी डान्सर एकच

– डीजे ब्राव्हो!

जुन्या काळात वेस्ट इंडिजचे बॉलर्स म्हणल्यावर बाऊन्सर्स आणि बॅटर्सची फुटलेली डोकी आठवायची. मग काळ बदलत गेला, आता बाऊन्सर्स म्हणल्यावर कुणाची फाटत नाही. आता धुव्वा होतो तो स्लोअर वनवर. आणि स्लोअरवन टाकण्यात डीजे ब्राव्हो लय माहीर.

ब्राव्होनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं तेव्हा टी२० क्रिकेटचा विषयही अस्तित्वात नव्हता. ब्राव्हो टेस्ट खेळला, वनडे खेळला. फिटनेसचा तर काय वांदा नव्हताच, गुणवत्ताही ठासून भरली होती. तरीही ब्राव्होला म्हणावी तशी संधी काय मिळाली नाही.

कारण उषा नाडकर्णी आणि अलका कुबल यांच्यात पिक्चरमध्ये जितकं सख्य असायचं, तितकंच विंडीज क्रिकेट बोर्ड आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये आहे.

पण ब्राव्हो काय थांबला नाही, तो जगभरातल्या टी२० लिग्समध्ये खेळू लागला. आयपीएल, बीबीएल या बड्या लिग्सपासून पार पाकिस्तान सुपर लीग, टी१० लीग सगळीकडे ब्राव्होचा डान्स पाहायला मिळाला. हाताच्या बोटांवर मोजता येणार नाहीत इतक्या टीम्सकडून ब्राव्हो खेळलाय.

त्याला डीजे नाव का पडलं?

आता तुम्ही म्हणाल सिंपल आहे भिडू. तो गाणी गातो, म्युझिक ब्युझिक देतो म्हणल्यावर तो डीजे असंल की. पण तसं नाय ए. उगा सांगायला जाल आणि लोकं खोटं म्हणतील. त्याला डीजे ब्राव्हो म्हणतात कारण त्याचं पूर्ण नाव ए, ड्वेन जॉन ब्राव्हो.

आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, ब्राव्होचं निकनेम ए जॉनी. आपल्याकडं पोरं एकमेकांना फादरच्या नावानं हाक मारतात, ती परंपरा विंडीजमध्ये पण असावी बहुतेक.

पारावरच्या गप्पा लय हाणल्या, आता क्रिकेटर ब्राव्होबद्दल सांगतो-

टी२० क्रिकेटमध्ये १६ ते २० या ओव्हर्स लय जास्त इम्पॉर्टन्ट असतात. तुमची टीम बॅटिंग करत असंल तर या ओव्हर्समध्ये हाणावं लागतं आणि बॉलिंग करत असंल तर सनासन विकेट्स काढाव्या लागतात. ब्राव्हो या दोन्ही गोष्टी करू शकतो. आता तसं बॅटिंगची जबाबदारी त्याच्यावर फारशी येत नाही. लोड असतोय तो बॉलिंगचा.

ब्राव्हो काय जोरात बॉलिंग करत नाय, पण अनुभव आणि हुशारी इतकी भारी आहे की टप्पा आणि वेग या दोन गोष्टींच्या तालावर तो समोरच्याला किरकोळीत नाचवू शकतो.

टी२० क्रिकेटमध्ये बॉलर्स कायम मार खाताना दिसतात. इथं विकेट काढणं तसं कष्टाचंच काम असतं. ब्राव्होनं विषय खोल केला, कसा? टी२० मध्ये ३०० विकेट्स काढणारा पहिला बॉलर तोच. ४०० विकेट्स काढणारा पण तोच आणि डायरेक्ट ५०० विकेट्सची पावती फाडणारा पहिलाही तोच. त्यात भारी गोष्ट म्हणजे, त्याच्या विकेट्समधला सगळ्यात मोठा शेअर हा डेथ ओव्हर्समध्ये आलाय.

वेस्ट इंडिजला दोन टी२० वर्ल्डकप जिंकून देण्यातही ब्राव्होचा मोठा रोल आहे. जगभरातल्या पण अनेक लिग्स त्यानं जिंकल्यात, पण भारतातल्या कार्यकर्त्यांना ब्राव्हो आवडण्याचं एक खास कारण आहे,

धोनीअण्णाचा हुकमी एक्का

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स अशा टीमकडून खेळला असला, तरी ब्राव्हो चमकला तो धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडूनच. आता धोनीला विकेट्स हव्या असुद्यात किंवा लास्टच्या ओव्हर्समध्ये हाणामारी करायची असूद्यात हा हुकमी एक्का तयार असतोच. शेवटच्या ओव्हरमध्ये कितीही कमी रन्स वाचवायचे असले तरी ब्राव्होमध्ये डेरिंग आणि अनुभव दोन्ही आहेत.

आणि हा ते गाण्याविषयी सांगायचंच राहिलं. ब्राव्होनं लिहिलेलं आणि गायलेलं चॅम्पियन गाणं लय गाजलं. वेगवेगळ्या क्षेत्रात भारी काम करणाऱ्या कृष्णवर्णीय लोकांना चॅम्पियन म्हणत, ब्राव्हो सगळ्यांमध्ये एक चॅम्पियन दडलाय असं सांगून जातो.

मैदानावर राडे-बिडे होत असतात, कधी नुसती नजरफेक होते; ब्राव्हो मात्र या सगळ्यापासून पार लांब असतो. हरला, जिंकला, सिक्स खाल्ला, आऊट झाला तरी तोंडावरचं हसू काय जात नाय. जगातल्या कुठल्याही चाहत्याला आपल्या देशाच्या टीमनंतर विंडीजची टीम आवडते, त्यामागचं कारण ब्राव्होसारखी निवांत पोरं आहेत.

आपण लोकं क्रिकेट लय हार्डमध्ये घेतो, ब्राव्हो असा भिडू आहे जो क्रिकेट जगतो तेही रितसर आनंद घेत!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.