शार्प शुटर राजकारणी म्हणवल्या जाणाऱ्या डी के शिवकुमार यांच्यावर स्वपक्षातून गेम झालाय …

काँग्रेसचे ग्रह फिरलेत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून  काँग्रेसला एकामागून एक अडचणींचा सामना करावा लागतोय. पंजाबचं होत नाहीतर, छत्तीसगड त्यांनतर राजस्थान मग उत्तर प्रदेश अश्या सगळ्या राज्यांमध्ये नवनवीन राजकीय नाट्य पाहायला मिळतंय. त्यात आता असंच काहीस कर्नाटकात सुद्धा पाहायला मिळतंय.

कर्नाटकातल्या काँग्रेस अध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांनी लाच घेतल्याचा आरोप केला आहे. आणि हा आरोप काही साधासुधा नाही बरं का तर तब्ब्ल १०० कोटींचा. 

कर्नाटक काँग्रेस नेत्यांच्या गप्पांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. काँग्रेसचे माजी लोकसभा खासदार बी. एस. उग्रप्पा आणि मीडिया समन्वयक सलीम अहमद यांच्यातल्या गॉसिपिंगने कर्नाटक काँग्रेस डोकेदुखी वाढलीये.

हे दोघेही काँग्रेसमंडळी एका परिषदे दरम्यान खुरुस- पुसून करत होती. त्यांच्या पुढं माईक तर होतेच पण माध्यमांचे बूम सुद्धा होते. आता जसं मांजराला वाटत कि, डोळे झाकून दूध पिलं म्हणजे कोणी पाहणार नाही. तसंच काहीस या दोघांना वाटलं कि, हळूच कानात बोललं म्हणजे काही ऐकू जाणार नाही.  पण कानडी भाषेतली त्यांची चर्चा व्हिडिओ सकट रेकॉर्ड केली गेली.

कर्नाटक काँग्रेसची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी व्हीएस उग्रप्पा आणि सलीम अहमद यांनी आपल्या गुजगोष्टीमध्ये कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांना ‘बेवडा’ म्हणत होती, एवढंच नाही तर डीके शिवकुमार यांनी १०० कोटींची लाच घेतल्याचंही या दोघांनी यावेळी म्हंटल. 

या  दोन्ही नेतेमंडळींनी असंही म्हंटल की, डीके शिवकुमार मंत्री असताना १८ ते २० टक्के कमिशन घेत असत.

हा व्हिडिओ भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

आता, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अर्थातच शिवकुमार यांच्यावर संशयाच्या सुया सरकल्या. माध्यमांनी त्यांना प्रश्नही विचारले, पण त्यांनी उत्तर देणं टाळलं. शिवकुमार म्हणाले की,

त्यांना या प्रकरणावर कुठलंच भाष्य करायचे नाही, परंतु शिस्तपालन समिती या संदर्भात कडक कारवाई करेल.

दरम्यान, शिवकुमार यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने दोन्ही नेत्यांवर कडक कारवाई केली. पक्षाचे नेते व्ही. एस. उग्रप्पा यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर पक्षाचे नेते एमए सलीम अहमद यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय.

यावर, काँग्रेसने स्पष्ट केल कि, उग्रप्पा एमए सलीम अहमद यांना फक्त भाजपकडून शिवकुमार यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल सांगत होते. उग्रप्पा म्हणाले की, ‘मी काल एका पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी आलो होतो. आमचे मीडिया संयोजक सलीम यांनी सांगितले की, काही लोक म्हणत आहेत की डीके शिवकुमारचे लोक पैसे घेत आहेत. आणि भाजप हा आरोप करत असल्याचं ते यावेळी सांगत होते. 

उग्रप्पा म्हणाले कि, मीडियासुद्धा सलीम यांच्याशी बोलू शकते. काँग्रेस भ्रष्टाचाराला समर्थन देत नाही, विशेषतः डी के शिवकुमार. ते एक चांगले प्रशासक आहे आणि त्यांनी व्यवसायाद्वारे पैसे कमावले आहेत. पण हे सगळं बोलण्यासाठी सलीम यांनी योग्य जागा निवडली नाही ज्यामुळे  पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

आता डि.के. शिवकुमार यांच्याबद्दल सांगायचं झालं तर कर्नाटकच्या राजकारणात ‘राजकीय शार्प शुटर’ अशी त्यांची ओळख. ते काँग्रेसमधले धनाढ्य नेत्यांपैकी एक आहे. २००८ सालच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी आपली एकूण संपत्ती ७५ कोटी रुपये इतकी जाहीर केली होती. तर २०१३ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी कनकपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्यावेळी त्यांनी आपली संपत्ती २५१ कोटी असल्याचं सांगितलं होत. म्हणजे पुढच्या ५ वर्षांच्या काळात त्यात १७६ कोटींनी वाढ झाली होती.  तर त्यानंतर २०१९ च्या   निवडणुकीवेळी त्यांनी आपली संपत्ती जवळपास ८०० कोटी रुपये असल्याचं म्हंटल, म्हणजे संपत्तीत दुप्पट तिप्पट वाढ. 

हे ही  वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.