शेअर मार्केट वधारलं आणि डीमार्टचे सीईओ अब्जाधिश झाले

लय वर्षांपूर्वी आमच्या मंडळातला एक कार्यकर्ता शेअर मार्केटमध्ये पैशे लावा म्हणून सांगत होता. ‘तुला गणितात किती मार्क पडायचे रे?’ हे असले प्रश्न विचारून आम्ही त्याला गप करायचो. आता काही काही बातम्या वाचून भावाची लय आठवण येती. असं वाटतं मार्क गेले चुलीत त्याला टिप्स विचारायला हव्या होत्या. आतापण अशीच एक बातमी वाचली आणि त्याभावाची लय मजबूत आठवण आली.

जिथं कमी तिथं आम्ही हा फॉर्म्युला एसटीनंतर कुणी वापरला असेल तर डीमार्टनं. मोठमोठ्या कंपन्यांनी बिग बाझार, रिलायन्स फ्रेश, मोर असे पत्ते उभे केले, पण एकच बादशाह टिकून राहिला तो म्हणजे डीमार्ट. हॉस्टेलवर राहणारी पोरं असोत किंवा फॅमिली असो, घरनं पैशे आले काय किंवा पगार झाला काय- डीमार्टमध्ये चक्कर फिक्स म्हणजे फिक्स!

आता याच डीमार्टसाचे सीईओ इग्नॅशियस नरोन्हा देशातले सगळ्यात श्रीमंत सीईओ ठरले आहेत. त्यांच्या संपत्तीत एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. आता त्यांची एकूण संपत्ती आहे ७ हजार ७४४ कोटी. या मागं फक्त लोकं सारखं डीमार्टमध्ये जातात हे कारण आहेच, पण त्याहून मोठं कारण आहे ते म्हणजे शेअर मार्केट.

डीमार्ट रिटेल स्टोअर्स अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्केट्स लिमिटेडद्वारे चालवलं जातं. डीमार्ट रिटेल फर्मच्या शेअर्समध्ये यावर्षी ११३ टक्क्यानं वाढ झाली आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या ट्रेडिंगमध्ये, या स्टॉकनं इंट्रा डेमध्ये ५ हजार ८९९ रुपयांच्या नव्या विक्रमाला स्पर्श केला. मार्केटकॅपनंही ३.५४ लाख कोटी रुपयांची पातळी ओलांडली. विशेष म्हणजे गेल्या सात सेशन्सपासून शेअरमध्ये सातत्यानं वाढ होत आहे आणि ही वाढ जवळपास ४० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

अ‍ॅव्हेन्यू सुपर मार्केटचे शेअर्स वधारल्यानं नरोन्हा यांच्या संपत्तीनं इतकी मोठी झेप घेतली. हा स्टॉक २१ मार्च २०१७ रोजी बाजारात सूचिबद्ध झाला. त्याची इश्यू किंमत २९९ रुपये होती. तेव्हापासून, या स्टॉकमध्ये एकूण १८०० टक्के वाढ झाली आहे. सध्या, अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्केट्स लिमिटेडमध्ये नरोन्हा यांचे १३.१३ दशलक्ष शेअर्स म्हणजेच २.०३ टक्के इतकं भागभांडवल आहे.

नरोन्हा यांचा जन्म मुंबईत झाला, त्यांनी नर्सी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे. ते याआधी हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये काम करत होते. अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी त्यांची २००४ मध्ये व्यवसाय प्रमुख म्हणून नियुक्ती केली. नरोन्हा २००७ मध्ये कंपनीचे सीईओ झाले.

आम्ही काय शेअर मार्केटचं प्रमोशन करत नाही, पण भिडू लोक कुणी काय सांगत असलं तर कान देऊन ऐका. उगा डोक्यावर हात मारत बसण्यात काय पॉईंट नाही.

आणखी एक, डीमार्टनं एवढं मार्केट कसं तयार केलं, त्यांचा खरा मालक कोण असे प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर खाली लिहिलेल्या वाक्यावर क्लिक करा.

डी मार्ट खरच दाऊदचं आहे काय..? 

हे ही वाच भिडू:

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.