सातारच्या ज्ञानोबा बापुंमुळे शेतकऱ्यांची मुलं “कृषी पदवीधर” होवू शकली.

भारत स्वतंत्र होवून दोन दशके झाली होती. अन्नधान्यात स्वयंपुर्ण होण्याच्या दिशेने पाऊले पडत होती. स्वतंत्र भारतात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या धोरणानुसार मोठ्ठे प्रकल्प आकारास येत होते. मोठे प्रकल्प व पायाभूत विकासातून आपण आधुनिक भारताचं स्वप्न साकारू शकतो अशी नेहरूंची धारणा होती. याच विचारातून शेती व संशोधन क्षेत्रास देखील चालना देण्यात येत होती. नेहरूंच्या पश्चात लाल बहादूर शास्त्रींनी “जय जवान जय किसान” चा नारा दिला.

याच दरम्यान भारतातल्या कृषीतज्ञांनी एक विचार मांडला तो म्हणजे स्वतंत्र अशा कृषी विद्यापीठांचा. 

त्यापुर्वी महाराष्ट्रात कृषी क्षेत्राला वाहिलेली महाविद्यालये होतीच. महाराष्ट्रातील अमरावती येथे असणारे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय आणि बाबा आमटे यांनी सुरू केलेले आनंद निकेतन कृषी विद्यालय हे कृषी क्षेत्रातील शिक्षणासाठी काम करतच होती. पण कृषीतज्ञांचा हा विचार स्वतंत्र अशा विद्यापीठांचा होता. 

हा विचार पटला आणि कृषी विद्यापीठ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या धोरणानुसार महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणून राहूरी कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.

१९६८ साली महात्माफुले कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या दहा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र ठरवून विद्यापीठाचे कामकाज सुरू झाले. कृषी साक्षरतेसाठी कृषी पदवीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला.  

पण एका गोष्टीची कमतरता जाणवतच होती. ती म्हणजे कृषीतज्ञांसोबत मुलांना नेमकं काय शिकवायला हवं. कस शिकवायला हवं. अभ्यासक्रम काय असावा याबद्दल सडेतोड सांगणारी खऱ्या अर्थाने मातीत राबणारे शेतकरी.

असे लोक विद्यापीठाचे सिनेट मेंबर असतील तर भविष्यात कृषी विद्यापीठाचे धोरण ठरवणे सोप्पे ठरेल. यशवंतराव चव्हाण यांनी विचार केला की, अशा विद्यापीठांमध्ये सिनेट म्हणून खऱ्या अर्थाने मातीत राबणारे शेतकरी असावेत. याच विचारातून यशवंतराव चव्हाण यांनी एका प्रगतशिल शेतकऱ्याला सिनेट मेंबर होण्याची संधी दिली. 

कदाचीत यशवंतराव चव्हाणांना देखील माहिती नसावं, त्यांनी विश्वास दाखवलेला हा माणूस शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांच सोनं करणार आहे ते. 

त्याचं नाव ज्ञानोबा बापू भोसले.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एकसळ गावचे प्रगतशील शेतकरी. यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर त्यांचे जवळचे संबध. त्यांच्या वडिलांना महाराष्ट्र शासनाने पहिला शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देवून सन्मानित केलं होतं. आपल्या शेतीत त्यांनी त्या काळात ६ किलोचा फ्लॉवरच उत्पादन घेतल्याचं सांगण्यात येत. 

तर अशा प्रगतशील शेतकरी असणाऱ्या साध्या व्यक्तिस यशवंतराव चव्हाणांनी राहूरी कृषी विद्यापीठाचे सिनेट मेंबर केलं. यशवंतराव चव्हाणांनी एका शेतकऱ्यास सिनेट मेंबर होण्याची संधी दिली. ज्ञानोबा बापू हे विद्यापीठाच्या कामकाजाकडे जातीने लक्ष देवू लागले.

विद्यापीठाचं काम सुरू झालं आणि काही वर्षात विद्यापीठाचा पहिला पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीच आधुनिक शिक्षण घ्यावं म्हणून कृषी विद्यापीठांची स्थापना करणं हा मुलभूत विचार होता. मात्र ज्ञानोबा बापूंना या पदवीदान समारंभात दिसलं की शेतीशी संबधित नसणारी मुलचं पदवीदान समारंभास उपस्थित होती. वास्तविक जे मुलं प्रवेश घेत होती ती कृषी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यामध्ये नोकरी लागण्यासाठी. पण शेतकऱ्यांच्या मुलांना या विद्यापिठात स्थान नसल्यासारखच होतं.

अशा वेळी त्यांनी विचार केला, आपण हे विद्यापीठ ज्यांच्यासाठी चालवत आहोत तेच विद्यार्थी इथे नसतील तर आपण सिनेट मेंबर असण्यात काय अर्थ. त्यांनी तडकाफडकी विद्यापीठाच्या संचालक मंडळाची बैठक घेतली. ज्यांच्या घरी शेती आहे त्यांच्या मार्कांवर १२ % जास्त मार्क गृहित धरण्याचा तोडगा काढून त्यांनी बैठक संपवली. त्यानंतर तो प्रस्ताव तत्कालीन कृषी आयुक्त शंकरराव मोहिते यांच्याकडे पाठवण्यात आला. शंकरराव चव्हाण यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यापुढे ठेवला. त्यांनंतर निर्णय घेण्यात आला की ज्यांच्याकडे सातबारा आहे अशा विद्यार्थांला कृषी प्रवेशावेळी १२ टक्के मार्क वाढवून देण्यात येतील. त्यांच्या या दूरदृष्टीमुळेच शेतकऱ्यांची मुले कृषी पदवीधऱ होवू शकली.

संदर्भ : वैभव कोकाट.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.