१९४७ साली या तीन दोस्तांनी ठरवलं, “अयोध्या तो झाँकी है, काशी मथुरा बाकी है “

सध्या वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीवरून देशात रान पेटलेले आहे. अयोद्धेनंतर काशी चर्चेत आलं आहे.

“ज्ञानवापी मशीद मंदीर तोडून बांधण्यात आली होती का?”

याचं सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालयाने पथक पाठवले होते त्यास काही गटांनी विरोध केला. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा कोर्टात गेलं. कोर्टाने पुन्हा सर्वेक्षण करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे ज्ञानवापी मशिदीचं व्हिडिओ सर्वेक्षण पुन्हा चालू होणार आहे. 

पण हा मुद्दा पहिल्यांदा कोणी बाहेर काढला त्याचाच हा इतिहास.

असं म्हणतात की पुराण काळापासून येथे भगवान शंकराची स्वयंभू ज्योतिर्लिंग होतं. सतराव्या शतकात मुघल बादशाह औरंगजेबाने दोन हजार वर्षे जुने काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं आणि तिथे एक मशीद बांधली. हीच ती ज्ञानवापी मशीद.

 

सध्याच्या काशी विश्वेश्वराच्या आवारातच ही मशीद आहे.

अयोध्येत बाबरीच्या वादग्रस्त केसचा निकाल लागला, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. तेव्हा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात आल्या,

“अयोध्या तो केवल झाँकी है, काशी मथुरा अभी बाकी है”

भारतातल्या सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये मंदिराची विटंबना करून मशिदी उभारल्या असल्याचा दावा  कार्यकर्त्यांकडून केला जातो आणि  त्याच दृष्टीने अयोध्येनंतर काशी कडे लक्ष वळवलं असल्याचं सांगितलं जात.

आजच्या या घोषणेची सुरवात मात्र सत्तर वर्षांपूर्वी झालेल्या तीन दोस्तांच्या गप्पांमधून झाली.

हे तीन दोस्त म्हणजे तत्कालीन गोंडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी के के नायर, बलरामपुरचे महाराज पटेश्वरी प्रसाद सिंग आणि गोरखपूरच्या मठाचे अधिपती योगी दिग्विजयनाथ. या तिघांचं वैशिष्ट्य म्हणजे ते तिघेही राम भक्त होते.

या शिवाय तिघांना जोडणारा एक दुवा होता तो म्हणजे लॉन टेनिस. 

अयोध्येच्या शेजारचा जिल्हा असलेल्या गोंडा येथे एक लॉन टेनिसच ग्राउंड होतं. बलरामपूर संस्थानचे महाराज हे परदेशात शिकलेले होते. इंग्रज अधिकाऱ्यांसोबत राहून त्यांना या टेनिसची आवड निर्माण झाली होती. ते रोज तिथे खेळायला यायचे. त्याच वेळी कलेक्टर बाबू के के नायर हे देखील टेनिस खेळायला जायचे. गंमत म्हणजे योगी दिग्विजयनाथ देखील या इंग्लिश खेळाचे शौकीन होते.

योगी दिग्विजयनाथ मूळचे राजस्थानच्या मेवारचे. लहानपणीच त्यांना गोरखनाथ मठात आणलं गेलं. ते उच्चशिक्षित देखील होते. पण त्यांना शिक्षणापेक्षा खेळात जास्त रस होता. कॉलेजमध्ये असताना ते टेनिसचे चॅम्पियन होते.

पुढे त्यांना गोरखनाथ मठाचे अधिपती म्हणून दीक्षा देण्यात आली. पण यातूनही दिग्विजयनाथ यांनी आपली टेनिसची आवड चांगलीच जपली होती.

या तीन दोस्तांची रोज टेनिस कोर्टवर भेट व्हायची. राजकीय धार्मिक अशा विविध विषयांवर गप्पा व्हायच्या. तिघेही रामभक्त असल्यामुळे अयोध्येत बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर उभारलं जावं असं स्वप्न ते नेहमी बघायचे.

स्वातंत्र्यलढ्याच्या उत्तरार्धाचा हा काळ. इंग्रजांनी देश सोडून जायचं कबूल केलं होत मात्र स्वातंत्र्य देताना मुसलमानांना वेगळा पाकिस्तान देण्याची मेख मारून ठेवली होती. या मुळे कट्टर हिंदू तरुणांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. योगी दिग्विजयनाथ हे सावरकरांच्या हिंदू महासभेचे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष होते. त्यांचा या फाळणीला सख्त विरोध होता.

के के नायर सरकारी नोकरीत असले तरी त्यांचा हिंदुमहासभेच्या चळवळीकडे ओढा होता.

पाटेश्वरी प्रसाद महाराज हे धार्मिक असल्यामुळे त्यांच्याकडे नेहमी साधुसंतांची ये जा सुरूच असायची. यातूनच धर्मसम्राट उपाधी मिळालेले करपात्री महाराज एकदा त्यांच्याकडे आले होते. त्यांनी अखिल भारतीय राम राज्य परिषद पार्टीची स्थापना केली होती. पाटेश्वरी प्रसाद सिंह महाराज यांनी या पक्षाला उभारणीसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला.

हा अखिल भारतीय राम राज्य परिषद हा पक्ष हिंदुत्ववादी तर होताच शिवाय गेली पाचशे वर्ष चिघळत असलेल्या बाबरी मशिदीच्या प्रश्नावर देखील आवाज उठवत होता. 

१९४७ साली एकदा पाटेश्वरी प्रसाद सिंह यांच्या बलरामपूरच्या राजभवनात एका महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. स्वतः करपात्री महाराजांच्या हस्ते हा यज्ञ संपन्न होत होता. के के नायर देखील पहिल्या दिवसापासून या यज्ञात सहभागी होते. महंत दिग्विजयनाथ शेवटच्या दिवशी आले.

त्या दिवशी रात्री या सगळ्यांची बैठक बसली. त्या बैठकीमध्ये अयोध्येत राम मंदिर स्थापन करायचं ठरलं. फक्त इतकंच नाही तर अयोध्येपासून सुरवात करायचीच शिवाय काशी, मथुरा या तीर्थक्षेत्रावरील परकीय आक्रमणाबद्दल चर्चा झाली. काशी मध्ये औरंगजेबाने विश्वेश्वराच मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद बनवली आहे ती बाबरीच्या नंतर पाडायची असं ठरवण्यात आलं.

के के नायर तर म्हणाले,

“मी या कार्यासाठी काहीही करायला तयार आहे. हवं तर माझी नोकरी गेली तरी बेहत्तर पण राम मंदिर होणारच.”

योगायोगाने १ जून १९४९ रोजी त्यांची बदली फैजाबादला झाली. फैजाबादच्या कलेक्टरच्या हातात अयोध्या कार्यक्षेत्र येते. त्यांच्या मदतीनेच अखिल भारतीय रामराज्य परिषदेने महंत दिग्विजयनाथांच्या नेतृत्वाखाली बाबरी मशिदीच्या समोर रामचरितमानसच नऊ दिवसांचे पठन आयोजित केलं.

याच पठणाच्या शेवटच्या दिवशी २२ डिसेंबर १९४९च्या मध्यरात्री अचानक बाबरी मशिदी मध्ये “रामलल्ला प्रगटले”

पुढे अनेक वर्षांनी घेण्यात आलेल्या एका मुलाखतीमध्ये अखिल भारतीय रामानंद संप्रदायचे महंत राम सेवक दास शास्त्री यांनी सांगितलं की, मी स्वतः आपल्या हाताने ही मूर्ती तिथे ठेवली. सोबत अनेक सहकारी देखील होते. भगवान रामाने दृष्टांत दिला ते प्रगट झाले. म्हणून आम्ही त्यांची प्रतिष्ठापना केली.

या सगळ्याचा मुख्यसूत्रधार योगी दिग्विजयनाथ होतेच शिवाय रामलल्लाची मूर्ती तिथे ठेवण्यामागे जिल्हाधिकारी के के नायर यांचा देखील हात होता. 

या घटनेनंतर अस्वस्थ झालेल्या नेहरूंच्या केंद्र सरकारने मशिदीतून रामाची मूर्ती हलवण्याचा आदेश दिला पण जिल्हाधिकारी केके नायर यांनी यावरून हिंसक दंगल होऊ शकते या कारणाने मूर्ती हटवण्यास नकार दिला.  पुढे फैझाबादच्या लोकल पोलिसांनी दंगली होऊ नयेत म्हणून मशिदीची दारे बंद केली व कुलूप घातले.

के के नायर यांनी लवकरच आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि जनसंघाच्या माध्यमातून निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली.

त्यांनी योगी दिग्विजयनाथ, महाराजा पाटेश्वरी प्रसाद सिंह यांच्यासह राम मंदिरच्या आंदोलनाचा पाया रचला. इतकंच नाही तर अयोध्या बस झाँकी है काशी मथुरा बाकी है या घोषणेची सुरवात तेव्हापासून केली.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. Rohit says

    अरे भिडू…तुझी माहिती खूप चांगली असते रे…आणि डायरेक्ट लिंकच सेंड करायची ईच्छा होते ;पण तुझ्या पेज वर ज्या प्रकारच्या ऍड येतात ना त्यामुळे नाईलाजाने नाही करता येत…माहिती तर फॅमिली टाईप सांगतो मग जाहिराती का अश्या देतो? एकतर चांगल्या ऍड दे नाहीतर कॉपी पेस्ट करण्यासाठी vpn किंवा दुसरा ऑप्शन सांग…

Leave A Reply

Your email address will not be published.