सातारचे प्रति बाळासाहेब कुठल्या गटात आहेत माहित आहे का ?

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा अनेक कारणांनी गाजला. शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आणि बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला कोण हजर राहणार, कोण भाषण करणार यावर अनेक ठिकाणी पैज सुद्धा लागली होती.
या सगळ्यात अजून एक चर्चा रंगली होती. ती म्हणजे बीकेसी मधील मैदानावर शिंदे यांच्या मेळाव्याला सातारच्या प्रति बाळासाहेब यांनी लावलेली उपस्थिती.
सातारचे प्रति बाळासाहेब नेमके कोण आहेत ?
त्यांचे नाव भगवान शेवडे असून ते मूळचे खटाव तालुक्यातील औंध गावाचे. जन्मता: अपंग असणारे शेवडे शाळेत हुशार होते. १९७२ साली त्यांची मॅट्रिक झाली. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना पुढचे शिक्षण घेता आले नाही. शेवडे अपंग असले तरीही त्यांना काम करणे गरजेचे होते. त्यामुळे शेवडे यांनी औंध सोडून १९७९ मध्ये सातारा शहर गाठले.
शेवडे यांना साताऱ्यातील जीवन ज्योती हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवक म्हणून काम मिळाले होते. त्यांना १०० रुपये महिना पगार होता. तसेच लहानपणी त्यांना प्रबोधन ठाकरे यांचे एक पुस्तक वाचायला मिळाले होते. त्यानंतर शेवडे यांच्यावर ठाकरे कुटुंबीयांचा प्रभाव वाढत गेला.तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर शालेय जीवनापासून शिवसेनेबद्दल आवड निर्माण झाली होती. त्यामुळे गावात शिवसेनेचा कुठलाही कार्यक्रम असला की ते सहभागी होत असायचे.
टीव्हीवर, रेडिओ जिथे कुठं बाळासाहेबांचं भाषण त्यांना ऐकायला मिळायचं ते थांबून ऐकत होते. तर १९७९ मध्ये शेवडे साताऱ्यात आले आणि त्यांची शिवसेनेबद्दल अजून जवळीक वाढत गेली. बाळासाहेबांबद्दल जे काही मिळत होते ते वाचत गेले.
शेवडे हे रुग्णसेवक म्हणून हॉस्पिटलमध्ये काम करत असतांना वेळ मिळेल तसे शिवसेनेसाठी काम करत होते. त्यांच्या सायकलला नेमही भगवा झेंडा आणि बाळासाहेब यांचा फोटो लावलेला असायचा. सुरुवातीला शेवडे हे अपंग असल्याने त्यांना कार्यक्रम, आंदोलनाला बोलावलं जात नव्हते. ते कसे येतील, त्यांची काळजी कोण घेईल असे कारणे देऊन त्याला डावलं जात होत. मात्र त्यांनी हार मानली नाही. सकाळी उठल्यावर ते पेपर वाचायचे आणि जिथं कुठं आंदोलन आहे तिथे पोहचायचे.
त्यावेळी साताऱ्यातील नागरिक, शिवसैनिक भगवान शेवडे यांना तुम्ही बाळासाहेबांना सारखे दिसता असं सांगत होते. त्यामुळे शेवडे कामाचा अजून हुरूप येत असे. अपंग असल्याने शेवडे यांना मुंबईला जाऊन कधीच बाळासाहेब ठाकरे भेटता आले नाही. मात्र भगवान शेवडे यांची फार इच्छा होती. त्यासाठी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना ११ पत्रे पाठवली होती आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र ती संधी त्यांना कधीच मिळाली नाही. त्यामुळे आजही ते उद्धव ठाकरे वर नाराज असतात.
मग यानंतर भगवान शेवडे यांनी बाळासाहेबांप्रमाणे लूक करण्याचे ठरवले
१७ नोव्हेंबर २०१२ ला बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. शेवडे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर मात्र त्यांनी बाळासाहेबांप्रमाणे लूक करण्याचे ठरविले. त्यासाठी शेवडे यांनी दाढी वाढवली, भगवी शाल, रुद्राक्षाची माळ आणि चष्मा वापरला सुरुवात केली.
शेवडे यांचे कडवा शिवसैनिक अशी ओळख अगोदर पासून तर होतीच आता बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे दिसू लागल्याने त्यांना लोक सातारचे प्रति बाळासाहेब म्हणून ओळखू लागले. यानंतर त्यांना लोक अनेक ठिकाणी बोलावू लागले मात्र अपंग असल्याने त्यांना मर्यादा येतात. त्यामुळे ते सातारा सोडून जास्त कुठे जात नाहीत.
राजकारणाबरोबर शेवडे यांना समाजकारणाची आवड सुद्धा आहे. त्यांच्या या कामामुळे आता पर्यंत ८५ पुरस्कार देण्यात आले आहेत. तसेच अपंग असून सुद्धा त्यांनी आता पर्यंत २२ वेळा रक्तदान केले आहे. १९७९ पासून ते २००३ पर्यंत शेवडे साताऱ्यातील जीवन ज्योती हॉस्पिटल मध्ये कामाला होते. २००३ पासून ते आयुर्वेदिक रुग्णालयात काम करत आहेत.
बोल भिडूशी बोलतांना भगवान शेवडे म्हणाले की,
“जेव्हा पासून थोडं फार समजायला लागलं तेव्हा पासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो आहे. १९६६ पासून शिवसेने सोबत आहे. पक्षाच्या वतीने सातारा शहरात आंदोलने झाली, कार्यक्रम झाली त्या सगळ्यात सहभाग घेतला आहे”.
शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आघाडी करणे चुकीची होते. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या सोबत जाऊन चूक केली. यांची आघाडी नीट-नेटकी झाली नाही त्यामुळे शिवसेनेत फूट पडली. जर बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेत कधीच फूट पडली नसती.
उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्या ऐवजी एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला हजर राहिल्याबद्दल शेवडे यांनी सांगितले की,
बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्याची फार इच्छा होती. त्यासाठी मातोश्रीला ११ पत्रे पाठवली मात्र एकाही पत्राला उत्तर आले नाही. यामुळे मी नाराज होतो. तसेच शिवसेनेने महाविकास आघाडीत जाणे मला आवडले नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात एकदा आले होते. त्यावेळी त्यांनी माझी भेट घेतली होती. तसेच जी काही मदत लागेल ती करणार असे आश्वासन दिले होते. त्यांनी दसरा मेळाव्याला येण्यासाठी सांगितले होते. मेळाव्याच्या दिवशी त्यांनी बीकेसीला पोहचण्याची सगळी व्यवस्था केली होती असेही त्यांनी यावेळी शेवडे यांनी सांगितले.
सातारच्या प्रति बाळासाहेब भगवानराव शेवडे यांचे वय ७० आहेत. त्यांचा मागे पत्नी, मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. त्यांचा उत्साह आजही तरुण शिवसैनिकाएवढाच आहे.
हे ही वाच भिडू
- “उद्धव, आदित्यला सांभाळा, इमान सांभाळा”…बाळासाहेबांचं दसरा मेळाव्यातलं शेवटचं भाषण…
- बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्याच दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपला दणका दाखवला होता..
- दसरा मेळावा घ्यायचा कि नाही हे बाळासाहेबांनी एका पत्रकाराला विचारून ठरवलं होतं…