पाच लाखांची नोकरी सोडून डॉ.अभिजित रस्त्यावरच्या भीक मागणाऱ्यांना उद्योजक बनवतायेत
सकाळी घरातून बाहेर पडल्यावर सिग्नल थांबलो एखादा भिकारी दिसला कि, सकाळ सकाळ चांगलं काम म्हणून आपण पैसे देऊन निघून जातो, मंदिरात किंवा मस्जिदमध्ये गेलो कि पुण्याचं काम म्हणून पायऱ्यांवरच्या भिकाऱ्यांना पैसे देतो नाहीतर जेवण देऊन निघून जातो. त्यात काही तर भिकाऱ्यांना मदत करून त्यांच्यासोबत फोटो – व्हिडिओ काढून आपण किती समाजसेवा करतोय हे दाखवून द्यायचा प्रयत्न करतात.
पण या सगळ्या गोष्टी करताना कधी विचार करतो का कि, पैशांची किंवा खाण्या पिण्याची मदत करून आपण अप्रत्यक्षपणे त्या लोकांना तिथेच राहायला मदत करतोय. ना कि त्यांना भीक सोडून दुसरं काही करायला. हा… आता इथं आपली परिस्थिती सुद्धा आडवी येऊ शकते. पण भिडू जर आपण पैसे येऊ शकतो तर दुसरी मदत सुद्धा नक्कीच करू शकतो. कसं तर हे सिद्ध केलंय डॉ. अभिजित सोनावणे यांनी.
पुण्याचे असणारे डॉ. अभिजित सोनावणे जे अख्ख्या महाराष्ट्रात ‘डॉक्टर फॉर बेगर्स’, ‘भिकाऱ्यांना उद्योजक बनवणारे डॉक्टर’ अशा कित्येक नावांनी ओळखले जातात. आणि त्यांच्या या ओळखीमागचं कारण म्हणजे त्यांनी रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना मदत म्हणून त्यांचं रेग्युलर चेकअप, कुठला आजार असला तर फुकट उपचार आणि त्यांनतर त्यांना उद्योजक बनवलंय.
या संदर्भात बोल भिडूही बोलताना डॉ. अभिजित यांनी सांगितलं कि,
रिकामा खिसा खरं जग दाखवतो म्हणतात, असचं माझ्यासोबत घडलं. १९९९ च्या आसपासचा काळ होता, आई वडिलांनी शिकवून डॉक्टर बनवलं. पण शिक्षण झाल्यावर मी ठरवलं कि, आता दवाखाना टाकायचा पण स्वतःच्या पैशांवर, म्हणून डोअर टू डोअर मेडिकल सर्व्हिस द्यायला सुरुवात केली. पण लोक त्याबदल्यात ५ रुपये जी माझी फी असायची जी द्यायला सुद्धा तयार होत नव्हती. कसं बस करून दिवसाला ३० -४० रुपयेच जमा व्हायचे. पण काही तर मला भोंदू डॉक्टर म्हणून हाकलून लावायचे.
कशी कधी अशी परिस्थती होती कि, खायला सुद्धा खिशात पैसे नसायचे. असचं एक दिवस उपाशी पोटी मंदिरात गेलो. एक भिकारी जोडपं बसलेलं. ज्यांना माझी अवस्था कळली, त्यांनी मलाच खाऊ पिऊ घातलं आणि थोडे पैसे सुद्धा दिले. आणि एकदाच नाही तर कित्येक वेळा त्यांनी मला मदत केली.
त्यानंतर मी दोन तीन हॉस्पिटल्समध्ये नोकरी केली. एका इंटरनॅशनल संस्थेसोबत काम सुद्धा केलं, जिथं मी महाराष्ट्र हेड होतो आणि माझा ५ लाखांच्या आसपास होता. तेव्हा कधी मी सुद्धा भिकारी दिसले कि, पैशांची किंवा खाण्यापिण्याची मदत करायचो. फार तर फार कोणी आजरी दिसलं कि उपचार करायचो. पण कुठेतरी वाटायचं कि एवढी मदत करणं खरचं पुरेसा आहे का? कि त्या गरिबांना मुख्य प्रवाहात आणून एक सामान्य माणसाचं जीवन देणं आणि आत्मनिर्भर बनवणं?’ आणि अश्यातच डॉक्टरांना त्या भिकारी जोडप्याची सुद्धा आठवण व्हायची.
शेवटी डॉ. अभिजित यांनी ठरवलं कि, त्या भिकारी जोडप्याच्या मदतीची परतफेड म्हणून का होईना, आपण या लोकांसाठी काहीतरी करायचं. त्यांनतर त्यांनी भिकाऱ्यांना पैसे देण्याऐवजी त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं म्हणून प्रयत्न करायला सुरवात केली.
अभिजित आपल्या गाडीवर आपलं डॉक्टरकीचं सगळं सामान घेऊन जायचे. मंदिर, मस्जिद, रेल्वे स्टेशन जिथे कुठे भिकारी दिसतील तिथे जाऊन बसायचे, त्याच्याशी बोलायचे, जेवण करायचे. एकदंरीत एक आपुलकीच नातं त्यांनी तयार केलं. त्यांनतर जे शारीरिक दृष्ट्या चांगले आहेत त्यांना समजवून त्यांना नोकरी करण्यासाठी स्वतःचा व्यवसाय टाकण्यासाठी तयार केलं, मग कोणाला शिलाईचं काम, छोटी टपरी, चाटचं दुकान, भाजीपाला, हार-फुलांचं दुकान किंवा बूट पॉलिशचं सामान असे छोटे- मोठे व्यवसाय टाकायला मदत केली.
या दरम्यान जे भिकारी आजारी असायचे, त्यांचा उपचार करायचे, गोळ्या औषध जे काही लागेल ते पुरवायचे, एवढंच नाही तर कधी कुठल्या ऑपरेशनची गरज वाटली तर ऑपरेशनचा सुद्धा खर्च उचलायचे. त्यांनतर ती लोक चांगली झाली कि, त्यांना भीक मागायची नाही असं सांगून त्यांनासुद्धा व्यवसाय सुरु करायला मदत करायचे.
जवळपास तीन वर्ष आपली नोकरी सांभाळून ते हे काम करत होते, पण नंतर भिजीत यांनी आपल्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून ‘डॉक्टर फॉर बेगर्स’ नावाची संस्था सुद्धा सुरु केली आणि आपला पूर्ण वेळ या निराधार लोकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी द्यायला लागले.
आपल्या याच कामातून त्यांनी आज जवळपास १०७ भीक मागून खाणाऱ्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय, एवढं नाहीतर तर ५० पेक्षा जास्त मुलांना आणि ३०० च्या वर लोकांना डोक्यावर छत मिळवून दिलंय. त्यांनी उपचार केलेल्या लोकांचा आकडा तर त्यांना स्वतःला सुद्धा माहित नाहीये. २०१५ पासून आजही डॉ. अभिजित हे काम करतायेत, त्यांच्यासोबत आज त्यांची बायको आणि बाकी लोक सुद्धा जोडले गेलेत.
डॉ. अभिजित आपल्या सांस्थेमार्फत अनेक उपक्रम सुद्धा राबवतायेत. ज्यात ‘भीक नको बाई शिक या त्यांच्या उपक्रमातून त्यांनी जवळपास ६० पेक्षा जास्त मुलांना भीक मागण्याऐवजी त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचललाय. तसेच ‘भीक नको चल योगा शिक’ या उपक्रमातून भिजीत यांच्या पत्नी डॉ. मनीषा या महिलांना योगा शिकवतात. ‘खराटा पलटण’ या उपक्रमातून या गरजूना स्वच्छतेसाठी प्रोत्साहित करून त्याबदल्यात त्यांना मोबदला देतात.
हे ही वाच भिडू :
- गुन्हा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या पोरांना कोर्टाने वृद्धाश्रमात सेवा करायला सांगितलंय
- पुण्याच्या विकासात शीख समाजाचं मोठ्ठ योगदान आहे
- केइएम हॉस्पिटल मोठं करणाऱ्या डॉ. बानुबाई कोयाजींना पुणेकर कधीच विसरू शकणार नाहीत…