लेक वाचविण्यासाठी घरदार पणाला लाऊन धडपडणाऱ्या अवलिया माणसाची गोष्ट…!!!

 

२०१२ साली ज्यावेळी या माणसाने ‘मुलगी वाचवा जनांदोलन’ सुरु करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी तर सोडाच पण स्वतःच्या बायकोने देखील या माणसाला वेड्यात काढलं होतं. बायकोनं प्रश्न विचारला होता की, “..हे असंच काहीतरी करायचं असेल, तर मी घर कसं चालवू..?” या माणसाच्या निर्णयाच्या समर्थनात फक्त त्याचे वडील आले होते, ज्यांनी आपल्या आयुष्यात गरिबीची  झळ सोसली होती. त्यामुळे आपला मुलगा किती नेकीचं काम करतोय याची जाणीव असल्याने ते आपल्या मुलाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिले होते. आवश्यकता भासल्यास कुटुंब चालवण्यासाठी परत एकदा हमाली करण्याची तयारी देखील त्यांनी दाखवली होती. ही गोष्ट आहे, पुण्यातील हडपसर परिसरातील डॉ. गणेश राख आणि त्यांच्या स्त्री-भृण हत्येविरोधातील ‘मुलगी वाचवा अभियाना’ची…!!!

डॉ. गणेश राख यांचं हडपसर परिसरात ‘मेडीकेअर’ नावाचं हॉस्पिटल आहे. २००७ पासून ते हे हॉस्पिटल चालवतात. २००७ ते २०११ या सालापर्यंत सर्व काही व्यवस्थित चाललं होतं, पण २०११ सालचा जनगणना अहवाल आला आणि त्यातील दर १००० मुलांच्या मागे घटत जाणाऱ्या मुलींच्या जन्मदराच्या आकड्याने डॉ. राख यांचं संवेदनशील मन हेलावलं. मुलींचा घटता जन्मदर थांबवण्यासाठी आणि स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, असं त्यांना प्रकर्षाने वाटू लागलं. त्यातूनच त्यांनी एक निर्णय घेतला. निर्णय असा होता की, यापुढे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ज्या कुण्या मुलीचा जन्म होईल, त्या मुलीच्या पालकांकडून ते डिलिव्हरीचा  आणि वैद्यकीय उपचारांचा खर्च घेणार नाहीत. हे उपचार पूर्णपणे मोफत असतील. आपला निर्णय ज्यावेळी त्यांनी सहकारी डॉक्टरांना आणि कुटुंबियांना बोलून दाखवला त्यावेळी प्रथम तर सगळ्यांनीच याला विरोध केला. पण त्यांचे वडील त्यांच्या निर्णयाच्या समर्थनात उतरले.

स्वतःच्या जबाबदारीवर घेतलेल्या या निर्णयाचा फटका सहकारी डॉक्टरांना बसणार नाही याची काळजी घेण्यासाठी त्यांना पूर्वीप्रमाणेच त्यांचा पगार दिला जाईल, याची शास्वती डॉ. राख यांनी दिली आणि त्यातूनच जानेवारी २०१२ साली ‘मुलगी वाचवा जनांदोलन’ सुरु झालं. या आंदोलनातर्गत डॉ. राख यांनी आत्तापर्यंत जवळपास ११५० मुलींच्या जन्माचं स्वागत केलंय. त्यासाठी जन्मलेल्या मुलीच्या कुटुंबियांकडून एक रुपया देखील फीस आकारलेली नाही. २०१२ साली सुरु आपल्या छोट्याशा हॉस्पिटलमध्ये डॉ. राख यांनी सुरु केलेलं हे आंदोलन आज देशविदेशात पोहचलंय. देशविदेशातील ५० हजारांपेक्षा अधिक डॉक्टर या आंदोलनात डॉ. राख यांच्याशी जोडले गेले असून ते देखील आपल्या हॉस्पीटलमध्ये झालेल्या मुलींच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी एकतर गर्भवती मातेच्या कुटुंबियांना मोफत वैद्यकीय सेवा देत आहेत, किंवा फीसमध्ये मोठ्या प्रमाणात सवलत तरी देत आहेत.

“स्त्री-भृण हत्येचा प्रश्न भारतात खूप गंभीर रूप धारण करतोय. यावर्षीच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार जवळपास ६.५ कोटी मुलींची गर्भातच हत्या केली गेलीये. हे फार गंभीर आहे. जगाच्या पाठीवर इतर कुठल्याही देशात या अशा घटना घडत नाहीत. या घटना थांबवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पातळीवर कृतीशील पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत, तरच या घटना थांबवल्या जाऊ शकतील. फक्त घोषण देऊन गोष्टी बदलणार नाहीत. आपण सगळ्यांनीच त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत” अशी प्रतिक्रिया डॉ. गणेश राख यांनी ‘बोल भिडू’शी बोलताना दिली.”

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वंजारवाडी इथे जन्मलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी लढून डॉक्टरकीचं शिक्षण घेतलेल्या डॉ. राख यांना खरं तर पहेलवान व्हायचं होतं. पण त्यांच्या आईने असं काही करण्यापासून त्यांना थांबवलं. त्यासाठी त्यांच्या आईने कारण असं दिलं की, “तूला जर पहेलवान व्हायचं असेल तर घरातील सगळ्यांच्याच वाट्याचं अन्न तूच खाऊन घेशील, इतरांनी काय खायचं..?” स्वतः लोकांची धुणी-भांडी करून आणि धान्यबाजारात हमालीचं काम करणाऱ्या नवऱ्याच्या तुटपुंज्या कमाईवर ३ मुलांसह ५ जणांचं कुटुंब चालवणाऱ्या मातेचा हा निर्णय खरं तर व्यावहारिकदृष्ट्या योग्यच होता. डॉ. राख यांनीही मातेचं म्हणणं ऐकलं आणि कठोर मेहनत घेत त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर हडपसर परिसरात ५० खाटांचं हॉस्पिटल सुरु केलं आणि आपल्या वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. खरं तर या परिसरात २०० खाटांचं सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचं त्यांचं स्वप्न होतं, पण सध्या मोठ्या आर्थिक पाठींब्याशिवाय त्यांनी जो ‘मुलगी वाचवा’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे ५० खाटांचं रुगणालय चालवतानाच त्यांना तारेवरची कसरत करावी लागतेय.

डॉ. गणेश राख यांच्या या प्रयत्नाचं देशभरात मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलाय. अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांच्या कामाची दखल घेतलीये.आपल्या अनेक कार्यक्रमांमध्ये अमिताभ  बच्चन डॉ. राख यांनी स्त्री जन्म साजरा करण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नाचा उल्लेख करत असतात. आता जगभरातून त्यांच्या कामाची दखल घ्यायला सुरुवात झालीये. त्यांनी चालवलेला हा उपक्रम निश्चितच स्त्युत्य आहे. मुलींच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी ते ज्या पद्धतीने काम करताहेत ते प्रेरणादायी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.