आंबेडकरी साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्याच कार्य गंगाधर पानतावणे यांनी केलं

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या अनेक लोकांनी पुढे आंबेडकरी चळवळी नेटाने पुढे चालवल्या. त्यातून दलित साहित्य प्रचंड वेगाने लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले.

कर्तृत्वाने मोठे पण स्वतःला साधे चळवळीतले कार्यकर्ते समजणारे डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे.

मराठी भाषेतील लेखक, संशोधक, समीक्षक, आंबेडकरी विचारवंत म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्याविषयी आज जाणून घेऊया.

नागपूरमधल्या पाचपावली या वस्तीत २८ जून १९३७ रोजी जन्म झाला. त्यांचे वडील जास्त शिकलेले नव्हते पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता, आंबेडकरांच्या समतावादी चळवळीशी ते निगडित होते. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने गंगाधर पानतावणे यांचं लहानपण गरिबीत गेलं. त्यांच्या आडनावाचा म्हणजे पानतावणे नावाचा अर्थ होतो पाणी गरम करणारे किंवा पाणी तापवणारे. 

डी.सी. मिशन स्कुलमधून त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. नागपुरातल्या नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कुलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. ज्यावेळी गंगाधर पानतावणे ९ वर्षाचे होते तेव्हा म्हणजे १९४६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपुरात आले होते. बाबासाहेबाना बघून ते अतिशय प्रभावित झाले. दुसऱ्यांदा जेव्हा बाबासाहेब नागपुरात आले तर त्यांना पानतावणे यांना भेटण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा योग आला.

१९५६ मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली आणि पुढे नागपूर महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. आणि एम.ए ची पदवी मिळवली. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.

१९८७ मध्ये त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली आणि  पी.एच.डी.साठी त्यांनी बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर ‘पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा शोधप्रबंध लिहिला.

औरंगाबादमधल्या मिलिंद महाविद्यालयात त्यांनी मराठी विभागात शिक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरवात केली. तिथेच त्यांनी आंबेडकरी चळवळीची सुरवात केली. त्यांनी सुरु केलेल्या चळवळीला तरुण वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात दलित साहित्यिकांची एक नवीन फळी उभी राहिली.

दलित साहित्याने अंधार नाकारला आहे, कलंकित भूतकाळ नाकारला आहे. मानसिक गुलामगिरीतून दलित मुक्त होऊ पाहत आहेत आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानातून ते तेजस्वी होत आहेत

म्हणत त्यांनी एकप्रकारे रणशिंग फुंकले होते.

अस्मितादर्श या नियतकालिकाचे ते जवळपास ५० वर्ष संपादक होते. दलित वाचक लेखक मेळावाही त्यांनी भरवला होता. सॅनहोजे (अमेरिका) येथे पार पडलेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. यासोबतच विदर्भ साहित्य संमेलन (आनंदवन वरोरा), मराठवाडा साहित्य संमेलन (परभणी), या व इतर अनेक साहित्य संमेलनांचे ते अध्यक्ष होते.

डॉ. गंगाधर पानतावणे यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अगदी खेडोपाड्यात पोहचवले. साहित्य, संस्कृती आणि समाज या विषयावर त्यांनी २० पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचाराचा प्रभाव त्यांच्या लेखणीमध्ये दिसून येतो.

मराठी भाषेतील व साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे तसेच महाराष्ट्रातील अनेक साहित्यसंस्थांचे ग्रंथपुरस्कार त्यांच्या ग्रंथांना प्राप्त झाले. महाराष्ट्रभर ते एक उत्तम व्याख्याते म्हणून प्रसिद्ध होते आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच महत्वाच्या ठिकाणी त्यांनी व्याख्यानं दिली होती.

डॉ. गंगाधर पानतावणे यांनी मराठी साहित्याला दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने त्यांना गौरववृत्तीने सन्मानित केले. साहित्य अकादमीकडून भारतीय लेखक म्हणून त्यांचा सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना २०१८ सालच्या पदमश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

आंबेडकरी चळवळ आणि विचार अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं यशस्वी कार्य डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केलं. २७ मार्च २०१८ रोजी दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. पण आजही आंबेडकरी चळवळीतले खंदे शिलेदार म्हणून त्यांची ओळख होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.