मागच्या काही काळात मोदी सरकार बद्दल नाराजी व्यक्त करून आपल्या पदाचा राजीनामा दिलेल्यांची यादी काढली तरी बरीच नाव सापडतील, यात मग अगदी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचं देखील नाव घ्यावं लागेल. याच यादीत आता आणखी एका नावाची भर पडताना दिसतं आहे.
ज्येष्ठ विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी जीनोम सर्विलान्स प्रोजेक्ट (SARS-CoV-2) ग्रुपच्या आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यानंतर केंद्र सरकारने डिसेंबर २०२० मध्ये या सल्लागार गटाची स्थापना केली होती.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार,
कोरोनाविरोधातील केंद्र सरकारच्या धोरण आणि तयारीवर शाहिद जमील समाधानी नव्हते. म्हणूनच सरकारवरच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांनी राजीनामा दिला आहे. मागच्याच आठवड्यात त्यांनी अमेरिकेतील सुप्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्समध्ये भारतातील कोरोना स्थितीवर एक लेख लिहिला होता.
या लेखात जमील यांनी भारत या संकटातून कसा बाहेर पडू शकतो या बद्दल डिटेलमध्ये समजावून सांगितलं होतं. सोबतच सरकारला शास्त्रज्ञाचा सल्ला ऐकण्याबद्दल विनंती केली होती, आणि धोरण बनवण्यासाठीची पारंपरिक पद्धत सोडण्याबद्दल देखील सल्ला दिला होता. त्यांच्या आजच्या राजीनाम्यानंतर सध्या सगळीकडे याच लेखाची चर्चा होत आहे.
पण असं नेमकं काय सांगितलं होतं या लेखामध्ये?
भारतात अनेक पद्धतीचे कोरोना व्हेरिअंट.
लेखाच्या सुरुवातीला शाहिद जमील यांनी कोरोना संक्रमणच्या व्हेरिअंटकडे सरकारचं लक्ष वेधलं होतं. ते म्हणाले होते, एक विषाणूशास्त्रज्ञ म्हणून मी मागच्या वर्षभरापासून संक्रमण आणि लसीकरणावर लक्ष ठेऊन आहे. यात माझं निरीक्षण आहे कि भारतात अनेक पद्धतीचे व्हेरिअंट पसरत आहेत. हेच व्हेरिअंट कोरोनाच्या पुढच्या लाटेसाठी जबाबदार असतील.
ते म्हणाले होते,
भारतात व्हायरस नवीन वर्षाच्या आसपास म्युटेंट झाला, आणि वेगाने पसरला. या व्हायरसने आधी तयार केलेल्या प्रतिकारशक्तीला देखील दाद दिली नाही. सिक्वेंसिंगचा डाटा सांगतो कि, ज्या व्हेरिअंटने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ताकद दिली तो B.1.617 असा आहे. हा भारतात पहिल्यांदा डिसेंबर २०२० मध्ये सापडला होता. हा वेगाने पसरण्याचं कारण म्हणजे गर्दीचे झालेले कार्यक्रम आणि सभा. भारतात सध्या सगळ्यात जास्त संक्रमण याच व्हेरिअंटचं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने देखील या व्हेरिअंट बद्दल चिंता व्यक्त केली होती. जेव्हा या व्हेरिअंटला आजाराचा अभ्यास करणारे सर्वात विश्वासार्ह मॉडेल हॅमस्टर मॉडेलवर टेस्ट केलं तेव्हा आढळलं कि, हा व्हेरिएंट मूळ व्हायरस B.1 व्हेरिअंटच्या तुलनेत मोठया प्रमाणावर व्हायरस उत्पन्न करतो, आणि फुफुसांना जास्त नुकसानकारक ठरतो.
जगभरातील डाटा सांगत आहे कि, B.1.617 हा व्हेरिअंट तीन वेगवेगळ्या व्हायरसमध्ये विभागला गेला आहे.
९ मे रोजी ब्रिटन आणि भारतातील वैज्ञानिकांच्या प्राथमिक रिपोर्टनुसार, दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये लसीकरणानंतर बाधित झालेल्या रुग्णांमध्ये B.1.617.2 नावाचा देखील व्हेरिअंट आढळला होता, १० मे रोजी अमेरिकेच्या शास्त्रज्ञाच्या दाव्यानुसार B.1.617.1 नावाच्या व्हेरिअंटशी लढण्यासाठी आणि वाचण्यासाठी सिरम, फायजर आणि मॉडर्ना या लसी प्रभावी ठरू शकतात.
या ठिकाणी त्यांनी एक प्रकारे सरकारला परदेशी लसींना तात्काळ मान्यता देण्याबाबत सुचवलं होतं.
हा व्हेरिअंट भारतामध्ये अशा लोकसंख्येमध्ये जास्त पसरत आहे, ज्यांना अद्याप लस मिळालेली नाही. अशातच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित तज्ञ दुसऱ्या लाटेचा पीक पिरेड कधी येईल आणि कधी कमी येईल या संबंधीचा अभ्यास करत आहेत.
दुसऱ्या लाटेचा पीक पिरेड कधी येईल आणि कधी संपेल?
डॉ. शाहिद जमील यांनी सांगितलं कि, भारत सरकारचं मॉडेल आणि जगभरातील दुसरे मॉडेल कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात वेगवेगळे दावे करत आहेत. दोघांच्या डाटामध्ये देखील बराच फरक आहे. त्यांनी लिहिलं आहे कि,
दुसऱ्या लाटेच्या पीकच्या अंदाजाबाबत बराच फरक दिसत आहे. भारत सरकार ज्या सुपरमॉडेल ग्रुपला महत्व देत आहेत, त्यानुसार मे च्या पहिल्या आठवड्यात ३ लाख ८० हजार रुग्णांसोबत पीक आला आहे. तर भारताच्या वैज्ञानिकांचं दुसरं सिम्युलेशन मॉडेल सांगत आहे कि, पीक मे च्या मध्यापर्यंत येईल. त्यांची भाविष्यवाणी आहे की, पीक वर पोहचल्यानंतर रोज ५ ते ६ लाख रुग्ण रोज सापडतील.
तर यूनिवर्सिटी ऑफ मिशीगनच्या COV-IND-19 स्टडी ग्रुपचं आकलन आहे की, पीक मे च्या मध्यापर्यंत येईल. पण एका दिवसातील रुग्णांची संख्या ८ ते १० लाखांपर्यंत जाऊ शकते. सगळे मॉडेल सांगत आहेत कि, भारतात कोरोनाची दुसरी लाट जुलै ते ऑगस्ट पर्यंत ओसरेल. पण तोपर्यंत ५० कोटी लोक बाधित झालेले असतील.
तिसऱ्या लाटेची भयावहता अनेक गोष्टींवर अवलंबून असेल…
भारतात तिसऱ्या लाटेची भयावहता अनेक गोष्टींवर अवलंबून असणार आहे, यात काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर किती लोकांच लसीकरण पूर्ण होईल, व्हायरसचे किती नवे व्हेरिअंट्स मिळतील, भारतात लग्न आणि इतर सणांसारखे किती सुपर स्प्रेडर कार्यक्रम होतील अशा अनेक गोष्टी.
पण माझी चिंता आहे कि, आपण या गोष्टीचा व्यवस्थित अंदाज लावू शकत नाही कि प्रत्यक्षात किती केसेस येऊ शकतील. डाटा दाखवत आहे कि, ज्या वेगाने केसेस वाढत आहेत, त्या वेगानं आपलं टेस्टिंग होत नाही. यामुळे येत्या काही दिवसात कोरोना बाधितांचा आकडा स्थिर होईल, पण याच कारण आपल्या केसेस कमी होतील असं नसून आपल्या टेस्टिंग कमी झाल्या आहेत असं असेल.
भारताचा टेस्ट पॉजिटीव्हिटी रेट म्हणजेच टेस्ट केलेल्यांमधील एकूण लोकांपैकी पॉजिटीव्ह येण्याचा दर २२ टक्क्यांच्या वर आहे. पण काही राज्यांमध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, उदाहरण द्यायचं झालं तर गोव्यामध्ये ४६.३ टक्के पॉजिटीव्ह रेट आहे, तर उत्तराखंडमध्ये जिथं कुंभमेळा झाला होता, तिथं ३६.५ टक्के पॉजिटीव्ह रेट आहे.
सरकारची फसलेली लसीकरण मोहीम
डॉ. जमील यांनी आपल्या लेखामध्ये लसीकरणाची तयारी आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी यावर देखील भाष्य केलं आहे, त्यांनी लसीकरणाच्या वेगावर देखील चिंता व्यक्त केली होती. ते म्हणतात,
लसीकरण सार्वजनिक आरोग्याचं एक महत्वाचं हत्यार म्हणून कायम ओळखलं जाईल. जलद लसीकरणामुळे कोरोनाच्या संक्रमणाला थांबता येऊ शकत. यात भारतानं आपल्या लसीकरणाची सुरुवात जानेवारीच्या मध्यावर सुरु केली.
सुरुवातील ३ कोटी आरोग्य सेवक, फ्रंटलाइन वर्कर्स, ६० वर्षावरील आणि ४५ वर्षावरील गंभीर आजारी असलेल्या लोकांचं लसीकरण करणं हे समजूतदारपणाचे होते. पूर्ण भारताला ४० टक्के लस पुरवणारी सिरम आणि भारत बायोटेक सारख्या कंपन्या पूर्णपणे सक्षम होत्या.
पण मार्चच्या मध्यापर्यंत केवळ १.५ कोटी डोसचं पुरवू शकले. यातून केवळ १ टक्का नागरिकांचं लसीकरण होऊ शकलं.
लसीकरणाची मोहीम भारतीय नेतृत्वाच्या अशा एका संदेशामुळे फसली ज्यामध्ये कोरोनावर विजय मिळवला असल्याचं सांगितलं होतं. यासोबतच युरोपच्या एस्ट्राझेनेका लसीमुळे रक्तात गुठळ्या तयार होत असल्याच्या बातमीनं देखील अडथळा आणला. कारण हीच लस भारतात कोव्हीशील्ड नावानं दिली जात आहे.
अशात दुसरी लाट आली तोपर्यंत केवळ ३.३ कोटी लोकांना लसीचा पहिला डोस मिळू शकला होता. हा आकडा एकूण लोकसंख्येच्या २.४ टक्के होता. तर केवळ ७० लाख लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस मिळू शकला होता. अशातच दुसरीकडे १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण सुरु करण्याची घोषणा केली. पण अनेक राज्यांनी लसीची कमतरता सांगून हात वर केले.
या सगळ्यामुळे लसीकरण मोहीमच थंडावली. भारतात हा पुरवठा सुरळीत व्हायला कमीत कमी जुलै पर्यंतचा कालावधी लागेल.
टेस्टिंग, ट्रेसिंग आणि लसीकरण वाढवण्याची गरज…
या सगळ्या कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी भारताला अजून युद्धपातळीवर टेस्टिंग आणि ट्रेसिंग करायला हवं, सोबतच लसीकरणाचे जास्तीचे सेंटर देखील सुरु केले पाहिजेत असं देखील ते उपाय म्हणून सुचवतात. ते म्हणतात,
अजून मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग वाढवणं गरजेचं आहे. ज्यांना इंफेक्शन झालेलं आहे त्यांना आयसोलेट केलं जावं, अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामुळे कोरोनाचा आलेख वर जाण्यापासून थांबेल, सोबतच यामुळे आरोग्य सुविधा उभी करायला वेळ मिळेल. जास्तीच्या मेडिकल साधनांनी रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी मदत मिळेल.
भारताला इथून पुढच्या काळात तात्पुरते हॉस्पिटल्स उभारून बेड वाढवण्याची गरज आहे. रिटायर्ड झालेले डॉक्टर्स आणि नर्स यांना पुन्हा मदत मागायला हवी, ऑक्सिजन आणि अनेक गरजेच्या औषधांची पुरवठा साखळी सुधारायला हवी.
भारत सध्याच्या परिस्थितीमध्ये कमी वेगानं चाललेलं लसीकरण सहन करू शकत नाही. हि वेळ मोठ्या प्रमाणावर नागरिकांचं लसीकरण करण्याची आहे. दररोज कमीत कमी ७० लाख ते १ कोटी लोकांच्या लसीकरणाचं टार्गेट ठेवायला हवं.
भारतात आता लस घेऊ शकू असे केवळ ५० हजार साईट्स आहेत. पण आपल्याला यापेक्षा कित्येक पटीनं अधिक लसींची आवश्यकता आहे. यात ही खाजगी केवळ ३ टक्के आहे, त्यांना वाढवण्याची गरज आहे.
शास्त्रज्ञ पारंपरिक पद्धत सहन करत आहेत…
डॉ. जमील यांनी भारताच्या धोरण तयार करण्याच्या पद्धतीवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचा आरोप आहे कि, वैज्ञानिकांनी डाटाचा अभ्यास करून सुचवलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जात आहे. सोबतच आणखी अचूक सल्ल्यासाठी आकडेवारी देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी आतापर्यंतच्या सगळ्या उपायांवर आपल्या वैज्ञानिकांनी बरचं सहकार्य केलं आहे, पण त्यांना साक्ष आधारित धोरण तयार करण्यासाठी खूपच पारंपरिक पद्धत सहन करावी लागत आहे. त्यामुळेच ३० एप्रिल रोजी भारताच्या वैज्ञानिकांनी पंतप्रधानांना अपील केलं होतं कि, त्यांना डाटा उपलब्ध करून द्यावा, त्यामुळे ते पुढचा अभ्यास, अंदाज आणि या व्हायरसशी लढण्यासाठी उपाय सुचवू शकतील.
भारतात जेव्हा हि महामारी हाताबाहेर गेली आहे, तेव्हापासून डाटावर आधारित निर्णय घेणं पण दुरापास्त झालं आहे, त्यासाठी आपण जी मानवी जीवांची किंमत देत आहोत ते कायम स्वरूपातील निशाण आहे….