कोरोनाच्या भितीत या चार डॉक्टरांनी सोशल मिडीयावरून खूप आधार दिला…

सध्या संपूर्ण जगभरातच कोरोना महामारी सर्वाधिक  चर्चेचा विषय ठरलाय. टीव्ही, मोबाईल, सोशल मिडिया, वृत्तपत्र सगळीकडेचं कोरोनाच्याचं बातम्या झळकताना दिसतायेत. संक्रमणाबरोबरच मृतांच्या संख्येचा वाढता आकडा पाहताना  काळजात धडकी भरल्यागत होतय.कोरोना बद्दलचे समज गैरसमज त्या बद्दलच्या अफवा यांचे तर प्रचंड पेव फुटलंय.

कोरोनाच्या सुरवातीच्या काळात तर काय काळजी घ्यावी काय घेऊ नये याचा काहीच अंदाज लागत नव्हता. अशावेळी सर्व अफवाना मोडीत काढण्यासाठी कोरोनाचे खरे चित्र समोर आणून त्याबद्दल लोकांच्यात जनजागृती करण्यासाठी काही डॉक्टर समोर आले.

इंटरनेट, सोशल मीडिया पासून ते विविध चॅनेल पर्यंत पोहचून कोरोना संबधित परिस्थिती असो किंवा अपडेट्स असो हे डॉक्टर्स आज घराघरांत पोहोचले आहेत.

१) डॉ. रवी गोडसे : 

कोरोनाचा या गंभीर परिस्थितीत दररोज येणाऱ्या नकारात्मक बातम्यांत डॉ. गोडसे मात्र  आपल्या सकारात्मक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. माध्यमां बरोबरच सोशल मिडीयावर देखील त्यांच्या या सकारात्मक विचारांचे व्हिडिओ मोठ्या प्रमणात व्हायरल होत असतात.

ते सध्या अमेरिकेच्या पेन्सिलविनीया येथे कोरोना रूग्णांवर  उपचार करतायेत, मात्र तरीही भारतातील कोरोनाच्या  प्रत्येक घडामोडीवर आपले मार्गदर्शन देतात. त्यांच्या या सकारात्मक बोलण्याने अनेकांना दिलासा मिळतो. ते फक्त डॉक्टर नाहीत तर ते एक फिल्म मेकर देखील आहेत. सुपरस्टार माधुरी दीक्षित यांचे मावसभाऊ लागणाऱ्या डॉ.रवी गोडसे यांना अभिनयाची देखील आवड असल्यामुळे ते कोव्हीडची माहिती आपल्या खास स्टाईलमध्ये रंगवून सांगताना दिसतात.

नुकताच लोकमत या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून  त्यांचा कोव्हॅक्सिन लसी संदर्भात एक व्हिडिओ  समोर आला आहेत. ज्यात लस घेण्याबाबत लोकांच्या मनात असलेली भीती दूर करण्याचे काम त्यांनी केलय.

२) डॉ. नानासाहेब थोरात 

इंग्लंडमधील ऑक्‍सफर्ड विद्यापीठात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. नानासाहेब थोरात हे काही वैद्यकीय डॉक्टर नाहीत, मात्र ते संशोधन क्षेत्रातील असल्यामुळे त्यांची माहिती विश्वासार्ह आणि अभ्यासपूर्ण असते.

नानासाहेब थोरात मूळचे सातारा जिल्ह्यातील मायणीतले. त्यांना काही दिवसांपूर्वीच युरोपियन युनियन कमिशनने “ब्राईट साईड ऑफ २०२० ‘ या सर्वोत्कृष्ट पुरस्कराने सन्मानित केले.

कोरोनाच्या या महामारीत डॉ.  थोरात यांनी लसीकरण, कोरोनाचा वाढता संसर्ग  यांसारख्या अनेक विषयांवर माध्यमांद्वारे  मार्गदर्शन केले.  काही दिवसांपूर्वी त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत  ऑक्‍सफर्ड विद्यापीठ आणि सीरम संस्थ्येनं बनवलेल्या कोविशिल्ड या कोरोना लसी संदर्भात मार्गदर्शन केले.

https://www.facebook.com/abpmajha/videos/362414988505647

३) डॉ. संग्राम पाटील 

कोरोन महामारीत प्रसिद्ध डॉक्टरांच्या चेहऱ्यांपैकी एक असलेले  डॉ. संग्राम पाटील बऱ्याचदा माध्यमातून  किंवा त्यांच्या स्वतःच्या ‘Dr Sangram G Patil’ या युट्युब चॅनलवरून कोरोना विषयी मार्गदर्शन करताना पहायला मिळाले.

मूळ जळगावचे असलेल्या या खान्देश सुपुत्राचे शिक्षण पुण्यात झाले. लग्नानन्तर ते व त्यांच्या पत्नी नुपूर पाटील हे युके मध्ये स्थायिक झाले. कोरोना परिस्थितीवर  बऱ्यापैकी नियंत्रण मिळविणाऱ्या ब्रिटेन मध्ये ते सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत.

जगभरात विकसित होणाऱ्या  लसीबाबत संपूर्ण माहिती ते लोकांपर्यंत पोहोचवितात.  नुकताच त्यांनी आपल्या युट्युब चॅनलवर अमेरिकेतील एका सुपर व्हॅक्सीन बाबत लोकांना माहिती दिली आहे.

डॉ. अविनाश भोंडवे :

इंडियन मेडिकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष असलेले डॉ. अविनाश भोंडवे हे फॅमिली फिजीशियन आहेत. ज्यांचे पुण्यातील शिवाजीनगर भागात डॉ. भोंडवे क्लिनिक म्हणून रुग्णालय आहे.  पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी आपली डॉक्टरकी पूर्ण केली.

कोरोनाच्या या महामारीत भोंडवे माध्यमाच्या महत्वपूर्ण चेहऱ्यांपैकी एक आहेत.  कोरोनाची वाढती संख्या, सद्यस्थिती, लस किंवा त्यावरील त्यांच्यामते असलेले  उपाय ते सतत मांडत असतात.

नुकताच त्यांनी महाराष्ट्रातील ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत एक माहितीपर व्हिडिओ आपल्या युट्युब चॅनलवर अपलोड केला आहे.

हीच डॉक्टर मंडळी आपल्या आपल्या वैद्यकीय सेवेच्या अत्यंत बिझी शेड्युल मधून वेळात वेळ काढून लोकांना सतर्क करण्याचे महत्वाचे कार्य करत आहेत म्हणून सर्वसामान्याना कोरोना विरुद्धच्या या लढ्याला सामोरे जाण्याचे बळ मिळत आहे हे नक्की.

हे ही वाचा भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.