लोकांना जागतिक प्रश्न पडतात, पण मला प्रश्न पडलाय बुगीमॅन खरंच अळ्या खायचा का?

आपलं बालपण म्हणजे एक लय भारी गोष्ट होती. आत्ताची पोरं पबजी, फ्री फायर असल्या गेमनी खुश होतात. BTS म्हणजे त्यांचं सर्वस्व असतंय, पण आपल्या बालपणाचा नाद नव्हता. म्हणजे आपल्याला दुनिया कळली ती ‘आशिक बनाया आपने’ गाण्यामुळं, एमटीव्ही हेच आपलं युट्युब होतं आणि पोकेमॉन हे जगातलं सगळ्यात बाप कार्टून.

पोरांची किरकोळ मारामारी झाली, तरी घरापर्यंत जायची नाय. या मारामारीत एक मात्र असायचं, समोरचं गाभडं आपल्यासोबत मोडलं तरी चालेल, त्याला RKO द्यावा, नायतर स्टोन कोल्ड स्टनर ही आपली लय मनोमन इच्छा असायची.

हे येड आपल्याला लावलेलं WWE नं. आता कुणी WWE म्हणायचं तर कुणी WWF, पण हा विषय भारी होता, यात कुणाचंच दुमत नसणार.

यात होणारी कार्यकर्त्यांची मारामारी खरी की खोटी, हा न संपणारा वाद आहे. कारण ज्या गोष्टीनं आपल्याला अमर्याद आनंद दिला, त्याला खोटं तरी कसं म्हणायचं..?

तर आपण मुद्द्याच्या रिंगणात येऊ, अंडरटेकर आणि जॉन सिनाची एंट्री, मार्क हेन्रीची तब्येत, रे मिस्ट्रीओचं मास्क, केनचे डोळे… या गोष्टी शंभर टक्के भारी होत्या.

पण १०१ टक्के खुंखार असणारा एक माणूस होता तो म्हणजे बुगीमॅन.

WhatsApp Image 2022 04 29 at 6.15.52 PM

जगात एखाद्याचा किती घाण मेकअप करता येऊ शकतो, हे बुगीमॅनकडं बघून समजतं. एखाद्या चित्रकलेत नापास होणाऱ्या पोरानं रंगवलेला चेहरा, हातात कायम विचित्र दागिने, जनावराच्या शेपट्या एकत्र करून बांधल्यासारखे केस, दिवसातनं पाच टाईम मिश्री लावत असल्यासारखे दात इतकं भयानक रुप बुगीमॅनचं होतं.

पण इथंच विषय संपायचा नाही, बुगीमॅनची खरी ओळख होती अळ्या. जिवंत अळ्या, आपण ज्या निवांतपणानं मॅगी खातो, तेवढ्याच किरकोळीत पण दुप्पट आनंदानं बुगीमॅन अळ्या खायचा.

बुगीमॅन त्या बॉक्सिंग रिंगमध्ये यायचा आणि बकासुराला लाजवेल अशा उत्साहानं अळ्या खायचा. वर आपल्या डोक्यात घड्याळं फोडून घ्यायचा. त्याची ज्याच्याशी फाईट असायची, त्याला हाण हाण हाणायचा आणि वर त्याच्याही तोंडात अळ्या कोंबायचा.

पण हा बुगीमॅन होता कोण? त्याचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ काय आहे? आणि तो खरंच अळ्या खायचा का? 

हे तीन प्रश्न एखाद्याला रात्री विचारले तर त्याची फिक्स झोप उडेल. आमची पण उडाली होती, म्हणून मग म्हणलं भिडू लोकांनाही सांगून टाकावं.

बुगीमॅनचं खरं नाव, मार्टी राईट. जेव्हा आपण त्याला रिंगमध्ये फॉर्मला असताना बघत होतो, तेव्हा त्याचं वय चाळीशीच्या पलीकडं होतं, कारण गड्यानं WWE च्या रिंगमध्ये पदार्पण केलं होतं तेच वयाच्या ४१ व्या वर्षी.

बुगीमॅन हा पक्का एंटरटेनर होता. कारण सांगतो, जॉन सीना, अंडरटेकर, आपला खली यांच्या भारी मॅचेस आठवा म्हणलं, तर तुम्ही किरकोळीत आठवाल, पण बुगीमॅनच्या मॅचेस त्याच्या फायटिंगमुळं आठवत नाहीत. आठवतात ते त्याचे येडेचाळेच.

या गोष्टीमुळंच WWE वाल्यांनी त्याला परफेक्ट वापरलं. म्हणजे हा गडी रिंगमध्ये नाय दिसला, तरी बाकीचे उद्योग करताना फिक्स दिसायचा. म्हणजे कुठं एखाद्या प्लेअरच्या बेडरुममध्येच घूस, कुठं खायच्या डिशमध्येच मुंडकं घाल, तोंडात अळ्या घेऊन कुणाला किसच कर (हे पण स्क्रिप्टेड असायचं लोड नका घेऊ) असले सगळे उद्योग बुगीमॅनच्या नावावर जमा असायचे.

पण बुगीमॅन रिंगमधून फार लवकर गायब झाला.

त्याचं कारण होतं, की WWE नंच त्याला काढून टाकलेलं. कारण भावाचं वय झालेलं, तो मार खायचा लई पण मारायचा लई कमी. त्यामुळं त्याच्या फाईट कोण बघेना. त्यापेक्षा त्याचे येडेचाळेच बघितले जायचे. WWE वाल्यांनी आधी त्याला सुट्टी दिली, मग २०१५ मध्ये काही काळ तो रिंगमध्ये दिसला. मग पुन्हा एकदा त्याला रिंगबाहेरच्या कार्यक्रमांसाठी बोलावलं जाऊ लागलं.

आता मुख्य प्रश्न म्हणजे बुगीमॅन जिवंत अळ्या खायचा का?

आम्हाला एक कार्यकर्ता म्हणलेला त्यांच्याकडची मॅगी असेल. पण नाय, हा गडी खरंच जिवंत अळ्या खायचा. तेही चाऊन आणि वर गिळायचा पण. खरंतर त्याची इच्छा होती, की पतंग किडे, झुरळं असलं कायतर खावं. पण “WWE वाले म्हणले झुरळ आणि किडे इकडं तिकडं उडाली तर बाजार उठवतील. त्यापेक्षा तू आपलं अळ्याच खा.”

म्हणून बुगीमॅन अळ्या खायचा, लोकांना खायला घालायचा आणि याच एन्टरटेनमेन्टच्या जोरावर भाऊ फेमस झाला. मार्टी राईट नाव ऐकल्यावर आपल्याला पटकन आठवायचं नाही, पण बुगीमॅन म्हणलं की त्याच विचित्र दिसणं आणि अळ्या खाणं हे फिक्स आठवतं.

एवढ्या अळ्या पचवून बुगीमॅन अजून जिवंत आहे, WWE मध्ये दिसत नसला तरी इन्स्टाग्रामवर फिक्स दिसतोय… बघून घ्या.
https://www.instagram.com/realboogeycomin2getcha/?hl=en

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.