पीएफआयच्या आंदोलनावेळी पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिल्याचा आरोप होतोय, काय होऊ शकते शिक्षा
दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएच्या वतीने महाराष्ट्रासह, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आदी ११ राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय)कार्यालयावर छापे टाकले. याच्या विरोधात शुक्रवारी सायंकाळी काही जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएफआयच्या कारवाई विरोधात आंदोलन केले. यावेळी ६० ते ७० जण उपस्थित होते.
यातील काही आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी केल्याचा आरोप काही जणांकडून करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी बेकादेशीरपणे आंदोलन केल्या प्रकरणी आयोजकावर गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अशा प्रकारच्या घोषणा दिल्या नसल्याचे सांगितले आहे.
यानंतर आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे की, पाकिस्तान जिंदाबाद म्हणणे देशद्रोह ठरतो का, त्यांच्यावर कुठला कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात येतो?
फेब्रुवारी २०२० मध्ये बैंगलोर येथे सीएए-एनआरसी कायद्या विरोधात एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी हे सुद्धा या रॅलीत सहभागी झाले होते. त्यांच्या भाषणानंतर अम्यूल्या नावाच्या एका मुलीने पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर बंगलोर पोलिसांनी तिच्यावर आयपीसीच्या १२४ A कलमा अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंजाब सरकाराच्या दोन कर्मचाऱ्यांरी बलवंत सिंह आणि भूपिंदर सिंह यांनी खलिस्तान जिंदाबाद आणि राज करेगा खालसा, हिंदूंना पंजाबच्या बाहेर काढण्याची वेळ आली अशा प्रकारच्या घोषणा दिल्या होत्या. या दोंघांवर सुद्धा १२४ A कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते.
१९९५ मध्ये वर सर्वोच्च न्यायालायने सांगितले होते की, अशा प्रकारे नारा देणे हे राजद्रोह ठरत नाही. जस्टीस एएस आनंद आणि जस्टीस फैजानुद्दीन यांच्या बेंच ने निकाल दिला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयाने यावेळी नमूद केले होते की, आंदोलनकर्त्यांनी दोन वेळा घोषणा दिल्या तरीही, लोक त्यामुळे प्रभावित झाले नाहीत आणि त्यांचे ते काम करत होते.
तसेच यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आंदोलनकर्त्यांनी हिंदुस्थान मुर्दाबादचे नारे सुद्धा दिले आहे. याला उत्तर देतांना न्यायालय म्हणाले की, एखाद्या दुसऱ्याने देशाविरोधात नारे दिल्याने देशाला कुठलाही धोका होत नाही. त्यामुळे याला राष्ट्रद्रोह समजला जाणार नाही.
२०१६ मध्ये काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्यावर जेएनयु मध्ये एका कार्यक्रमात पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्या प्रकरणी अटक सुद्धा करण्यात आली होती. मात्र हा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. पुढे ही केस मागे घेण्यात आले.
१२४ A कलमा खाली किती शिक्षा होते
जी व्यक्ती लिखित अथवा तोंडी शब्दांद्वारे किंवा अन्य प्रकारे सरकारविषयी चीड, अवमान किंवा असंतोष निर्माण करेल किंवा तसा प्रयत्न करेल, तर अशा व्यक्तीवर १२४ A कलमा खाली गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यानुसार संबंधित व्यक्तीला ३ वर्षे कैद आणि अथवा दंड अशी शिक्षा सुनावण्यात येऊ शकते. सुरवातीपासूनच ‘राजद्रोहाचे’ कलम विवादास्पद राहिले आहे.
याबाबत बोल भिडूशी बोलतांना कायदे तज्ञ् असीम सरोदे म्हणाले की,
सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोह कलमाखाली गुन्हे दाखल करूच नका असा म्हटले नाही. खोटे गुन्हे दाखल करू नये असं सांगितलं आहे. १२४ A कलम रद्द झाले नाही. हे कमल रद्द झाले नसल्याने गुन्हे दाखल होऊ शकतात. उठसूट कोणावरही देशद्रोहाचा गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आले आहे. कलम १२४ A चा गैरवापर होत असल्याचे न्यायालयाच्या म्हणणे आहे. अशा प्रकराची गंभीर बाब न्यायालायने नमूद केलं आहे. तसेच कायद्याचा गैरवापर होणं चुकीचं असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तान जिंदाबाद म्हटल्यावर १२४ A, १२० A ( समाजात तेढ निर्माण करणे) अशा प्रकारे कमल लागू शकतात. राष्ट्रद्रोह करणे हे खूप कृती आहे. कुठल्या तरी अशा घोषणा दिल्यावर राष्ट्रद्रोह होत नाही. राष्ट्रद्रोह करणे म्हणजे प्रत्यक्ष एखादी प्रक्रिया करणे होय. एखाद्या वेडसर माणसाने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि गेला तर तो राष्ट्रद्रोह झाला का तर याबद्दल न्यायालय निर्णय घेईल. एखादी प्रक्रिया नसेल तर अशा प्रकारच्या घोषणा देणे राष्ट्रद्रोह नाही. पाकिस्तान जिंदाबाद म्हटल्यावर राष्ट्रद्रोह आहे की नाही हे न्यायालय ठरेल. देशाचा गुपित नकाशा घेऊन पाकिस्तान देणार आहे अशा प्रकरणात राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
हे ही वाच भिडू
- हनुमान चालीसा म्हणणं देखील राजद्रोहाच्या कायद्यात येत का..?
- टिळक, गांधींवर लावला गेलेला राजद्रोह हल्ली नवनीत राणांवर लावला जातो : असा आहे इतिहास
- रुपाणींना हटवणार असल्याची भविष्यवाणी केली म्हणून पत्रकारावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला…