खा. संभाजीराजे भाजपला पुरक भूमिका घेतात की विरोधी भूमिका घेतात..?

भाजपने मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, आरक्षणावर तोडगा सांगावा. मराठा आरक्षणासंदर्भात भाजपने त्यांची भूमिका घ्यावी. मी काही त्यांचा ठेका घेतला नाही.

असे व्यक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले. गुरुवारी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले ते बोलत होते.

त्यांच्या या भाजपविरोधी भूमिकेमुळे सोशल मिडीयावर एकच चर्चा सुरू झाली. काही माध्यमांनी खा. संभाजीराजे यांनी भाजपला घरचा आहेर दिल्याचं सांगितलं. मात्र घरचा आहे हा घरातल्या व्यक्तीने द्यायचा असतो. खा. संभाजीराजे हे भाजपच्या घरात आहेत का? हे पडताळून मगच त्यांच्या या वक्तव्याला घरचा आहेर म्हणता येईल.

असो,

तर खासदार झाल्यानंतर संभाजीराजे यांनी पहिल्यांदाच भाजप विरोधात भूमिका घेतली आहे का? खा. संभाजीराजे यांचा नेमका राजकीय स्टॅन्ड काय आहे? की संभाजीराजे दोन्ही दगडांवर पाय ठेवून राजकीय बॅलन्स साधत आहेत.

असे अनेक प्रश्न लोकांना पडलेले दिसून येतात. हे प्रश्न पडण्यामागचं मुळ कारण म्हणजे मराठा आरक्षणाबाबत त्यांनी घेतलेली भूमिका हेच आहे. कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला न बांधून देण्याबाबत मराठा समाजातील तरूण तरी आग्रही असलेले दिसून येतात. 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय ५ मे रोजी दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. तर राज्यातील विरोधी पक्ष हा राज्यानेच याबाबत भूमिका घेण्याची गरज आहे, सध्याचा सत्ताधारी पक्ष मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडला हे सांगत आहे. 

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर यापूर्वी ऑक्टोबर २०२० मध्ये उस्मानाबाद येथे बोलताना खा. संभाजीराजे म्हणाले होते की ,

मी भाजपकडून राज्यसभेवर खासदार असलो तरीही माझी नियुक्ती ही राष्ट्रपतींनी केली आहे, त्यामुळे पक्ष गेला उडत, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिल्लीत धडकायला घाबरणार नाही.

त्यामुळे यापूर्वी ऑक्टोंबर २०२० मध्ये त्यांनी भाजपविरोधी केलेल वक्तव्य आणि काल गुरूवारी नाशिक येथील पत्रकार परिषदेत केलेले वक्तव्य त्यांच्या पक्षविरहित राजकारणाची साक्ष देतात. मात्र खा. संभाजीराजे तांत्रिकदृष्ट्या तरी भाजपमध्ये आहेत का?

खा. संभाजीराजे तांत्रिकदृष्ट्या कोणत्या पक्षात आहेत.

मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. नरेंद्र मोदी यांनी शिफारस केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण भाजपची भूमिका मला लागू होत नसल्याचे खासदार झाल्यानंतर संभाजीराजे यांनी स्पष्ट केले होते.

२००९ च्या निवडणुकीनंतर संभाजीराजे कुठल्याही पक्षाच्या व्यासपीठावर गेले नसल्याचे तसेच खा. संभाजीराजे तांत्रिकदृष्ट्या कोणत्याही पक्षात नसल्याचे पत्रकार सतीश घाडगे यांनी बोलभिडूशी बोलताना सांगितले.

संभाजीराजेंचा यापूर्वीचा इतिहास मात्र राष्ट्रवादीचा..

संभाजीराजे यांनी २००९ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर कोल्हापूर मधून लोकसभेची निवडणूक लढविली होती. मात्र या निवडणूकीत संभाजीराजे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर काही काळ ते पक्षीय राजकारणापासून लांब राहिलेले दिसून येते.

दरम्यानच्या काळात मात्र ते रायगडावर होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सक्रिय होत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यांच्या निमित्तानेच खा. संभाजीराजे तरुणांमध्ये लोकप्रिय झाल्याचे सांगण्यात येते.

या सोहळ्याच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेड सह राज्यातील पुरोगामी नेतृत्वाचा पुरस्कार करणाऱ्या तरुणांसोबत त्यांचा संपर्क दृढ होत गेल्याने सकल “मराठा” नेतृत्त्व त्यांच्याकडे येत गेल्याचं सांगण्यात येत. इथूनच त्यांच्या मराठा राजकारणाला धार मिळत गेल्याचं दिसून येतं.

राष्ट्रवादीनंतर इतर पक्षात प्रवेश?

संभाजीराजे यांनी २००९ सालची लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढविली. संभाजीराजे यांचा पराभव झाला. २०११ पर्यंत ते स्थानिक राजकारणात सक्रीय होते. मात्र, त्यानंतर ते राजकारणातून फारकत घेतली होती.

त्यानंतर संभाजीराजे यांनी रायगडावरील राज्याभिषेक सोहळा आणि गडकिल्ले संवर्धनकडे यात स्वताला झोकून घेतले होते असे सतीश घाटगे यांनी सांगितले.

राष्ट्रपती नियुक्त खासदार

राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून २०१६ साली संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर नियुक्त करण्यात आले. यावेळी राज्यात भाजप-शिवसेना युतीच सरकार होते. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा पाया मजबूत व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजातील नेत्याच्या शोधात होते. त्यातूनच संभाजी राजे यांना संधी दिल्याचा सांगण्यात येते.

निवडणुकांमध्ये सहभाग ?

२०१६ मध्ये राष्ट्रपती नियुक्त खासदार झाल्यानंतर संभाजीराजे यांनी २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा प्रचार केला नाही अथवा प्रचारादरम्यान कोणत्याही व्यासपीठावर गेलेले नसल्याचं सांगण्यात येतं. २०१९ सालच्या लोकसभा निवडणूकांचा प्रचार शिवसेना व भाजपने एकत्रित सभा घेत कोल्हापूरातून केला होता. या सभेला देखील खा. संभाजीराजे उपस्थित नव्हते.

कोल्हापूरचे पत्रकार सतीश घाटगे यांनी बोल भिडूशी बोलतांना सांगितले की,

संभाजीराजे कधीही भाजपच्या व्यासपीठावर, बैठकीला, निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले नाहीत. मात्र, संभाजीराजे यांनी भाजपच्या विरोधात पण कधी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले नाही.

संभाजी राजे यांचे गृहराज्यमंत्री बंटी सतेज, खासदार धैर्यशील माने यांच्याशी त्यांचे चांगले संबध आहेत. मात्र, निवडणुकांमध्ये कधीही संभाजीराजे यांनी कोणाचा प्रचार, लोकांना यालाच मतदान करा असे सांगितले नसल्याचे घाटगे यांनी सांगितले.

मात्र धैर्यशील माने व संजय मंडलीक यांचा लोकसभेला विजय झाल्यानंतर मात्र हे दोन्ही खासदार माझे आहेत असे सांगत अभिनंदन केले होते. 

मराठा क्रांन्ती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव यांच्यासोबत बोलभिडूने संपर्क साधून खा. संभाजीराजे यांच्या भूमिकेबाबत विचारलं असता ते म्हणाले,

संभाजीराजे यांनी ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणूकांमध्ये कोणत्याही उमेदवाराचा प्रचार केला नाही. राज्यभरात मराठा क्रांती मोर्च्याचा वतीने ५० पेक्षा अधिक मोर्चे काढण्यात आले. यातील ४० मोर्च्यात संभाजीराजे उपस्थित होते. भाजपचे सरकार असतांना हे सर्व मोर्चे निघाले.

मग संभाजीराजे भाजपला अनुकूल भूमिका घेतात असं म्हणणे कितपत योग्य आहे ?

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.