शीख धर्मीय व्यक्तींना हेल्मेट सक्ती असते की नसते ? कायदा काय म्हणतो.

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, गणपती प्रमाणे पुण्यात दरवर्षी हेल्मेट सक्ती होतच असते. दंडाच्या पावत्या वाढल्या आणि मार्च एन्डिंगचा हिशोब संपला की आपोआप हेल्मेटसक्ती उठते. तसही हेल्मेटसक्ती विरोधात पुण्यातील काही उत्साही कार्यकर्ते आवाज वगैरे उठवतात. मुळात हेल्मेटविरोधात आवाज उठवण्यात देखील पुणेकरांना इंटरेस्ट नसतो. ते आपलं आमच्या पर्यन्त हि बातमी पोहचलीच नाही या अविर्भावात गाडी चालवत असतो. 

तसाही खरा पुणे पेठेतून जास्तीत जास्त कोथरुडला जातो. नारायण पेठेतून सदाशिव पेठेत जाताना हेल्मेट वापरायचं झालं तर तो खुद्द पेशव्यांचा अपमान ठरेल म्हणून पुणेकर असल्या प्रकरणांमध्ये इंटरेस्ट देखील घेत नाही. 

अरे वरती विषय काय आहे, तुम्ही लिहताय काय? पुणेकर बंद करुन मुळ मुद्यावर कधी येणार. 

येतात. येतात. मुळ मुद्यावर येतात. तर मुळ मुद्दा असा की शीख धर्मातील व्यक्तींना हेल्मेट सक्ती आहे की नाही आणि नसली तर त्याला काय कारण. म्हणजे कस कायदेशीर भाषेत नेमका प्रकार काय आहे. पण कस झालं पुण्यातील हेल्मेट सक्ती प्रकरणाचा विचार करत असताना हा विषय डोक्यात चमकून गेला म्हणून म्हणलं थोडी वातावरण निर्मिती करावी. 

विषय सुरू होतो ते शीख धर्मातील पहिले गुरू नानक देवजी यांच्यापासून. गुरू नानक यांनी गुरू अमरदास यांना शीख धर्मातील पुढील गुरू म्हणून घोषित केले. तेव्हा गुरू अमरदास यांना गुरू नानक देवजी यांनी दस्तार (टर्बन) घातला. 

शीख धर्माचे शेवटचे गुरु म्हणून ज्यांना ओळखले जाते असे गुरु गोबिंद सिंग यांनी लिहून ठेवले आहे की, 

” कंघा दोनों वक्त कर, पग चुनें कर बंधाई..” 

याचाचं अर्थ असा आहे की, 

“दिवसातून दोनदा आपले केस बांधा आणि आपली पगडी काळजीपूर्वक बांधून घ्या.” 

त्यामुळेचं शीख धर्मात टर्बनला (पगडी) महत्वाचे स्थान आहे. अर्थात शिख धर्मात पगडी घालण हे महत्वाचं आहे अशी परंपरा निर्माण झाली. 

स्पष्ट सांगायच झालं तर प्रत्येक धर्मीयांना आपल्या धार्मिक परंपरा, प्रथा जपण्याचा अधिकार आहे. आणि शीख धर्मात पगडी घालणे हि आपल्या धर्मासोबत जोडण्यात आलेली परंपरा आहे. 

आत्ता भारतीय संविधानातील कलम २५.

या कलमानुसार प्रत्येक भारतीय नागरिकास सद्सदविवेकबुद्धीचा वापर करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यासोबतचं प्रत्येकाला धर्माचे प्रकटीकरण, आचरण, प्रचार व प्रसार करण्याचा मूलभूत अधिकार आहे. 

उदाहरणार्थ शीख धर्मीय व्यक्तिंबद्दलच बोलायचं झालं तर, किरपान बाळगण्याचा व परिधान करण्याचा अधिकार आहे. आणि विशेष म्हणजे संविधानातील धर्मविषयक बाबींवरील कलम २५ ते कलम २८ मध्ये आजतागायत एकही घटनादुरुस्ती केली गेली नाही.

आत्ता मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार मोटार वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. पण याच कायद्यामध्ये शीख धर्मीय व्यक्तिंना या कलमातील कक्षेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. आणि याच कारणामुळे शिख धर्मीय व्यक्तीस हेल्मेट सक्ती नसते. 

आत्ता विचार करण्यासारखी दूसरी गोष्ट म्हणजे, पगडी घालण्याची प्रथा प्रामुख्याने पुरूषांमध्ये आहे. पण शीख धर्मीय महिलांना देखील हा कायदा लागू होता. म्हणजेच शीख धर्मीय महिला देखील या कलमाच्या कक्षेच्या बाहेर येतात. 

असाच एक किस्सा झाला होता तो चंदिगडमध्ये. चंदिगडमध्ये गेल्या वर्षी हेल्मेट सक्ती करण्यात आली. या विरोधात पुण्याप्रमाणे इथे देखील आवाज उठवण्यात आला. कायदेशीरदृष्ट्या शीख धर्मीय महिला देखील या कलमाच्या कक्षेत येत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पण शीख धर्मीय पुरूष पगडीमुळे ओळखून येत असत पण महिलाचं काय? शीख धर्मीय महिला आहेत हे पोलिसांना ओळखून येत नसल्याने वादविवादाचे प्रसंग उभा राहू लागले आणि अखेर हेल्मेटसक्तीचा आदेश अघोषीतपणे मागे घेण्यात आला.

  • भिडू दिपक चटप. 

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.