या राजाने ७५ लाखाला अख्खं काश्मीर विकत घेतलं आणि तिथे १०० वर्षे राज्य केलं..

खूप वर्षांपूर्वी एका सुफी शायरने काश्मीरच वर्णन करतां म्हटलंय,

गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त

हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त”

म्हणजेच धरती वर जर कुठे स्वर्ग असेल तर  इथे आहे, इथे आहे, इथेच आहे.

महाप्रचंड बर्फाळ पर्वत, तिथून वाहणाऱ्या सिंधू रावी झेलम सतलज सारख्या नद्या,दऱ्याखोरे  हे सगळं पाहिलं तर काश्मीरला स्वर्ग म्हणायला शायर बनायची गरज नाही. भारताच्या डोक्यावरचा कोहिनुर समजल्या जाणाऱ्या काश्मीरसाठी त्याचे  सौंदर्यच आजवर साठी शाप ठरले आहे.

याची सुरवात तेराव्या शतकातल्या शाह मीर राजवटीपासून झाली. शमसुद्दीन शाह मीर हा इथला पहिला मुस्लिम शासक. यापूर्वी काश्मीर हे एक सांस्कृतिक केंद्र होते. मुस्लिम हिंदू बौद्ध या सर्वधर्मीय समाजाचे लोक येथे गुण्या गोविंदाने राहत होते.  शाह मीरचा मुलगा सिकंदर बुख्तसीन हा कट्टर धर्मांध होता. त्याने काश्मीर मध्ये त्याने इस्लामिक कायदे लागू केले. मंदिरे जमीनदोस्त केली.

सोळाव्या शतकात मुघल बादशाह अकबराने काश्मीर जिंकून घेतलं आणि इथे काही काळासाठी शांतता आली.

पुढे मुघलांच्या राजवटी पाठोपाठ अफगाणी सत्ता आली आणि ती 1752 ते 1899 म्हणजे 67 वर्षे टिकली. अहमद शाह दुराणीच्या कालखंडामध्ये काबुल हे काश्मीर वरील सर्व अधिकारांचे केंद्र बनले होते. काश्मीरमधील त्याची सत्ता ही फार दिवस टिकणार नाही हे अफगाणांना माहीत असल्यामुळे सुरक्षिततेच्या भावनेतून त्यांनी मिळेल तेवढी संपत्ती गोळा करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या काळात काश्मिरी जनता कायम दहशतीच्या वातावरणाखाली वावरत होती.

त्यादरम्यान काबुलने एकूण 26 शासक काश्मीरला पाठवले होते परंतु ते सर्वच्या सर्वच निर्दयी निघाले होते.

स्वतःच्या प्रयत्नांनी अशा जुलमी जोखडातून स्वतःला सोडवून घेणे शक्य न झाल्यामुळे काश्मिरी जनतेने स्वाभाविकच अन्यत्र आशेने पाहण्यास सुरुवात केली. आणि मग त्यांनी पंजाबचा महाराजा रणजीत सिंगकडे मदत मागितली. 1814 मध्ये शिख सैन्याने काश्मीरवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी ठरला.

बिरबल धर नावाचा एक ब्राह्मण श्रीनगर वरून निसटून लाहोरला पळून जाण्यात यशस्वी झाला आणि रणजीत सिंगकडे पुन्हा मदतीची विनंती केली. आणि मग पुन्हा शीखांनी  मोहिमेची आखणी केली. त्यांच्या एका कार्यक्षम आणि कुशल पंजाबी सेनानी दिवाणचंद याच्या नेतृत्वाखाली 1819 मध्ये अफगाणांना काश्मीरमधून हुसकावून लावलं आणि काश्मीर प्रांत शिखांच्या हाती आला.

परंतु ज्या रणजीत सिंग मुळे काश्मीर मुक्त झाला होता, त्याने मात्र मुळात काश्मीर कधीच पाहिला नव्हता. तो काश्मीरच्या सौंदर्याबद्दल बरेच ऐकून होता. आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी काश्मीर प्रदेश पाहावा असे त्याचे स्वप्न होते, परंतु ते पूर्ण करण्याच्या आधीच तो मरण पावला.

ज्या काश्मीर प्रदेशाचे तो स्वप्न रंगवत होता त्याच प्रदेशावर त्याच्याच शासकांनी धुमाकूळ घातला होता. शिखांच्या काश्मीरमधील राजवटीची 27 वर्ष हे भयंकर अत्याचारांनी भरलेली होती. याच काळात श्रीनगर मधील जामा मशिदीतील प्रार्थना थांबवण्यात आल्या होत्या आणि गोहत्या च्या आरोपावरून मोठ्या संख्येने मुस्लिमांना ठार मारण्यात आले होते.

याविरोधात मुस्लिमांनी त्यांची नाराजी म्हणून प्रशासनाशी असहकार पुकारले होते, त्यांच्या या नाराजीमुळे तेथील शासक वारंवार बदलण्यात आले.

या अल्प कालावधीत शिखांनी तब्बल या १० शासक काश्मीरला पाठवण्यात आले होते. परंतू प्रत्येक शासकाने जनतेवर अतिशय जाचक कर बसवले. तसेच त्यांच्या अधिकाऱ्यांनी पैसे उकळणे आणि जुलूम करण्याचे शक्य ते सर्वं प्रकार केले. या सर्व परिस्थितीला कंटाळून काश्मीऱ्यांना काश्मीर सोडून जाणे भाग पडले आणि मग खोर्‍यातील लोकसंख्या कमी होत गेली.

त्यानंतर शिखांच्या दरबारात वजीर असलेल्या गुलाब सिंगला जम्मू चा राजा बनविण्यात आले.

गुलाबसिंग, ध्यानसिंग आणि सुचेतसिंग या डोग्रा बंधूंनी महाराजा रणजीत सिंग यांचे साम्राज्य बळकट करण्यासाठी भरीव योगदान दिले. ते जम्मूतील एका राजपूत कुटुंबातले होते आणि रणजीत सिंगांच्या सैन्यामध्ये सर्वात खालच्या पातळीवर सैनिक म्हणून त्यांनी प्रवेश केला होता. स्वकर्तृत्वावर ते शिख दरबारात सरदार आणि मंत्री पदापर्यंत पोहोचले.

पण जेव्हा महाराजा रणजीत सिंग यांच्या कायदेशीर वारसांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर सिंहासनावर हक्क सांगणाऱ्या लढाईत गुलाब सिंगचे दोन्ही भाऊ मेले. त्या तीन भावांपैकी फक्त गुलाबसिंग राहिला. लाहोरमध्ये अंदाधुंदीची परिस्थिती असताना शीख शासकाने गुलाबसिंगची वैर धरले. शिखांची जम्मूवरील चढाई अयशस्वी ठरूनही गुलाबसिंगला 68 लाख रुपयांची खंडणी द्यावी लागली होती.

परंतु वर्षभरातच परिस्थिती फिरली, त्याला कारण असं होतं की, शिखांनी ब्रिटीशांविरुद्ध युद्ध छेडले त्यावेळी गुलाबसिंगची मदत शिखांना लागणार होती आणि नाईलाजाने गुलाबसिंग मदत करायला तयार झाला आणि शीखांचा मंत्री होऊन ब्रिटिशांसोबत समझोता करण्यासही पुढे आला. त्या तहामध्ये तत्कालीन शिखराजवटीला मान्यता मिळाली. त्याच बरोबर शीख आणि त्यांचा काही मुलुख आणि युद्ध न करण्याचा जामीन व हमी म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दीड कोटी रुपये देण्याचे ठरले.

परंतु याच करारापाठोपाठ अमृतसर येथे गुलाबसिंग बरोबर एक स्वतंत्र करार बनवण्यात आला.

त्यात रावी आणि सिंधू नद्यांच्या मधील डोंगराळ प्रदेश गुलाबसिंग कडे परंपरागत हक्कासहित हस्तांतरित करण्यात आला. त्याकरिता त्याने ब्रिटिशांना 75 लाख रुपये देण्याची अट होती. हा भाग ब्रिटिशांना शिखांच्या लाहोर दरबाराने दिला होता.

‘अमृतसर करार’ म्हणून ओळखला जाणारा हा करार मुळतः बेकायदेशीर होता. आजवर कुठलाही राजा, असे पैसे देऊन सिंहासनावर आरूढ झाला नसेल. ब्रिटिश सरकारने गुलाबसिंगच्या हाती राज्यकारभार सोपवून, प्रजेला नको असलेला राजा त्यांच्यावर लादून त्यांच्यावर घोर अन्याय केला

महाराजा गुलाब सिंग याने काश्मीरचा राजा म्हणून कारकीर्द सुरू केली, ती फक्त प्रजेकडून पैसा मिळवणे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून. मग तो पैसा चांगल्या किंवा वाईट अशा कुठल्याही मार्गाने मिळाले तरी त्याला त्याचे सोयरसुतक नसायचे.

‘शिखांचा इतिहास’ या त्याच्या पुस्तकात कनिंगहॅम यांनी लिहिले आहे की,“तो खरोखर असा मनुष्य आहे जो त्याच्या शत्रूला फसवून त्याला ठार मारण्यास अजिबात मागेपुढे न पाहणार नाही, आणि पैसा गोळा करण्यासाठी तो दडपशाहीचे नाना प्रकार वापरेल”.

जे. पी. फर्ग्युसन याला दुजोरा देत म्हणतो,

“पूर्वज त्याच्याबद्दल असे सांगत असायचे की, राजा भोवती खूप माणसाचा गराडा असेल आणि तरीही त्याच्या प्रजेपैकी कोणाला त्याचे लक्ष वेधायचे असेल तर त्या व्यक्तीने फक्त रुपयाचे नाणे उंचावून राजाकडे पाहत ओरडून सांगायचे, ‘महाराज, अर्जी आहे’. राजा तात्काळ पैशाकडे धाव घेत असे आणि देणारे हातात पडल्यावर त्या माणसाचे जे काही म्हणणे असेल ते ऐकून घेऊन आपला निर्णय देत असायचा.

‘बिगार’ किंवा वेठबिगार पद्धत अस्तित्वात आणण्याचे श्रेय गुलाबसिंगकडेच जाते. तरुण असो किंवा वृद्ध लोकांना जबरदस्तीने त्यांच्या झोपड्यामधून त्यांच्या इच्छेविरुद्ध ओढून आणण्यात येत असे आणि राजाचे अधिकारी आणि सैन्याचे सामान त्यांना वाहण्याचे सांगण्यात यायचे. महिना-महिना ओझी वाहण्याचे काम करून ते लोक भुकेने आणि तहानेने अखेर तडफडून मरत. किंवा मग उंच खिंडीमध्ये थंडीने काकडून मरून जात असत.

गुलाब सिंगला त्याच्या शाही खजिन्यासाठी अधिकाधिक पैसा हवा असल्याने त्याने शाली विनणाऱ्यांवर जाचक कर बसविले होते. त्यामुळे शाली विणकर एवढे दरिद्री आणि कष्टी झाले की अखेर प्रक्षुब्ध होऊन त्यांनी 1865 मध्ये बंड पुकारले. हा उठाव त्या काळात झालेल्या अनेक उठावांपैकी सर्वात सुसंघटित उठाव होता असे म्हटले जाते.

20 एप्रिल 1865 या ऐतिहासिक दिवशी डोग्रा शासक कृपाराम याने राजा रणवीर सिंगच्या आज्ञेनुसार हे बंड बलपूर्वक चिरडून टाकायचे ठरवले. त्याच्या सैन्याने बंडखोरांवर अत्यंत जोरदार हल्ला करून ते बंड चिरडले. यातच जे शेकडो काश्‍मिरी मारले गेले त्यांना गुप्तरित्या पुरण्यात आले होते. बंड दडपण्याचा या कृत्याची बातमी गुप्त ठेवण्यात आली तरी ब्रिटिशांना त्याचा सुगावा लागला आणि ते सावध झाले.

रणवीर सिंग च्या शासन काळात काश्मिरी जनतेने केवळ राजाचे जुलूम सहन केले नाही तर दुष्काळ पूर भूकंप अग्नी प्रकोपाला सारख्या नैसर्गिक आपत्तीनाही त्यांना तोंड द्यावे लागले होते.

1877 मध्ये पडलेल्या दुष्काळ सर्वात भीषण होता. असंख्य काश्मिरींनी त्यावेळी काश्मीर बाहेर स्थलांतर केले. ही स्थलांतर केलेले काश्मिरी नागरिक प्रस्थापित राजवटीविरुद्ध अपप्रचार करतील अशी भीती वाटून लोकांना रस्त्यातच निर्दयपणे मारहाण करून परत खोऱ्यामध्ये भुकेने तडफडण्यासाठी हे जाण्यास भाग पाडले गेले. एका दिवशी तर मुस्लीम जमातीच्या 18 जणांना वुलर सरोवरामध्ये बुडविण्यात आले.

1878 मध्ये हर गोपाल खस्ता नावाचा प्रतिष्ठित हिंदू पंडित नेत्याने ब्रिटीशांना एक गुप्त पत्र पाठवले. त्यात त्यांनी मुस्लीम जमातीवर होत असलेल्या अत्याचारांविषयी तक्रार नोंदवली होती. आणि मुस्लिम समाजातील 18 जणांना वुलऱ सरोवरात बुडवून मारल्याचा घटनेचा त्यात उल्लेख करण्यात आला होता. महाराजाला या गुप्त पत्राचा सुगावा लागला. त्याने हर गोपाल खस्ताला आणि त्याचा भाऊ जानकीनाथ यांच्याबरोबर अटक केली आणि जम्मू येथील बाहू या किल्ल्यात साखळदंडाने बांधून बंदिवान करून ठेवले होते.

परंतु ब्रिटिशांना जेंव्हा या पत्राविषयी कळले तेव्हा त्यांनी दोन्ही भावांना मुक्त करण्याचा आदेश दिला. खस्ता नेत्याच्या मुस्लिम बांधवांसाठी केलेला त्याग  काश्मीरमधील मुस्लिम आणि पंडित यांनी एकत्रपणे काश्मीर निधर्मी राज्य असल्याचा ओळख मजबूत केल्याचे एक तेजस्वी उदाहरण म्हणता येईल.

13 जुलै 1931 रोजी मुस्लिमांनी मध्यवर्ती तुरुंगाबाहेर निदर्शने केली त्यावेळी निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात शेकडो लोक मेले आणि जखमी झाले तेव्हापासूनच एक आधुनिक आणि दीर्घकालीन स्वरूपात काश्मीरमधील स्वातंत्र्याची चळवळ सुरु झाली. 1932 मध्ये शेख मोहम्मद अब्दुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून मुस्लीम कॉन्फरन्स ची स्थापना केली आणि चळवळीला संघटित व शिस्तबद्ध स्वरूप आले. या चळवळीने भारतात आणि भारताबाहेरही अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.

1939 मध्ये मुस्लिम कॉन्फरन्सचे रूपांतर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स मध्ये झाले त्यात बिगर मुस्लिमांनाही प्रवेश देण्यात आला. 1946 साली कॉन्फरन्सने महाराजांना पदत्याग करून काश्मीर सोडण्यास सांगितले.

जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स चे सरचिटणीस मौलाना मोहम्मद सईद मसुदी यांनी 1946 मध्ये, संपूर्ण जगाला काश्मीर छोडो चळवळीचे उद्दिष्ट समजावून सांगितले. 14 ऑक्टोबर 1947 मध्ये श्रीनगर येथील इंदुभूषण न्यायमूर्तींच्या न्यायालयात एक आरोपी म्हणून ते जेंव्हा उभे राहिले, तेव्हा त्यांनी स्वतःच आपला युक्तिवाद केला आणि न्यायालयात अशी साक्ष दिली की,

सदर खटल्यातील गुन्ह्याचा दिवस ज्या दिवशी त्यांनी हजरतबल येथे राजद्रोही स्वरूपी भाषण केले तो नसून, चार शतकांपूर्वी अकबराने ज्या दिवशी काश्मीर आपल्या साम्राज्यात सामील केले, तो आहे. त्या दिवसापासूनच काश्मिरी जनता, तिच्या माथी मारला जात असलेला प्रक्षोभक वक्तव्यांचा गुन्हा दररोज करत आली आहे.

इतिहासातील नोंदींचे संदर्भ देऊन त्यांनी पुढे म्हटले की,

“काश्मिरी मुसलमान डोग्रा राज्यकर्ते हिंदू आहेत म्हणूनच केवळ त्यांच्याशी संघर्ष करीत नसून ते यापूर्वी मुस्लिम, पठाण आणि शीख, पंजाबीशीही लढले आहेत, कारण 1946 पर्यंतच्या गेल्या 360 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडातले ते सर्वं आक्रमणकर्ते होते.

मौलानांनी न्यायाधीशांसमोर दिलेली ही साक्ष म्हणजे मुघल पठाण, शीख आणि डोग्रा राज्यकर्त्यांच्या गुलामगिरी तल्या कालखंडात काश्मीरने आपली निधर्मी ओळख कशी ठामपणे व्यक्त केली, यावरचे सर्वोत्तम भाषण म्हणता येईल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.