कोरोना लसीचं माहित नाही पण डोलो ६५० चे मालक रग्गड श्रीमंत झालेत ..

भावड्या गेले वर्ष दिड वर्ष झाले कोरोनाचा दंगा सुरु आहे. पहिली लाट दुसरी लाट येऊन गेली अजून तिसरी चौथी लाट येणार असं म्हणतात. काय खरं काय खोटं माहित नाही. सगळ्यांचे धंदे बंद पडलेत. सगळ्यांची तोंडं वाकडी झाली आहेत.

या वर्षी कोरोना लस आली आणि आपल्या जीवात जीव आला. पण त्या लसीच बुकिंग करायचं म्हणजे वेगळीच लढाई होती. वयाचे नियम, आधार कार्ड, कोवीन साईट यांच्याबरोबर महिनाभर झुंज देऊन देऊन कोरोना बरा वाटतोय कि काय अशी परिस्थिती आली. त्यातसुद्धा हैदराबादची कोवॅक्सीन भारी कि पुण्याची कोव्हीशील्ड चांगली? हे सगळं सोडून रशियाच्या स्पुटनिकची वाट बघायची ? अशा देखील अनेक चर्चा रंगल्या होत्या.

तरी पण चिकाटीचा गुण असल्यामुळे या सगळ्या प्रश्नांच्या मुंडक्यावर पाय देऊन कसबस लसीच बुकिंग झालं. वेळ साधून लस टोचून देखील घेतली. पंतप्रधानांचा फोटो असलेलं सर्टिफिकेट देखील हातात पडलं. कोरोनावर विजय मिळवल्याच्या थाटात बाहेर आलो पण जाता जाता तिथल्या सिस्टरबाई म्हणाल्या,

आता एकच प्रिकॉशन. जेवल्यावर डोलो ६५० गोळी घ्या.

तस गेल्या वर्षी कोरोना आल्यापासून अनेक औषधांची नावे कानावर पडून गेली. सगळ्यात आधी  रेमेडीसीव्हीर इंजेक्शनने मार्केट खाल्लं होतं, हजारो रुपयांना लोकांनी ती विकत घेतली. त्याचा उच्चार शिके पर्यंत नाकीनऊ आलं होतं पण पुढे त्याच्यापेक्षाही महाग असलेलं आणि त्याच्याही पेक्षा अवघड नाव असलेलं टॉसिलीझुमॅब देखील येऊन गेलं. हे सोडून  फेव्हीपॅरावीर व फॅबी फ्लु हि दोन औषध आली.

अजूनही काय काय चालू आहे. अधूनमधून रामदेव बाबा डोकं वर काढून कोरोनीलचा सल्ला देत असतात. या सगळ्या भाऊ गर्दीत हा डोलो ६५० कोण गडी आला हा प्रश्न आम्हाला पडला.

सध्याच्या मंदीच्या काळात पाचही बोट तुपात असलेले दुकानदार म्हणजे मेडिकलवाले अण्णा यांची आम्ही गाठ घेतली आणि डोलो ६५० द्या म्हणून सांगितलं. अण्णांच्या दुकानात आमच्या आधी दहा जण आले होते, प्रत्येक जण डोलो मागत होता. लसीपेक्षाही जास्त मारामारी या डोलो ६५० साठी चालली होती. आम्हाला डोलो म्हणजे रामबाण उपाय असल्यासारखं वाटू लागलं.

तरी पण त्या गडबडीत अण्णांनी आम्हाला डोलो हा प्रकार काय हे एक्सप्लेन करून सांगितलं. ते म्हणाले,

अरे भिडू डोलो हा काय कोरोनावरचा औषध नाही. ते लसी नंतरचा साईड इफेक्ट कमी व्हावा म्हणून दिल जाणारं औषध आहे. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे ते पॅरासिटेमॉल आहे. ते काय रामबाण उपाय नाही पण चार दुकानं फिरून बघ सध्या जगातल्या कोणत्याही औषधांपेक्षा सगळ्यात जास्त खप याच डोलोच आहे.

आम्ही तर भारावूनच गेलो. नेहमीप्रमाणे या डोलोचा इतिहास शोधायच्या मागे लागलो.

तर हि डोलो ६५० बनवली आहे मायक्रो लॅब्स लिमिटेड या कंपनीने. घाबरू नका हि कंपनी भारतीयच आहे. तिला बनवलं होतं घेवरचंद सुराणा यांनी. सुराणा हे जरी मूळचे मारवाडी असले तरी त्यांची कर्मभूमी होती दक्षिण भारत. साठच्या दशकात तत्कालीन मद्रासमध्ये फिरून औषधे विकणाऱ्या जी.सी.सुराणा यांनी कष्ठाने प्रगती केली आणि आधी औषधांचे डिस्ट्रियुब्युटर बनले. अफाट पैसे कमवले,

यातूनच १९७३ साली मद्रासमध्येच स्वतःची औषध कंपनी स्थापन केली. नाव दिल मायक्रो लॅब्सज लिमिटेड.

प्रामाणिकपणा आणि मेहनत हि सुराणा यांची ओळख होती. त्यांनी आणि पुढे त्यांच्या मुलांनी दिलीप आणि आनंद सुराणा यांनी मायक्रो लॅब्जला मोठं बनवलं. तामिळनाडूच्या होसूर मध्ये नवीन कारखाना सुरु केला. पुढे बेंगलोरला आपलं हेडक्वार्टर हलवलं.

साधारण नव्वदच्या दशकाच्या सुरवातीला मायक्रो लॅब्जने एक औषध बनवलं जे जगात हिट झालं ते म्हणजे डोलो ६५०.

ताप,डोकेदुखी, Febrility, Fevers, थंड, सांधे दुखी, दातदुखी, कान दुखणे, कालावधी वेदना, फ्लू आणि आरोग्याच्या इतर समस्या यांच्याशी फाईट देणारी साधी पॅरासिटेमॉल मायक्रो लॅब्जने बनवलेली मात्र ती इतकी गुणकारी बनली कि तिने खपाच्या बाबतीत अनेक विक्रम करून ठेवले. मायक्रो लॅब्जला जगातिक पातळीवर ओळख डोलोने बनवली. 

कोणताही साईड इफेक्ट नाही, प्रचंड गुणकारी असलेल्या डोलोला २०१० साली सी मार्कचा बेस्ट ब्रॅण्डचा पुरस्कार देखील मिळाला. या गोळीने आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत मायको लॅब्जला एवढे पैसे मिळवून दिले कि आज ते फोर्ब्जच्या यादीत जाऊन पोचलेत.

दिलीप आणि आनंद सुराणा हे दोघे बंधू भारताच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत आघाडीवर जाऊन पोचलेत. 

यावर्षीच्या एप्रिलपासून डोलोची मागणी तब्बल ४०% नि वाढली होती. लस येण्याच्या आधीच लोकांनी dolo ५० चा स्टॉक करायला सुरवात केली होती. आता तर काय २८ रुपयांना पाकीट मिळणाऱ्या या गोळीने डोलोच्या मालकांवर पैशांचा पाऊसच पाडलाय.

लस कोणतीही घ्या पण त्यावर उतारा म्हणून डोलो ६५० घ्यायलाच लागतंय. अशा या विक्रमी गोळीची गाथा येत्या अनेक पिढ्यांमध्ये सांगितली जाईल हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.