जॉनी डेप, विल स्मिथ आहेतच पण बायकांचा त्रास भोगणाऱ्या भारतीय पुरुषांची संख्याही कमी नाही

जॉनी डेप आणि विल स्मिथ बद्दलच्या बातम्या वाचल्यावर आम्ही गुगल करुन पाहिलं. Does men face domestic violence in India? आम्हाला वाटलं आकडेवारी येईल किंवा काही बातम्या येतील. पण समोर काय आलं माहिती?

गुगलनं विचारलं, ‘Do women face domestic violence in India’

म्हणजे गुगललाही वाटतं आपण महिलांवर होणाऱ्या डोमेस्टिक व्हायोलन्सबद्दल सर्च करत असू. माहिलांवर होणारे घरगुती अत्याचार हा खरंच गंभीर विषय आहे. त्याचे वाढते आकडे, त्याच्या येणाऱ्या बातम्या या निश्चितच आपली काळजी वाढवणाऱ्या आहेत.

पण मग अशा वेळी प्रश्न पडतो, की पुरुषांचं काय?

पुरुषही घरगुती हिंसाचाराला सामोरे जातात, पण त्याची ना वाच्यता होते, ना त्याची बातमी होते. जेव्हा होते, तेव्हा विल स्मिथ किंवा जॉनी डेपसारखं मोठं प्रकरण व्हावं लागतं.

सध्या चर्चेत असलेलं जॉनी डेप प्रकरण काय आहे?

पायरेट्स ऑफ कॅरेबियनमधला कॅप्टन जॅक स्पॅरो म्हणून जॉनी डेप आपल्या सगळ्यांना माहितीये. त्याची पूर्वाश्रमीची बायको अम्बर हर्ड आणि त्याचा घटस्फोट काही वर्षांपूर्वीच झाला होता. पण सध्या अब्रुनुकसानीच्या दाव्यामुळं हे प्रकरण कोर्टात गेलंय.

कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप झाले. या दोघांनीही एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले. जॉनीनं हर्डनं आपल्यावर फेकलेल्या काचेच्या बाटलीमुळं आपलं बोट तुटल्याचा आरोप केला. तिनं आपल्याला बऱ्याचदा मारहाण केल्याचं सांगितलं. सोबतच ‘मी जेव्हा मला उपचार घेऊदेत म्हणून तिच्याकडे भीक मागत होतो,’ हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात खराब काळ होता असंही म्हणाला.

या प्रकरणाचा निकाल न्यायालय देईलच. पण पुरावा म्हणून सादर करण्यात आलेल्या ऑडिओ क्लिप्समध्ये हर्ड म्हणते, ”तू डोमेस्टिक व्हायोलन्सला बळी पडलाय यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही.तुला हवं तर कुणालाही सांगून बघ.”

थोडक्यात तिचं म्हणणं असं आहे, की पुरुषावर अत्याचार होऊ शकतो, यावर कुणी विश्वासच ठेवणार नाही.

दुसरी गोष्ट आहे विल स्मिथची

आपल्या बायकोवर जोक केल्यामुळं त्यानं ख्रिस रॉकला भर ऑस्करच्या स्टेजवर कानपट्टा दिला होता. त्यावेळी कित्येक लोकांनी विल स्मिथचं कौतुक केलं होतं. पण त्याची बायको जाडा पिकेंट आणि त्याचा आणखी एक किस्सा बऱ्याच लोकांना माहिती नाही.

रेड टेबल टॉक नावाच्या एका शोमध्ये जाडा आणि विल स्मिथ होते. तेव्हा बोलताना जाडानं आपण दुसऱ्या पुरुषासोबत काही काळ रिलेशनशिपमध्ये असल्याचं मान्य केलं. विशेष म्हणजे तेव्हा स्मिथ आणि जाडाच्या मॅरेज लाईफमध्ये बरेच अडथळे आले होते. आपल्या बायकोनं आपल्यासोबत चीट केलंय, हे समजल्यावर विल स्मिथचा चेहरा रडवेला झाला होता (जे साहजिकच आहे.)

पण त्याच्या त्या रडवेल्या चेहऱ्यावर मिम्स बनले, ना त्याच्या मानसिक कणखरतेची कुणाला काळजी वाटली ना कुणाला जाडा चुकीची वाटली. स्मिथचं रडणंही सोशल मीडियाला मीम देऊन गेलं.

विल स्मिथ आणि जॉनी डेप दोघंही हॉलिवूडमधले मोठे स्टार्स. त्यांच्या आयुष्यात या अशा घटना घडल्या, तेव्हा कुठं या सगळ्याला वाचा फुटली. तेही थोड्या प्रमाणातच. 

तुलनेनं पुढारलेल्या परदेशात ही परिस्थिती असेल, तर भारतात काय असेल?

२०१९ मध्ये हरियाणाच्या ग्रामीण भागात पुरुषांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचाराबाबत रिसर्च झाला होता. तेव्हा पुढं आलं, की १००० पैकी ५१ टक्के पुरुषांना आपल्या बायकोकडून घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागलं होतं. यात शारीरिक हिंसाचाराचं प्रमाण ६ टक्के आढळलं, पण मानसिक हिंसाचाराच्या घटना ५१ टक्क्यांहून अधिक वेळा घडल्या होत्या.

मेन वेलफेअर ट्रस्ट नावाच्या एका भारतीय संस्थेला लॉकडाऊन दरम्यान घरगुती अत्याचाराला सामोऱ्या जाणाऱ्या १७७४ पुरुषांचे फोन आलेले. यावरुनच आपल्याला गंभीरतेची कल्पना येते. 

एवढंच काय, तर पुरुषांवर होणाऱ्या डोमेस्टिक व्हायोलन्सबद्दल भारतात कुठलाच कायदा नाही. अत्याचार होणारे बरेच पुरुष बदनामीच्या भीतीनं ना मदत मागतात, ना कुणाशी बोलतात. मानसिक अत्याचार तर किती होतात याची गिणतीच होत नाही.

समजा एखाद्यानं सांगायचं ठरवलंच, तर जे जॉनी डेपला ऐकावं लागलं ते ऐकण्याची भीती असतेच…
तू पुरुष आहेस, तुझ्यावर डोमेस्टिक व्हायोलन्स झालाय यावर कोण विश्वास ठेवणार..?

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.