ब्रॅडमनची आणि आफ्रिकन पंतप्रधानांची भेट त्यांच्या टीमला २० वर्षांसाठी बॅन करून गेली

साल होतं १९७१.

जगातला आजवरचा सर्वात महान क्रिकेटर म्हणून ओळखले जाणारे सर डॉन ब्रॅडमन रिटायरमेंट नंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन बनले होते. त्यावर्षी ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी दौऱ्यासाठी जाणार होती. सराव तयारी जोरात सुरु होती.

सर डॉन ब्रॅडमन आपल्या ऑफिसमध्ये काही तरी काम करत होते. तेव्हा त्यांच्या नावाने एक पत्र आलं. हे पत्र Anti-Apartheid Movement या संघटनेकडून पाठवण्यात आलं होतं. जगभरात खेळामध्ये जो वर्णभेद चालतो त्याच्या विरुद्ध चळवळ उभी करणारी ही संस्था होती.

त्यांनी आपल्या पत्रात दक्षिण आफ्रिकन सरकार आपल्या देशामध्ये कसा वर्णभेद करते आणि याची झळ क्रिकेटला देखील कशी बसली आहे याच वर्णन केलं होतं.

याच वर्णद्वेष विरोधी चळवळीने दक्षिण आफ्रिकेची रग्बी टीम ऑस्ट्रेलियाला आली होती तेव्हा त्याचा मोठा विरोध केला होता. काही प्रमाणात दंगली देखील झाल्या होत्या. खरं तर कायम राजकारणापासून चार हात लांब असणारे ब्रॅडमन या वादात पडायचं नाही याच मताचे होते. पण त्या पत्रामुळे त्यांनी एकदा दक्षिण आफ्रिकेत जाऊन नेमकी परिस्थिती जाणून घ्यायचं ठरवलं.

दक्षिण आफ्रिकन वर्णद्वेष तेव्हा चरमसीमेवर होता. त्याकाळी दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान जॉन व्होर्स्टर हे होते. एकेकाळी दक्षिण आफ्रिकेला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिलं होतं. पण गंमत म्हणजे त्यांना ब्रिटिश राजवट नको होती तर दक्षिण आफ्रिकेवर हिटलरचं राज्य यावं यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्यांनी तसे प्रयत्न केले देखील होते. हिटलर मेला तरी त्याचा नाझीवाद दक्षिण आफ्रिकेत व्होर्स्टर यांनी जिवंत ठेवला होता.

अखंड पृथ्वीतलावर फक्त गोरे लोकच श्रेष्ठ आहेत हे हिटलरचे विचार व्होर्स्टर यांनी आफ्रिकेत अंमलात आणले होते.

त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात कृष्णवर्णीयांच्या वरील अत्याचारात वाढ झाली. याची झलक क्रिकेटमध्ये देखील पाहण्यास मिळत होती. त्याकाळी बेसिल डी ओलीव्हेरा हा एक मिश्र वर्णीय खेळाडू आफ्रिकेच्या टीमचे दार ठोठावत होता तर त्याला बंदी घालण्यात आली.

आफ्रिकेच्या टीम मध्ये फक्त श्वेत वर्णीयच खेळतील अशी भूमिका तिथल्या क्रिकेट बोर्डने घेतली. इतकंच नाही तर सामने देखील फक्त गोऱ्या टीम बरोबर म्हणजे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड बरोबर खेळणार असा वादग्रस्त निर्णय त्यांनी सरकारच्या आग्रहामुळे घेतला होता.

सर डॉन  ब्रॅडमन जेव्हा त्यांच्या भेटीला जोहान्सबर्ग येथे आले तेव्हा त्यांना याचा चांगलाच अनुभव आला. पंतप्रधान जॉन व्होर्स्टर यांच्याशी त्यांची भेट झाली. ऑस्ट्रेलिया आफ्रिका क्रिकेट दौऱ्याबद्दल दोघे चर्चा करत होते तेव्हा ब्रॅडमन यांनी त्यांना आफ्रिकन क्रिकेट टीम मध्ये एकही कृष्णवर्णीय खेळाडू का नाही हा  प्रश्न विचारला. तेव्हा व्होर्स्टर यांनी उत्तर दिलं की,

काळ्या खेळाडूंना अक्कल कमी असते. त्यांना खेळातील गुंतागुंत समजत नाही.

सर डॉन ब्रॅडमन या उत्तरामुळे भडकले आणि पंतप्रधानांना सरळ म्हणाले,

“Have you ever heard of Garry Sobers? तुम्ही गॅरी सोबर्सचे नाव कधी ऐकलं आहे का?”

गॅरी सोबर्स हा तेव्हा वेस्ट इंडिजचा कप्तान होता. क्रिकेटच्या ऑल टाइम ग्रेटेस्ट खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो. या प्रश्नामुळे जॉन व्होर्स्टर गांगरून गेले. एरव्ही हांजी हांजी करणाऱ्या खुषमस्कऱ्यांचा गराडा सत्ताधाऱ्यांविरुद्ध असतो मात्र एक रिटायर्ड क्रिकेटर आपल्या ऑफिसमध्ये येऊन आपला अपमान करतो हे दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधानांना पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं होतं.

दोघांच्यात त्या दिवशी मोठा वाद झाला. कधीही आपला संयम न सोडणारे डॉन ब्रॅडमन त्या दिवशी मात्र चांगलेच खवळले होते. जॉन व्होर्स्टर यांचे वागणे फक्त मूर्खपणाचे नाही तर निंदनीय आहे हे मत ब्रॅडमन यांचे झाले. आफ्रिकेतून ते इंग्लंडला गेले. तिथे काही ब्रिटिश नेत्यांशी त्यांचे बोलणे झाले. 

ऑस्ट्रेलिया मध्ये परतल्यावर त्यांनी क्रिकेट बोर्डची मिटिंग बोलावली. आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी आफ्रिकेत नेमकं काय घडलं हे सांगितलं आणि एका वाक्यात आपला निर्णय जाहीर केला.

“जो पर्यंत ते क्रिकेटमधील वर्णद्वेष बंद करत नाहीत तो पर्यंत आपण त्यांच्या बरोबर खेळायचे नाही.”

ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेचा कसोटी दौरा रद्द केला हि बातमी ऐकल्यावर सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली. पंतप्रधान जॉन व्होर्स्टर यांनी तिथल्या संसदेत डॉन ब्रॅडमन यांच्या विरुद्ध चांगलीच आगपाखड केली. पण जगभरात वर्णविरोधी काम करणाऱ्या संस्थांनी याच कौतुक केलं.

ऑस्ट्रेलिया पाठोपाठ इतर क्रिकेट बोर्डनी याचे समर्थन केले. खुद्द आयसीसीने दक्षिण आफ्रिकन टीमला आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यापासून बंदी आणली.

या सगळ्यामागे प्रमुख भूमिका डॉन ब्रॅडमन यांचीच होती. या बंदी मुळे बॅरी रिचर्ड्स, ग्रॅमी पोलॉक, पिटर पोलॉक या चांगल्या आफ्रिकन खेळाडूंवर अन्याय होणार आहे याची त्यांना जाणीव होती मात्र एक मोठे ध्येय साध्य करायचे असेल तर हे कटू वाटणारे निर्णय घ्यावे लागणार याबद्दल ब्रॅडमन ठाम होते.

आफ्रिकेचा दौरा रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटला प्रचंड मोठे नुकसान देखील झाले. पण ब्रॅडमन यांनी जगभरातील मोठमोठ्या खेळाडूंना बोलावून काही प्रदर्शनीय सामने खेळवले. यात वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळ्या वर्णाचे खेळाडू एकमेकांच्या खांद्याला खांदा भिडवून खेळत होते.

या सामन्यांमधून डॉन ब्रॅडमन यांनी एकतेचा आणि बंधुत्वाचा संदेश तर दिलाच शिवाय ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डचं नुकसान देखील भरून काढलं.

पुढे जवळपास २० वर्षे दक्षिण आफ्रिकन टिमला आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळता आले नाही. नव्वदच्या दशकात जेव्हा आफ्रिकेचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेल्सन मंडेला यांची २७ वर्षांनी सुटका झाली तेव्हा त्यांनी बाहेर आल्या आल्या पहिला प्रश्न विचारला होता,

“सर डॉन ब्रॅडमन जिवंत आहेत ना ?”

ब्रॅडमन यांनी १९७१ साली घेतलेल्या निर्णयामुळे मंडेला त्यांच्या प्रेमात पडले होते. आफ्रिकेतील वर्णद्वेष नष्ट व्हावा यासाठी जी पावले उचलली गेली त्यात क्रिकेट वरील बंदी याचे प्रचंड मोठे महत्व होते.

मंडेला यांचे सरकार आल्यावर आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांवर अन्याय करणारे निर्णय मागे घेण्यात आले. याचबरोबर आयसीसीने देखील दक्षिण आफ्रिकन संघावरील बंदी उठवली. वीस वर्षांनी त्यांची टीम आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.