फक्त पोलिसच नाही तर खुंखार डॉन काला जठेडी देखील पै. सुशील कुमारच्या मागावर आहे..

पहिलवान लोकांचं काम म्हणजे डोक्याला शॉट लावून नाय घ्यायचा , दणकून खायचं, रग्गड व्यायाम करायचा, कुस्ती चितपट मारायची संपला विषय. असही आपल्या महाराष्ट्रात म्हणलं जातं कि पहिलवान गडी डोक्याने काम नाय घेत, समोर जो येईल त्याला आडवा करायचा इतकंच पहिलवानाला कळतं. पण नुकतंच ट्रेंडिंगला एक प्रकरण आलं ते सुशील कुमारचं.

आता सुशील कुमार म्हणजे कोण ? विसरले असाल तर सांगतो , ऑलम्पिक स्पर्धेत भारतासाठी मेडल जिंकून आणणारा हा कुस्तीपटू म्हणजे सुशील कुमार. खरंतर कुस्तीच्या स्पर्धांमध्ये भारताची शान तर तो आहेच शिवाय भारताचं नाक पण आहे. कुस्तीचा जेव्हा विषय येतो तेव्हा सुशील कुमार हे नाव भारताचं जगभरात प्रतिनिधित्व करतं.

पण या कुस्तीपटू सुशील कुमारने खतरनाक गडबड केलीय, कुस्ती बिस्ती हारला, सिग्नल तोडला या किरकोळ गोष्टी नाही तर गड्याने मर्डर केल्याचं बोललं जातंय. आता या प्रकरणात तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचं सांगितलं जातंय आणि तो या घटनेनंतर फरार झाला आहे.

यात केवळ पोलिसचं नाही तर कुख्यात डॉन काला जठेडी सुद्धा सुशील कुमारला शोधतोय. सगळ्यात आधी हा नक्की काय लफडा झालाय ते बघू म्हणजे लिंक लागेल.

मॉडेल टाऊनच्या छत्रसाल स्टेडियममध्ये ४ मे ला सागर धनकड नावाच्या एका ज्युनियर कुस्तीपटूची हत्या करण्यात आली. या घटनेत मुख्य आरोपी म्हणून सुशील कुमार आहे. जागा खाली करण्यावरून किंवा पैशाच्या वादातून उदभवलेला हा वाद थेट खुनापर्यंत गेला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याचं कळताच सुशील कुमार हा फरार झाला आहे.

४ तारखेला घडलेल्या घटनेनंतर सुशील कुमार हा ५ तारखेला हरिद्वारला गेला आणि तिथून फरार झाला. या हत्येतील मुख्य सूत्रधा र म्हणून सुशील कुमारकडे पोलिसांचं आणि सागरच्या नातेवाइकांचं बोट आहे.

आता या मध्ये हा कुख्यात डॉन काला जठेडीचा काय संबंध ? तर सागर धनकड वर जेव्हा हल्ला झाला तेव्हा सागरचा मित्र सोनू तिथं उपस्थित होता, सुशील कुमार आणि त्याची बाकीची पोरं त्यांना लाकडी दांड्याने आणि लोखंडी रॉडने मारायला लागले, या घटनेत जबरी मार लागल्याने सागर धनकडचा जागीच मृत्यू झाला. सोनूला सुद्धा यात जखमा झाल्या.

नंतर असं कळलं कि सागरचा मित्र सोनू हा कुख्यात डॉन काला जठेडी याच्या सख्ख्या मामाचा मुलगा आहे. आता प्रकरणाने सुशील कुमारवर काला जठेडी गँगची प्रचंड नाराजी आहे, हि गॅंग बऱ्याच दिवसांपासून सुशील कुमारला हुडकत आहे. दिल्ली पोलीस जिथे जिथे सुशील कुमारसाठी छापेमारी करत आहे तिथं तिथं काला जठेडीसुद्धा चौकशी करत आहे.

कुख्यात डॉन काला जठेडीने सुशील कुमारला मारण्याची धमकीसुद्धा दिली आहे. या धमकीला घाबरून सुशील कुमारने फोनवरून हे प्रकरण समजूतदारीने मिटवण्याचा प्रस्ताव मांडला. हे सगळं केलं खरं पण हा डॉन काला जठेडी काय ऐकायला तयार नाहीए. सुशील कुमार म्हणतोय कि आधी काला जठेडी सोबत प्रकरण मिटवल्यावर पोलिसात जाऊ.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सुशील कुमार हा नेपाळ मध्ये लपून बसला आहे. कुख्यात डॉन काला जठेडीला घाबरून सुशील कुमारने हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जातंय. सुशील कुमारची मात्र या प्रकरणावरून सगळीकडे नाचक्की झाली आहे.

जागतिक पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि मनाच्या स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंकडून अशा प्रकारचा गुन्हा घडल्याने प्रसारमाध्यमांनी टीकेची झोड उठवलेली आहे. आता सुशील कुमार हीच प्रार्थना करत असले कि एकवेळ पोलिसांना घावलो तरी चालेल पण डॉन काला जठेडीला नको.

इतकंच नाही तर ऑलम्पिक स्पर्धेच्या वेळी एका कुस्ती सामन्यात सुशील कुमारने सेमीफायनलमध्ये  प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूचा कान चावला होता मात्र त्यावेळी त्याच्यावर कुणीही आक्षेप नोंदवला नव्हता कि कारवाई केली नव्हती. त्यावर्षी त्याने कुस्तीत ऑलिम्पिक सिल्व्हर पदक देखील पटकावलं 

सुशील कुमारच्या अटकेसाठी पोलिसांनी जंग जंग पछाडलंय त्याहीपेक्षा काला जठेडीने जास्त हुडकलंय. अजूनही सुशील कुमार हाती लागला नसून या दोघांपैकी एकाच्या तर हाती तो नक्कीच लागणार असं दिसतंय.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.