बॅन हटवला नाही म्हणून ट्रम्पतात्या स्वतःचं सोशल मीडिया ॲप घेऊन आलेत

गल्ली क्रिकेटमध्ये एक नियम असतोय, ज्याची बॅट, त्याची पहिली बॅटिंग. जर पहिली बॅटिंग मिळणार नसेल, तर बॅटचा मालक घरी जातो आणि क्रिकेटची मॅच काय सुरू होत नाय. आता एखादं पोरगं असतंय, जे लई वांड असतं पण त्याच्याकडं बॅट असती त्यामुळं ते टीमचं कॅप्टन बनतंय. एकदा का बॅट तुटली की त्या पोराला काय किंमत मिळत नाय. पण पोरगं वांड, ते नवी बॅट घेऊन येतं आणि पुन्हा हवा करतं.

हे सगळं सांगतोय, कारण किस्सा तसाच घडलाय. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःचं सोशल मीडिया ॲप आणायचं जाहीर केलंय.

नवं ॲप का?

तर सिम्पल विषय आहे. ट्रम्पतात्यांना फेसबुक, ट्विटरनं बॅन केलं आणि तो बॅन काय काढला नाही. त्यामुळं डायरेक्ट स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणत ट्रम्प दंगा करणार. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं नाव असणार आहे ट्रुथ सोशल. येत्या नव्या वर्षाच्या सुरुवातीला हा प्लॅटफॉर्म लॉंच होणार आहे. हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रम्प मीडिया आणि टेक्नॉलॉजी ग्रुपद्वारे विकसित केला जात आहे. यामध्ये व्हिडिओ ऑन डिमांड सेवेचा आणि नॉन-व्होक मनोरंजन प्रोग्रामिंगचा समावेश असेल. सध्या ॲपलच्या आय स्टोअरवर ट्रुथ सोशल प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.

ट्रम्प बॅन का झाले?

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर, कॅपिटल बिल्डिंगमध्ये झालेला गोंधळ आणि हिंसाचारानंतर ट्विटर आणि फेसबुकनं ट्रम्प यांच्या अकाऊंट्सवर पूर्णपणे बंदी घातली.

ट्रम्प याबद्दलच्या निवेदनात म्हणतात, “आपण अशा जगात राहतो जिथं तालिबानची ट्विटरवर उपस्थिती आहे, पण तुमचे आवडते अमेरिकन अध्यक्ष मात्र शांत आहेत. मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या अत्याचारांच्या विरोधात उभं राहण्यासाठी ट्रम्प मीडिया आणि टेक्नॉलॉजी ग्रुप नवा प्लॅटफॉर्म आणत आहे.”

ज्या ट्रम्प यांच्यावर फेक न्यूजचा प्रसार केल्याचा ठपका ठेवला गेला त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं नाव ‘ट्रुथ सोशल’ असल्यानं, नेटकरी गाणं गातायत…

आयरनीच्या देवा तुला ठिणगी, ठिणगी वाहूदे!!

आता या नव्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कसा प्रतिसाद मिळतोय आणि ट्रम्प स्वतःच्या प्लॅटफॉर्मसाठी काय नियम आखतात, हे पाहणं महत्त्वाचं आणि रंजक ठरणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.