आज अहमदाबादला आलेले ट्रम्प तात्या एकेकाळी भारतात आले की पुण्याला उतरायचे !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनू तात्या ट्रम्प उर्फ डोनाल्ड ट्रम्प हे आज अहमदाबाद दौऱ्यावर आहेत. खुद्द पंतप्रधानांनी आपल्या पाव्हण्याला आग्रहाने आपल्या गावकड नेलंय. कोणताही राष्ट्राध्यक्ष थेट अहमदाबादला उतरण्याची ही पहिली वेळ असेल. सगळ्या गुजराती भावांची कॉलर ताठ झालीय. हावडी मोदी नंतर केम छो ट्रम्पचा जल्लोष झालाय,

तस म्हटल तर आमच्या गुजराती बांधवांच्या मते न्यूयॉर्क नंतर सगळ्यात डेव्हलप शहर कुठल असलं तर ते अहमदाबाद.

पण एक काळ असा होता. ट्रम्प तात्या भारतात आले की पुण्याला यायचे. का, कशाला सगळ सांगतो.

गोष्ट आहे २०१२ ची. नोटबंदी, आर्थिक मंदी असले काही मॅटर नव्हते. लोकांच्या खिशात पैसा खूळखुळत होता. गुंतवणुकीचा राडा सुरु होता. नवनवीन प्रोजेक्ट सुरु होत होते. सगळ्यांना पुण्यामुंबईला घरं घ्यायची हौस निर्माण झाली होती. पुण्याच्या बिल्डर्सचे तर सगळी बोट तुपात होती. मुळशी पॅटर्नची विकास मालिका आकार घेत होती.

भारतातल्या काही बिल्डरना डोनाल्ड ट्रम्प तात्याचा फोन आला.

कारण म्हणजे तो राष्ट्राध्यक्ष आत्ता परवा तीन वर्षापूर्वी झालाय. पण हाय खरा तो बिल्डर. जगातला सगळ्यात मोठा बिल्डर. त्याच्या आबा आज्ज्यापासून घरात बिल्डरकी चालत आलेली. कुत्र्यासारखा पैसा घरात पडून होता. तेव्हा त्याला कोण तर सांगितल की भारतात पुन्यनगरी म्हणून गाव हाय तिथ पैसा गुंतव.

पंचशीलवाल्या चोरडियांना बोलून पुण्यात कल्याणीनगरमध्ये जागा बघितली. न्यूयॉर्कच्या ट्वीन टोवरची छोटी प्रतिकृती असलेल्या अलिशान ट्रम्प टॉवरच बांधकाम सुरु केलं. पुण्याबरोबरच मुंबईला लोढा बिल्डर्सबरोबर डील फायनल करून तिथेही बिल्डींग बांधायचं ठरल.

 ट्रम्प टॉवरची पहिली बिल्डींग तयार झाली तो पर्यंत २०१४ साल उजाडलं होतं.

त्याच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने तात्या आपल्या लेकाला घेऊन प्रायव्हेट जेटने भारतात आले. पुण्याच्या मरीयट मध्ये त्यांचा कार्यक्रम झाला. आपण सामान्य माणस तेव्हा त्याला ओळखत नव्हतो पण जगातल्या सर्वात श्रीमंत माणसापैकी एक असलेल्या ट्रम्प तात्याच्या कार्यक्रमात भारतातले झाडून सगळे सेलिब्रिटी हजर होते.

विश्वसुंदरी लारा दत्ताने त्याची मुलाखत घेतली. ट्रम्प तात्या आपल्या मिश्कील स्टाईलने तिला म्हणाला,

“तू काय विचारणार मला ठाऊक आहे. आधीच एक सिक्रेट सांगून टाकतो. माझ्या डोक्यावरचे केस खोटे नाहीत.”

तात्याने पहिल्याच बॉलला सिक्स मारून इंटरव्ह्यू जिंकला होता.

नुकताच पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींच तात्याने तोंड भरून कौतुक केलं. आता मला भारतात आणखी गुंतवणूक करायला आवडेल अस त्यान सांगितल. अमेरिकेत असलेल्या ओबामा सरकारला त्याने मस्त शिव्या देऊन घेतल्या. त्यांच्या मुळे आम्ही अमेरिकेतले नवे प्रोजेक्ट कमी केलो आहे.

अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना ओबामा कस गोल्फ खेळण्यात बिझी आहेत हे सुद्धा त्यांनी वर्णन करून सांगितल. याच गप्पा मारताना ट्रम्प तात्या म्हणाले,

“मी जर राष्ट्राध्यक्ष असतो तर कधीही व्हाईट हाउस सोडल नसत. “

लोकांनी हसून टाळ्या वाजवल्या. पण तेव्हा स्वप्नात सुद्धा कोणाला ठाऊक होतं की हा बिल्डर डोनाल्ड ट्रम्प तात्या खरोखर राजकारणात जाईल आणि बराक ओबामाच्या जागी राष्ट्राध्यक्ष बनेल. हे खरोखर घडल. 

आजही न्यूयॉर्कच्या मॅन हॅटन मधल्या ट्रम्प टॉवरशी स्पर्धा करणारे आलिशान ट्रम्प टॉवर पुण्याबरोबरच मुंबई, कोलकाता आणि गुरगाव उभे आहेत. पुण्यातल्या एका फ्लॅटची किंमत १५ कोटी आहे अस संगितल जातं. ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यां भावंडांचे तिथे फ्लट आहेत. मागच्या वर्षी डोनू तात्यांचे चिरंजीव धाकटे डोनाल्ड ट्रम्प भारतात येऊन याच उद्घाटन करून गेले .

पण गेल्या काही वर्षापासूनच्या भारतीय मंदीमुळे मात्र ट्रम्प तात्यासुद्धा आकसून गेलेत.

मध्यंतरी पुण्याच्या ट्रम्प टॉवरच्या जमिनीवरून काही वाद समोर आले. शिवाय लोकांच्याकडे पैसाच नाही त्यामुळे एवढे महागडे फ्लट घेणार तरी कोण हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे नवीन प्रोजेक्ट सुरु करणार म्हणणाऱ्या ट्रम्पनी भारतातून लक्ष काढून घेतल.

काही जाणकार म्हणतात की ट्रम्पनी भारतात पैसे गुंतवलेच नाहीत. त्यांनी फक्त आपल नाव बिल्डर्सना वापरायला दिलय आणि त्याचे करोडो रुपये वसूल केलेत.

बाकी काही का असेना ट्रम्प तात्या धंद्यात भरपूर चापटर आहे हे नक्की. आता अहमदाबाद दौऱ्यावर आलाय. काय काय देऊन जातो की घेऊन जातो हेच बघायचं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.