या गावात महाराष्ट्रातील सर्वात मोठा गाढवांचा बाजार भरतो..

नमस्कार कार्यकर्त्यांनो आत्ता गाढवांचा बाजार म्हणल्यानंतर तुम्ही म्हणाल हा काय आमच्या शेजारीच भरतोय. माणसांना गाढव म्हणायची तशी आपल्याकडे जूनी परंपरा आहे. आम्ही विचार केला माणसांना गाढव का म्हणत असतील तर उत्तर मिळतं गाढव विचार करत नाही. ते मुर्ख, मंद असत वगैरे वगैरे. आत्ता गाढव विचार करत का करत नाही हे माणसांना कळतं म्हणल्यानंतर माणूस खरच हुशार म्हणला पाहीजे.

असो तसाही शब्दांचा बाजार मांडायची इथे गरज नाही.

थेट मुद्यावर येवुया. मुद्दा असाय की महाराष्ट्रातला गाढवांचा बाजार कुठे भरतो. म्हणजे सर्वात मोठ्ठा गाढवांचा बाजार कुठलां आणि उत्तर मिळतं पाथर्डी.

पाथर्डी तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर मढी इथं मोठ्या डोंगरावर कानिफनाथाचं देवस्थान आहे. दरवर्षी इथं मोठ्ठी यात्रा भरते. कैकाडी समाजाची मानाची काठी मंदिराच्या कळसाला लावल्यानंतर व गोपाळ समाजाची मानाची होळी सायंकाळी पेटल्या नंतर मढी यात्रेला सुरूवात होते. होळीला सुरू झालेली ही यात्रा पाडव्याला संपते. म्हणजे तब्बल पंधरा दिवस ही यात्रा चालते.

दरवर्षी १५ दिवसांच्या या यात्रेमध्ये शेकडो वर्षांपासून गाढवांचा बाजार भरतो.

राज्यात जेजुरी, जुन्नर, माळेगाव, सोनारी येथे जरी गाढवांचा बाजार भरत असला तरी मढीचा बाजार सर्वात मोठा व प्रसिद्ध आहे. त्यामुळे शेजारच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतून गाढवाचे व्यापारी गाढव विकायला घेऊन येतात. गावरान गाढव, काठेवाडी गाढव, डोक्याला भवरा अशा गाढवांच्या जाती आहेत. मात्र मढीच्या यात्रेत काठेवाडी गाढवाला जास्त मागणी असते. कारण बाजारात गुजरातची काठेवाडी गाढवं देशी गाढवांपेक्षा देखणी व सशक्त असतात त्यामुळे वाळू वाहून नेण्यासाठी यांचा वापर केला जातो.

3 हजार रूपये ते 35 हजारांपर्यंत गाढवाचा दाम असतो. या बाजारात लाखो रूपयांच्या उलाढाली होतात.

भटक्यांची पंढरी म्हणून मढीच्या यात्रेला ओळखलं जातं. राज्यातून लाखो लोक या यात्रेला येतात. कानिफनाथांनी आपल्या उभ्या आयुष्यात भटक्या- विमुक्तासांठी काम केलं असल्यामुळे यात्रा कालावधीत भटक्या समाजातील कैकाडी, घिसाडी, बैरागी, कुडमुडे जोशी, लोहार, पारधी, भील्ल, बेलदार, गारूडी, लमान, कंजारभाट, मैराळ, नंदीवाले, डोंबारी, तिरमली, कोल्हाटी समाजाचे सर्व भाविक आवर्जुन मढी येथे येतात.

यात्रेला आलेले लोक गाढवांचा बाजार बघून जातात. तो एक कुतूहलाचा विषय आहे. भटक्यांचं त्यामागे धंद्याचे गणित आहे. वडार समाज जाते पाटे तयार करतो गाढवांवर टाकून गावोगावी विकायला घेऊन जातो त्यासाठी गाढवं लागतात. कैकाडी समाजाला डाले, टोपल्या तयार करून गाढवांवर टाकून गावोगाव फिरण्यासाठी गाढव लागतात. कुंभार समाजाला चिखल, माती, वाळू वाहून नेण्यासाठी गाढवं लागतात. मात्र, सध्या हे प्रमाण कमी झालंय.

जाते आणि पाट्याच्या जागेवर मिक्सर आणि गिरण्या आल्यात. माती,वाळू वाहण्यासाठी वाहनं आणि छोट्या रिक्षा आल्यात. तरिही गाढवावरून वाळू/रेती ओढण्यासाठी परवानगीची गरज नसल्याने या कामात गाढवांचा वापर मोठ्या प्रमाणात होतं असल्याच वाळूतज्ञ सागंतात.

मात्र, शेकडो वर्षापासून भरला जाणारा हा गाढवांचा बाजार अजूनही भरतोय. नवीन तंत्रज्ञानामुळे भटक्या विमुक्तांच्या जिवनशैलीवर यांचा परिणाम झालाय. या बाजाराला थोडीशी उतरता कळा लागलीय. पण भि़डू कार्यकर्त्यांनो हा बाजार म्हणजे आमची ओळख आहे, लाखो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे.

आम्हाला या बाजाराबद्दल अभिमान आहे. गर्व आहे. आणि तुम्हाला याबद्दल कुतहूल असेल तर या मग एकदा भटक्यांच्या पंढरीत गाढवाच्या बाजाराला.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.