ट्रम्प तात्यांच्या विरोधी उमेदवाराचं चिन्ह गाढव का यामागे पण एक किस्सा आहे !
जगातली सगळ्यात जुनी पण आधुनिक अशी लोकशाही म्हणजे अमेरिका, जिने मागची किमान सव्वा दोनशे वर्ष सलग लोकशाही तत्वाशी न ढळता काम केले आहे.
आज या लोकशाहीची मतमोजणी सुरू आहे डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचं भविष्य सुद्धा यात अडकलेलं आहे. एवढ्या वर्षात पहिल्यांदा मतमोजणी लांबलेली आहे.
अमेरिकन लोकशाही जशी जुनी प्रौढ आहे. तशाच तिथल्या लोकशाहीमधल्या संकल्पनाही जुन्या आहेत.
निवडणुका राजकारण, हेवेदावे, मंत्रीपदे, राष्ट्राध्यक्षपद या सगळ्यानाच खूप मोठा इतिहास आहे. आजचे अमेरिकेतले दोन राष्ट्रीय पक्ष रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे ही अनुक्रमे दीडशे दोनशे वर्ष जुने आहेत. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या.
त्यांचे निकाल पाहताना एक गोष्ट नेहमी लक्ष वेधून घेते. ती म्हणजे त्या निकालासाठी वापरलेली दोन्ही पक्षांची चिन्हे.
टिव्ही किंवा इंटरनेटवर किंवा प्रिंट मिडिया मध्ये सगळीकडेच हत्ती विरुद्ध गाढव अशी लढाई दिसतेय. थोडे लक्ष दिल्यास असे लक्षात येते की रिपब्लिकन पक्षासाठी ‘हत्ती’ हे चिन्ह वापरलंय तर डेमोक्रॅटिक पक्षासाठी ‘गाढव.’ पण हे असे का ? जगातल्या सगळ्यात जुन्या शक्तिशाली या दोन पक्षांनी असली चिन्हे का निवडली असावीत? आणि तरीही हत्ती हे चिन्ह ठीक आहे पण गाढव हे मात्र अति झाले.
पण अमेरिकन लोकशाही प्रमाणेच या दोन चिन्हांचाही फार मोठा इतिहास आहे.
ही चिन्हे काही त्या दोन पक्षांनी निवडलेली नाहीत. तर झाले असे की १८२८ साली डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पक्षातून फुटून अँड्र्यू जॅक्सन या नेत्याने आपला वेगळा पक्ष काढला. त्याच नाव डेमोक्रॅटिक पार्टी आणि आपल्याच जुन्या सहकाऱ्याविरुद्ध लढायला ते सज्ज झाले.
१८२८ सालीच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जॅक्सन यांच्या विरोधकांनी जॅक्सन यांची खिल्ली उडवण्यासाठी त्यांच्या नावाचा उल्लेख जॅक्सन या ऐवजी जॅकअस(Jackass) असा करायला सुरवात केली. ज्याचा शब्दशः अर्थ गाढव असा होतो.
पण अँड्र्यू जॅक्सन चाणाक्ष राजकारणी होते.
ते म्हणाले गाढव तर गाढव . गाढव कष्टाळू असतो. तो प्रामाणिकपणे काम करतो. आणि त्यांनी त्यांच्या पोस्टर्स वर गाढवाची चित्र लावायला सुरवात केली. इथे डेमोक्रॅटिक पक्ष गाढवाशी पहिल्यांदा जोडला गेला आणि ती प्रतिमा जनमानसात रुजली. १८२८ आणि १८३२ अशा दोन निवडणुका जिंकून अँड्र्यू जॅक्सन पुढे दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले पण त्यानंतर गाढवाचा अनधिकृत वापर कमी होत गेला.
पुढे थाॅमस नास्ट नावाच्या एका व्यंगचित्रकाराने राजकारणात गाढवाला जिवंत केले आणि हत्तीला जन्म दिला.
थाॅमस नास्टने १८७३ साली “हार्पस विकली ” नावाच्या एका साप्ताहिकात एक व्यंग चित्र काढले. ज्यामध्ये डेमोक्रॅटिक पार्टी आर्थिक गर्तेत सापडली आहे हे दर्शविताना एक गाढव खोलात पडतानाचे चित्र दाखवले होते. त्यानंतर पुढच्या वर्षी त्यांनी आणखी एक चित्र काढले ज्यात एका हत्तीला रिपब्लिकन मतदारांची उपमा दिली . थाॅमस नास्ट यांच्या व्यंगचित्रामधून रिपब्लिकन पक्षासाठी हत्ती आणि डेमोक्रॅटिक पक्षासाठी गाढव या चिन्हांचा वापर पुढे वाढत गेला.
तशीही चिन्हे पुढे; लोकप्रिय झाली.
आणि मागच्या सव्वाशे वर्षात ती सगळी कडे वापरली जातात. रिपब्लिकन पक्षाने तर पुढे हत्तीचिन्हाचा अधिकृतपणे स्वीकार केला. डेमोक्रॅटिक पक्षाने मात्र अधिकृतपणे स्वीकार केलेला नाही. एका मोठ्या गोलामध्ये कॅपिटल मध्ये लिहिलेलं ‘D’ हा डेमोक्रॅटिक पक्षाचा अधिकृत लोगो आहे.
गाढव या चिन्हाने अँड्र्यू जॅक्सन यांना तारले किंवा मदत झाली असेल नसेल तो भाग वेगळा.
शेवटी नेते किंवा पक्ष त्यांच्या विचारावर किंवा कर्तुत्वावर मोठे होतात. राजकारणात डाव उलटवता आले पाहिजेत आणि अँड्र्यू जॅक्सन यांनी गाढवाचा स्वीकार करून असा धोबीपछाड दिला कि विरोधकच गाढव ठरले.
या रगेल आणि लोकांची नस पकडलेल्या नेत्याचा वारसा ज्यो बायडेन यांचा पक्ष आजही चालवतो म्हणून त्यांचे चिन्ह गाढव आहे.
उद्या परवा पण बायडेनचं गाढव जिंकतय की ट्रम्पचा हत्ती हे कळेलच पण ते काहीही असो अमेरिकन लोकशाहीचा विजय होईल हे नक्की.
- रणजीत यादव.
हे ही वाच भिडू :
- लातूरच्या या गड्याला २०१९ मध्ये बनवायचं आहे अपक्षांच सरकार
- पटेल आणि शहांच्या भांडणात पहिल्यांदा लोकशाहीचा फायदा झाला आहे !
- ते नसते तर कदाचित, आज निवडणुका देखील झाल्या नसत्या.
- जॉर्ज फर्नांडीस यांनी देशभरात बॉम्बस्फोट घडविण्याची योजना आखली होती !
Joe Biden जर निवडणूक जिंकले तर america – india relation vr काय परिणाम होईल?